Wednesday, July 1, 2020

पाठ १८ वा संस्कृत वाक्यरचनेची पद्धत.

आपण संस्कृत वाक्यरचना कशी करायची ते शिकत आहोत. कर्ता प्रथमा विभक्ती, कर्म द्वितीया विभक्ती व क्रियापद कर्त्याच्या पुरुषवचनाप्रमाणे हा भाग आपण पाहिला.

आता बाकीच्या भाषात पाहिले तर वाक्यरचना करतांना एका ठराविक क्रमाची (Order)  अपेक्षा असते. उदा. मराठीमधे आपण ‘श्रीधर पाणी पितो’, असे म्हणतो. मराठीत कर्ता प्रथम नंतर कर्म व शेवटी क्रियापद असते. इंग्लिशमधे ‘Shridhar drinks wate असे कर्ता, क्रियापद व कर्म अशा क्रमाने शब्द येतात. संस्कृतमधे असा कोणताही ठराविक क्रम नाही.
श्रीधर: जलं पिबति ।
श्रीधर: पिबति जलम् ।
जलं पिबति श्रीधर: ।
जलं श्रीधर: पिबति
पिबति जलं श्रीधर:
पिबति श्रीधर: जलम् ।
असे कोणात्याही क्रमाने वाक्य लिहिले तरी चालते. नियम एकच. फक्त विभक्ती प्रत्यय लावून शब्द ठेवायचे.

मराठीत आपण जोड क्रियापदे वापरतो.
उदा. नमति = नमस्कार करतो, असा अर्थ करतो. नमणे असा अर्थ करत नाही नमणे म्हणजे मराठीमधे पडती बाजू घेणे असा अर्थ होतो.

अर्चति = पूजा करतो असे म्हणतो. पूजतो असे फारसे म्हणत नाही.

काङ्क्षति = इच्छा करतो, इच्छितो.
म्हणजे आपण जोड करणे हे क्रियापद लावून जोड क्रियापद तयार करतो. पूजा करणे, इच्छा करणे, कूजन करणे, गर्जना करणे, वगैरे ठिकाणी आपण करणे हे क्रियापद वापरतो. संस्कृतमधे भाषांतर करतांना सिंह गर्जना करतो हा अर्थ सिंह: गर्जति यातून व्यक्त होतो. म्हणजे सिंह गरजतो. सिंह: गर्जनां करोति असे कृ धातूचे क्रियापद लावून सुद्धा वाक्य करता येईल. मग गर्जना हे करतो या क्रियापदाचे कर्म ठरेल.
अहं देवं नमामि । मी देवाला नमस्कार करतो. इथे संस्कृत वाक्यात देवं हे कर्म आहे. पण भाषांतरित मराठी वाक्यात देव व नमस्कार ही दोन कर्मे येतात.

सुरवातीला मी काही तुम्हाला मूळ धातू सांगितले. नंतर काही मूळ धातू वेगळा आणि चालणारा वेगळा असे धातू सांगितले. आज उपसर्गासहित धातू सांगणार आहे.

क्रियापदाच्या मागे जो लागतो तो उपसर्ग. ही एक प्रकारची अव्ययेच असतात. प्र, परा, आ, परि, अप, उप, नि, निर्, निस्, सम्, अनु, अव, दुस्, दुर्, वि, अधि, अपि, अति, सु, उद्, अभि, प्रति असे एकूण २२ उपसर्ग आहेत. ते धातूच्या मागे लागतात. सगळेच उपसर्ग सगळ्याच धातूंच्या मागे लागतात असे नाही.
उपसर्गांचे उपयोग -
१) काही धातूंचे अर्थ बदलतात.
गम्-गच्छ्= जाणे असा या धातूचा मूळ अर्थ आहे. पण उपसर्ग लागले की अर्थ कसा बदलतो बघा.
आगच्छति = येतो.
निर्गच्छति = निघून जातो.
अधिगच्छति = मिळवतो
अवगच्छति = जाणतो.
सङ्गच्छते = संगम होतो.
अनुगच्छति = मागून जातो
उपगच्छाति = जवळ जातो

२) काहीवेळा धातूंच्या अर्थात भर पडते.
उपगच्छति = जवळ जातो

३) काही धातूंचा अर्थ अधिक खुलून दिसतो.
राजति = शोभतो
विराजति = अधिक शोभतो.

४) काही वेळा अर्थाबरोबर त्यांची पदेही बदलतात.
जयति = जिंकतो
विजयते = जिंकतो
पराजयते = पराजित होतो

५) काही अकर्मक धातू सकर्मक होतात.
भवति = होतो
अनुभवति - अनुभव घेतो.

 ११) शिक्षक ज्ञान (ज्ञान) देतात.
१२) चोर (चौर) धन नेतात.
१३) विवेक व विक्रांत खेळतात.
१४) तुम्ही सर्व अभ्यास (स्वाध्याय, अभ्यास) करता.
१५) तापस मोक्ष इच्छितो.
१६) झाडे फळे देतात.
१७) तुम्ही दोघे वने पहाता.
१८) मी चंद्र पहातो.
१९) तुम्ही सूर्य पहाता.
२०) वाटसरु पाणी पितात.

मागच्या स्वाध्यायात आधी २० वाक्य दिली होती. होमवर्क जास्त होईल असे वाटले म्हणून त्यातली १० वाक्य कमी करून या पाठात पेस्ट केली आहेत. त्यामुळे नं ११ पासून आले आहेत. 


" पाठ १८ वा संस्कृत वाक्यरचनेची पद्धत. " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...