आज आपला सुभाषितांचा तास आहे. आपण कर्म वाक्यात कसं वापरावयाचे ते शिकत आहोत. वाक्यात कर्माची द्वितीया विभक्ती व कर्त्याची प्रथमा विभक्ती योजावयाची असते. तसेच जे गतिवाचक धातू असतात त्यांची पण द्वितीया विभक्ती योजावयाची असते. गम्-गच्छ् = जाणे किंवा या (२ प. प.) = जाणे. वास्तविक हे धातू अकर्मक आहेत. पण जाणे या क्रियापदात गती आली. म्हणून जिथे जायचे त्याची द्वितीया विभक्ती होते. उदा. कृषीवल: क्षेत्रं गच्छति । क्षेत्र म्हणजे शेत. शेतकरी शेतात जातो. आता शेत हा शब्द स्थानवाचक आहे. ते काही गम्-गच्छ् धातूचे कर्म नाही. पण धातू गतिवाचक असल्यामुळे क्षेत्र शब्दाची द्वितीया विभक्ती झाली आहे.
त्या धर्तीची सुभाषिते पाहू या.
१) यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती ।
तथा नयति कैलासं न गङ्गा न सरस्वती ॥ ३६-१६॥
संधिविग्रह - यात संधी नाहीच आहे
अन्वय - यथा गानसरस्वती कैलासं नगं नयति । तथा सरस्वती कैलासं न नयति गङ्गा (अपि) कैलासं न नयति
अर्थ - गानरूपी सरस्वती ज्याप्रमाणे मनुष्याला कैलासपर्वतावर घेऊन जाते (मोक्ष मिळवून देते) त्याप्रमाणे गंगा किंवा सरस्वती नदी मनुष्याला कैलासपर्वतावर घेऊन जात नाही. (मोक्ष मिळवून देत नाही.
येथे नी-नय् = नेणे हा धातू घेऊन जाणे या अर्थी वापरलेला असल्यामुळे तो गतिवाचक झाला. स: पुस्तकं नयति या वाक्यात हा धातू गतिवाचक म्हणून वापरलेला नाही तो पुस्तक नेतो. पुस्तकाप्रत नेतो असा अर्थ नाही. येथे पुस्तक हे त्या धातूचे कर्म आहे. पण वरील श्लोकात कैलास पर्वतावर घेऊन जाते असा अर्थ आहे. म्हणून कैलासं अशी या स्थानवाचकाची द्वितीया विभक्ती झाली आहे.
तसेच वरील श्लोकात ‘नगं गानसरस्वती’ येथे श्लेष आहे. नग म्हणजे पर्वत. हे पद असेही फोडता येते ‘न गङ्गा (गंगा) न सरस्वती) गंगा वा सरस्वती ह्या नद्याही मोक्ष देण्य़ासाठी प्रसिद्ध आहेत. संगीताशी मन एकदम तदाकार होत असल्यामुळे गान सरस्वती मोक्ष लवकर मिळवून सेते असे सुभाषितकार म्हणत आहे.
२) आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥
संधिविग्रह - आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ॥
अन्वय - आकाशात् पतितं तोयं यथा सागरम् गच्छति (तथा) सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति
अर्थ - आकाशातून पडलेले पाणी ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळते त्याप्रमाणे सर्व देवांना केलेला नमस्कार विष्णूप्रत जातो.
येथे सुद्धा सागर व केशव हे स्थानवाचक शब्दांची द्वितीया झाली.
३) श्लोकस्तु श्लोकतां याति यत्र तिष्ठन्ति साधव: ।
लकारो लुप्यते यत्र तत्र तिष्ठन्त्यसाधव: ॥
संधिविग्रह - श्लोक: तु श्लोकतां याति यत्र तिष्ठन्ति साधव: । लकार: लुप्यते यत्र तत्र तिष्ठन्ति असाधव: ॥
अन्वय - यत्र साधव: तिष्ठन्ति (तत्र) श्लोक: श्लोकतां याति । तु यत्र लकार: लुप्यते तत्र तिष्ठन्ति असाधव:
अर्थ - जेथे सज्जन असतात तेथे श्लोक श्लोकतेप्रत जातो. पण जेथे दुर्जन असतात तेथे श्लोक शब्दातील लकार लोप पावतो. (तेथे फक्त दु:खच असते).
पद्य वाङ्मयातील कडव्यांना श्लोक म्हणतात हे आपल्याला माहीत आहे. श्लोक याचा दुसरा अर्थ आहे स्तुती. जेथे सज्जन असतात तेथे त्यांनी म्हटलेला श्लोक हा श्लोकतेप्रत जातो म्हणजे स्तुतीमय असतो. पण जेथे दुर्जन असतात तेथे श्लोक शब्दातील लकाराचा लोप होतो. त्या शब्दातील ल् हा वर्ण काढला की शोक हा शब्द रहातो. शोक म्हणजे दु:ख. म्हणजे दुर्जन जेथे असतात ते काहीही बोलले तरी ते दु:खदायकच असते.
चौथे सुभाषित कर्मकारकाचे उदाहरण म्हणून पहावयाचे आहे.
४) काक: आह्वयति काकान् याचको न तु याचकान् ।
काकयाचकयोर्मध्ये वरं काको न याचक: ॥१४-६॥
संधिविग्रह - काक: आह्वयति काकान् याचक: न तु याचकान् ।
काकयाचकयो: मध्ये वरं काक: न याचक: ॥१४-६॥
अन्वय - काक: काकान् आह्वयति तु याचक: याचकान् न (आह्वयति)।
(अत:) काकयाचकयो: मध्ये काक: वरं याचक: न (वरं)॥
अर्थ - कावळा कावळ्यांना हाका मारतो पण याचक याचकांना बोलावत नाही. म्हणून कावळा व याचक यांच्यामधे कावळा चांगला पण याचक नाही.
येथे आह्वयति म्हणजे बोलावतो हे क्रियापद आहे. तृ. पु. ए. वचनी क्रियापद म्हणजे त्याचा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असणार. कर्ता आहे काक:. काक म्हणजे कावळा. कावळा बोलावतो. कर्म द्वितीया विभक्तीत काकान् हे देवान् सारखे द्वितीया बहुवचन झाले. कावळा कावळ्यांना बोलावतो. आह्वयति या क्रियापदाचा याचक सुद्धा कर्ता आहे. याचक: याचकान् न आह्वयति । याचक याचकांना बोलावत नाही. एखादे भक्ष्य पडले असेल तर कावळे काव काव करत तेथे जमा होतात. पण एखादी गोष्ट मिळण्याची शक्यता असेल तर याचक केवळ आपल्यालाच मिळावे या हेतूने तेथे एकटाच जातो. इतरांना त्या गोष्टीचा पत्ता सुद्धा लागू देत नाही. त्यांना बरोबर घेऊन जात नाही.
" पाठ १९ वा सुभाषित ४ " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment