संस्कृत साहित्याची ओळख - ५ - महाभारत
रामायण व महाभारत ही भारत देशाची दोन आर्ष महाकाव्ये. आर्ष म्हणजे ऋषींनी लिहिलेली. रामायण हे काव्य वाल्मीकी ऋषींनी लिहिले. त्यात श्रीरामांचे चरित्र गायिले आहे. ‘महाभारत’ हे काव्य व्यास महर्षींनी लिहिले. व्यास ऋषींच्या नावावर खूप साहित्य प्रसिद्ध आहे. वेदसंहितांपासून पुराणांपर्यंत व्यास नावाचा उल्लेख आला आहे. अठरा पुराणे, अठरा उपपुराणे, महाभारत, वेदांतदर्शन, असे व्यासांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. वेदांचे विभाजनही व्यासांनी केले आहे.
महाभारताचे महत्व त्याच ग्रंथात आरंभी वारंवार आलेले आहे. पण स्वत: व्यासांनी आपल्या ह्या ग्रंथाचे महत्व ब्रह्मदेवाला सांगितले आहे.
व्यासांनी ह्या ‘भारत’ ग्रंथाची अंतर्यामी सुव्यवस्थित रचना केली. वेदांचे रहस्य, त्यातील इतर विस्तार, सांगोपांग उपनिषदे, इतिहास, पुराणे, कालाची त्रिविध स्थिती, न्याय, शिक्षा, चिकित्सा, दान पुण्यतीर्थे, पवित्र देश, नद्या पर्वत, वने, समुद्र, युद्धोपयोगी शस्त्रास्त्रविचार, लोकाचार असे अनेकविध विषय त्या काव्यात होते. परंतु ह्या काव्याचा लोकात प्रसार झाला तर त्या काव्यरचनेचा उपयोग. आणि त्यासाठी ते लिखित स्वरूपात उपलब्ध झाले पाहिजे. पण व्यासांना चिंता होती की ह्या काव्याचा लेखक कोण होईल ? तेव्हा ब्रह्मदेवांनी व्यासांना गणपतीची प्रार्थना करण्यास सांगितले व तुझ्या काव्याची बरोबरी करू शकेल असा ग्रंथ होणार नाही असा आशीर्वादही दिला. त्याप्रमाणे व्यासांनी गणेशाची प्रार्थना केली. गणपती प्रकट झाला. तेव्हा व्यास म्हणाले - ‘लेखको भारतस्यास्य भव त्वं गणनायक’ हे गणेशा, तू या ‘भारत’ ग्रंथाचा लेखक हो. मी याची मनातल्या मनात रचना केली आहे. तेव्हा गणपतीने अट घातली की मी लिहीत असतांना क्षणभर जरी माझी लेखणी विराम पावली तर मी ह्या ग्रंथाचा लेखक होणार नाही. तुम्ही अखंडपणे हा ग्रंथ सांगितला पाहिजे.’ तेव्हा व्यासांनी पण गणेशाला अट घातली की, मी सांगितलेल्या प्रत्येक श्लोकाचा आपण अर्थ समजून घेतला पाहिजे.’ गणेशाने ह्या गोष्टीला संमत्ती दिली. नंतर व्यास ग्रंथ सांगत होते व गणपति लिहून घेत होता. तेव्हा व्यास मधून मधून कूट श्लोक सांगत असत. त्या श्लोकांचा बाह्यार्थ एक असे व गूढार्थ एक असे. तो समजून घेण्यास गणपतीला काही काळ विचार करावा लागे. तोपर्यंत व्यास पुढील श्लोकांची रचना करत असत. असा हा महान ग्रंथ म्हणजे व्यासांनी आपल्याला दिलेले सांस्कृतिक धन आहे.
तीन संस्करणे -
महाभारताच्या प्रत्येक पर्वाच्या आरंभी
नारयणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ॥
असा श्लोक आहे. नारायण म्हणजे श्रीकृष्ण, नरोत्तम म्हणजे श्रेष्ठ असा अर्जुन, देवी सरस्वती व व्यास ह्यांना वंदन करून मग जय नावाच्या इतिहासाचे पठण करावे. असे यात म्हटले आहे.
ह्यावा अर्थ या ग्रंथाचे नाव जय असे होते. व्यासांनी कौरव व पांडव ह्यांच्या युद्धाचे वर्णन करून कौरवांवर पांडवांनी जय कसा मिळवला तो ‘जय’ नावाचा इतिहास लिहाला होता. तो त्यांनी आपला पुत्र शुक व आपल्या पैल, सुमंतु, जैमिनी व वैशंपायन या चार शिष्यांना शिकवला अर्थातच त्यांनी तो तोंडपाठ केला होता. यज्ञप्रसंगी मोकळ्या वेळात हे कथानक सांगितले जात असे. ज्यावेळी इतिहास लिहिला त्यावेळी त्यातील सर्व पात्रे व त्यांची पार्श्वभूमी त्या काळातील लोकांना ज्ञात होती. ती ज्ञात आहे असे गृहीत धरूनच हा इतिहास रचला गेला.
पुढे अर्जुनाचा पणतु जनमेजय याने सर्पसत्र आरंभले. कारण त्याचा पिता राजा परिक्षित सर्पदंशाने मृत्युमुखी पडला होता. त्यावेळी व्यास व वैशंपायन जिवंत होते. तेव्हा व्यासांच्या सांगण्यावरूनच ‘जय’ नावाचा इतिहास वैशंपायनाने राजा जनमेजयास ऐकवला. परंतु ज्या गोष्टी व्यासांनी गृहीत धरल्या त्या जनमेजयास माहीत नसाव्यात. त्याने हा इतिहास ऐकत असता अधून मधून शंका विचारल्या. तेव्हा वैशंपायनांनी त्याच्या शंकांचे निरसन केले. होता होता श्लोकसंख्या वाढत २४००० पर्यंत गेली. भारत ह्या ग्रंथामधे आख्याने व उपाख्याने नसावीत. मग ह्या ‘जय’ नावाच्या इतिहासाला ‘भारत’ असे नाव मिळले. हे महाभारताचे दुसरे संस्करण होते.
जनमेजयाच्या सर्पसत्रानंतर काही वर्षांनी शौनक ऋषींनी नैमिषारण्यात द्वादशवार्षिक यज्ञसत्र आरंभले. द्वादशवार्षिक सत्र म्हणजे १२ वर्षे चालणारा यज्ञ. त्यावेळी लोमहर्षणाचा पुत्र सौति हे ऋषी उपस्थित होते. सौतीने सर्पसत्राच्या वेळी वैशंपायनाने सांगितलेले ‘भारत’ ऐकले होते. म्हणून शौनक ऋषींनी सौतीला ‘भारत’ ऐकवण्याची विनंती केली. तेव्हा पुन्हा श्रोत्यांमधून नाना प्रश्न विचारले जात. कौरव कोण होते, पांडव कोण होते ? तेव्हा सौतीकडून पुन्हा त्यात भर घातली गेली. आपले हे काव्य परिपूर्ण असावे म्हणून त्यात सौतीने आख्याने, उपाख्याने यांची जोड देऊन श्लोकसंख्या जवळ जवळ १ लाखावर नेऊन ठेवली. हे या ग्रंथाचे तिसरे संस्करण. याच्या विशालतेमुळे ह्या ग्रंथाला महाभारत असे नाव मिळाले. सौतीने ह्या भारत ग्रंथात अनेक आख्याने, उपाख्याने व परिशिष्टाच्या स्वरूपात हरिवंश ह्याला जोडले. त्यामुळे हा विशालकाय ग्रंथ झाला. इ. स. पूर्व ६०० ते ७०० वर्षे ह्या भारत ग्रंथाचे ‘महाभारत’ असे नामकरण झाले. महाभारत ही एका काळाची रचना नसून ८०० ते १००० इतका प्रदीर्घ काळ ह्या रचनेस लागला असावा. थोडक्यात महाभारत ही एका काळाची रचना नाही. त्याचा एकच एक निर्माता नाही. ह्या ग्रंथाचे वर्तमान रूप शेकडो वर्षांच्या कालावधीत निर्माण झाले आहे.
अशाप्रकारे या मूळ ‘जय’ नावाच्या इतिहासाला महाभारताचे मिळालेले रूप म्हणजे ज्ञानकोशाचे स्वरूप आहे. भारतीयांनी जे धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले ते प्राप्त करण्याचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणजे महाभारत. महाभारताला ‘पंचम वेद, क्षत्रिय वेद, कृष्णवेद, वैष्णवांची स्मृति, शतसाहस्रीसंहिता’ अशी अनेक नावे मिळाली आहेत. या ग्रंथाचा १/४ भाग हा कथावर्णनपर आहे व ३/४ भाग उपदेशपर आहे. म्हणून विंटरनिट्झ या ग्रंथाला साहित्याचे पूर्ण रूप मानतो.
महाभारत हा ग्रंथ हा केवळ इतिहसग्रंथ नाही तर तो पुराण, महाकाव्य, धर्मग्रंथ, अर्थशास्त्र, विश्वकोश, सर्वकाही आहे. भौतिक जीवनाची नि:सारता दाखवून मानवाला मोक्षमार्गावर आरूढ करणे हा महाभरताचा उद्देश आहे.
प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनीने ‘भारत’ या शब्दाचा अर्थ संग्राम असा सांगितला आहे. म्हणून महाभारत म्हणजे महासंग्राम. कौरव-पांडवांच्या महासंग्रामाची कथा यात आहे. म्हणून याचे नाव महाभारत.
आपल्या हक्काच्या राज्याची पुनर्प्राप्ती करून घेण्यासाठी पांडवांना कौरवांबरोबर युद्ध करावे लागले. त्यावेळी भरतखंडात असणार्या सर्व राजवंशांनी या युद्धात भाग घेतला होता. एकूण अठरा अक्षौहिणी सेना युद्धार्थ कुरुक्षेत्रावर जमली होती. एक अक्षौहिणी म्हणजे २१८७० रथ २१८७० हत्ती, ६५६१० घोडे, १०९३५० पायदळ. अशी १८ अक्षौहिणी सेना रणभूमीवर जमलेली होती. अनेकविध वरुणास्त्र, पर्जन्यास्त्र, ब्रह्मास्त्र वगरे अस्त्रे व धनुष्यबाण, गदा वगैरे शस्त्रे यांचा युद्धासाठी वापर केला गेला. आणि जमलेल्या ह्या सर्व सैन्याची या रणयज्ञात आहुती पडली. पण अखेर पांडवांना जय मिळाला. हा पांडवांना जय कसा मिळाला त्याचा इतिहास व्यासांनी ‘जय’ नावाने लिहिला.
आता प्रश्न असा आहे की व्यासांनी यातील नेमक्या किती श्लोकांची रचना केली असावी ? महाभरतातच एक श्लोक येतो की -
अष्टौ श्लोकसहस्राणि अष्टौ श्लोकशतानि च ।
अहं वेद्मि शुको वेत्ति संजयो वेत्ति वा न वा ॥
महाभारतातील ८८०० श्लोक मी जाणतो, शुक सुद्धा जाणतो. पण संजय जाणत असेल किंवा नसेल.
या श्लोकावरून मॅक्डोनेलनी ८८०० ही जय नावाच्या इतिहासाची श्लोकसंख्या ठरवली आहे. पण ही वास्तविक महाभारतातील कूटश्लोकांची संख्या आहे. मूळ जय नावाच्या इतिहासातील श्लोकांची संख्या नक्कीच जास्त असावी.
चिंतामणि विनायक वैद्य यांच्या मतानुसार व्यासकृत भारताची रचना इ. स. पूर्व ३१०० मधे झाली व सौतिद्वारा परिवर्धित महाभारताचे निर्माण इ. स. पूर्व २००० मधे झाले.
भगवद्गीता, विष्णुसहस्रनाम, अनुगीता, भीष्मस्तवराज व गजेंद्रमोक्षस्तोत्र ही पंचरत्ने महाभारतात समाविष्ट झालेली आहेत. संस्कृत काव्य, नाटक, महाकाव्ये व चंपू साहित्य महाभारतातील कथानकांवर आधारित आहेत.
कोणी जर आपल्याला विचारले की ‘तुमचे तत्वज्ञान, नीतिशास्त्र, धर्मतत्वे, इतिहास काय आहे; तुमची सर्वांगीण सुधारणा कोठेपर्यंत पोचली होती ? तर त्याला आपल्याजवळ उत्तर एकच आहे की ‘महाभारत पहा’. सृष्ट्युत्पत्तीच्या प्राचीन कल्पनांपासून नीतिशास्त्राच्या अत्युत्तम तत्वांपर्यंत, राजनीतिपासून प्रगत युद्धशास्त्रापर्यंत, मनुष्याच्या सामान्य जीवनाच्या चित्रणापासून मनुष्याचे जे अंतिम प्राप्तव्य मोक्ष तेथपर्यंत कोणताही विषय ह्यात आला नाही असे नाही. म्हणून ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ म्हणजे व्यासांनी सर्व जग उष्टे केले आहे असे म्हटले जाते. म्हणजे कोणताही विषय व्यासांना अस्पृष्ट नाही. जगामधे ज्या घडामोडी, कथानके दिसून येतात त्यांचा समावेश महाभारतात आहे. महाभारत म्हणजे रत्नाकर आहे. या रत्नाकरात बुडी मारावी व ज्याला जे पहिजे असेल ते रत्न त्याने घ्यावे. महाभारत म्हणजे भारतभूवर घडलेला सर्वांगसुंदर प्राचीन इतिहास. एवढा मोठा इतिहास व असे काव्य जगाच्या पाठीवर दुसरीकडे कोठेही झाले नाही.
महाभारतात एकूण अठरा पर्वे म्हणजे प्रकरणे आहेत. व त्यात पुन्हा अनेक उपपर्वे आहेत व उपपर्वात अनेक अध्याय आहेत.
१) आदिपर्व - २३३ अध्याय
या पर्वात कुरुवंशात पांडवांच्या पूर्वी होऊन गेलेल्या राजांचा इतिहास व धृतराष्ट्राचा पितामह राजा शांतनु पासून इतिहासास प्रारंभ करून कौरव-पांडवांचे विवाह, राज्याचे दोन भाग होऊन हस्तिनापूरचे राज्य कौरवांकडे व इंद्रप्रस्थाचे राज्य पांडवांना अशी विभागणीपर्यंतचा कथाभाग आला आहे.
२) सभापर्व - ८१ अध्याय
सभापर्वात पांडवांनी राज्याचा अधिकार प्राप्त केल्यानंतर त्यांचा पराक्रम, दुर्योधनाचे कपटद्यूत व पांडवांचा १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवास भोगण्यासाठी वनगमनापर्यंतचा भाग आला आहे.
३) वनपर्व - ३१५ अध्याय
वनपर्वात पांडवांची वनातील रहाणी, तेथे त्यांच्यावर बेतलेले प्रसंग, भरतखंडातील विविध तीर्थक्षेत्रांचे वर्णन, अर्जुनाचे अस्त्र-शस्त्रप्राप्तीसाठी तपस्या करणे व अस्त्रे मिळवून परत येणे व वनवासाचा काळ संपलेला असल्यामुळे अज्ञातवासासाठी विराट राजाच्या नगरीत येणे इथपर्यंतचा कथाभाग आलेला आहे.
४) विराट पर्व - ७२ अध्याय
विराटाच्या नगरीत पांडवांचे एक वर्ष अज्ञातवासाचे वर्णन व तेथे आलेले अनुभव यांचे वर्णन आहे.
५) उद्योगपर्व - १९६ अध्याय
या पर्वामधे पुढील रणनीतीची आखणी, संजयशिष्टाई, श्रीकृष्ण शिष्टाई, दुर्योधनाचा पांडवांना त्यांचे राज्य परत करण्यास नकार व शेवटी दोन्ही बाजूच्या सैन्याचे रणभूमीवर प्रस्थान यांचे वर्णन आहे.
६) भीष्मपर्व - १२२ अध्याय
युद्धास सुरवात होण्यापूर्वी श्रीकृष्णांचा अर्जुनाला गीतोपदेश, युद्धामधे भीष्मांचा पराक्रम दहाव्या दिवशी भीष्मांचे रणांगणात पतन हा भाग यात आलेला आहे.
७) द्रोण पर्व - २०२ अध्याय
भीष्म शरपंजरी पडल्यावर द्रोणांकडे कौरवांचे सेनातित्व, द्रोणांचा पराक्रम व द्रोणांचा युद्धात वध यांचे वर्णन आहे.
८) कर्णपर्व - ९६ अध्याय
द्रोणांच्या नंतर सेनेचे अधिपत्य कर्णाकडे व कर्णवध हा भाग यात आलेला आहे.
९) शल्यपर्व - ६५ अध्याय
कर्णानंतर कौरवांचा सेनानायक शल्य व शल्यवध, दुर्योधन व भीमसेनाचे प्रसिद्ध द्वंद्वयुद्ध व दुर्योधनाचा पराभव यांचे वर्णन आहे.
१०) सौप्तिक पर्व - १८ अध्याय
अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा झोपलेल्या द्रौपदीच्या पाचही पुत्रांचा वध करतात, अश्वथाम्याचे पांडवांचा एकुलता एक अंश जो उत्तरेच्या गर्भात वाढत होता त्याच्यावर ब्रह्मस्त्र सोडणे, अश्वत्थाम्याला श्रीकृष्णाचा शाप हा भाग आलेला आहे.
११) स्त्रीपर्व - २७ अध्याय
गांधारी सर्व कौरवस्त्रियांचे रणभूमीवरची परिस्थिती पाहून शोक, गांधारीचा श्रीकृष्णाला शाप, युधिष्ठिराकडून कौरवांचा श्रद्धविधी, कर्ण आपला मोठा भाऊ होता हे कळताच युधिष्ठिराचा स्त्रीजातीला शाप, हा कथाभाग आलेला आहे.
१२) शांतिपर्व - ३६५ अध्याय
राज्य प्राप्र झाल्यावर शरपंजरी पडलेल्या भीष्मांकडून युधिष्ठिराचे उपदेशग्रहण, हा कथाभाग आलेला आहे.
१३) अनुशासनपर्व - १६८ अध्याय
भीष्मांकडून युधिष्ठिराचे सांत्वन, पुन्हा युधिष्ठिराला नानाविध उपदेश व भीष्मांचे स्वर्गारोहण हा कथाभाग आलेला आहे.
१४) आश्वमेधिक पर्व - ९२ अध्याय
युधिष्ठिराचे धर्माने राज्याचे प्रतिपालन, अनुगीता, व्यासांच्या सांगण्यावरून युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ, उत्तरेचे मृत मुलाला जन्म देणे, श्रीकृष्ण मृत बालकाला जिवंत करतात, युधिष्ठिराची अश्वमेध यज्ञाची समाप्ती, हा कथाभाग आलेला आहे.
१५) आश्रमवासिक पर्व - ३९ अध्याय
धृतराष्ट्र, गांधारी व कुंती वानप्रस्थ स्वीकारतात व वनाला लागलेल्या वणव्यात तिघांचाही मृत्यु होतो. हा कथाभाग आलेला आहे.
.
१६) मौसल पर्व - ८ अध्याय
यादववंशाचा नाश कसा झाला ते सांगितले आहे.
१७) महाप्रास्थानिक पर्व - ३ अध्याय
श्रीकृष्णाच्या महाप्रस्थानानंतर पांडवांचे महाप्रस्थान व युधिष्ठिराचे सदेह स्वर्गाला जाणे. हा कथाभाग आलेला आहे.
१८) स्वर्गारोहणपर्व - ५ अध्याय
स्वर्गात युधिष्ठिराचे आपल्या बंधूंना व श्रीकृष्णाला भेटणे व महाभारताचा उपसंहार केलेला आहे.
एकूण अध्याय २१०७ व श्लोकसंख्या सुमारे १ लाख.
"संस्कृत साहित्याची ओळख - ५ - महाभारत " या Audio साठी खाली क्लिक् करा :
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
No comments:
Post a Comment