Monday, July 20, 2020

पाठ २९ वा आत्मनेपदी वर्तमानकाळ व तृतीया विभक्ती भाग १

आपण परस्मैपदी धातूंची वर्तमानकाळी रूपे कशी बनवायची ते शिकलो. आज आपण आत्मनेपदी वर्तमानकाळी रूपे शिकणार आहोत.

आता मुळात प्रश्न असा आहे की परस्मैपद व आत्मनेपद अशी धातूंची विभागणी करण्याचे कारणच काय ? क्रियेचे फळ जर अशी विभागणी करंयामधे एक वेगळा विचार होता. क्रियापदाचे फळ जर कर्त्याला मिळत असेल तर क्रियापद परस्मैपदी वापरावे व क्रियेचे फळ जर कर्त्याला स्वत:ला मिळत असेल तर क्रियापद आत्मनेपदी वापरावे.

उदा. यजति/यजते. पुरोहित: यजति । पुरोहित (यजमानासाठी) यज्ञ करतो. इथे यज् धातूचा कर्ता जरी पुरोहित असला तरी त्या धातूचे फळ म्हणजे यज्ञक्रियेचे फळ यजमानाला मिळावे म्हणून तो यज्ञ करतो.

यजमान: यजते ।
यजमान यज्ञ करतो ते यज्ञाचे फळ स्वत:ला मिळण्यासाठी. म्हणून हे क्रियापद आत्मनेपदी झाले.

पुढे असा फरक राहिला नाही. त्यामुळे काही धातू परस्मैपदी व काही धातू आत्मनेपदी अशी विभागणी फक्त राहिली. त्यातला उद्देश बाजूला राहिला. त्यामुळे संस्कृत शब्दांची बाह्य रूपे व्याकरणानुसार राहिली. परंतु अर्थातले भेद हळू हळू शिल्लक राहिले नाहीत. त्यामुळे काही धातू आत्मनेपदी व काही धातू परस्मैपदी असे संस्कृतचे बाह्यरूप तेवढे टिकून राहिले. सध्या संस्कृतमधे कर्मणी रूपे मात्र आत्मनेपदी प्रत्यय लावूनच केली जातात.

नंतर प्राकृत भाषांमधून आत्मनेपद पूर्णपणे निघून गेले. सगळे धातू व कर्मणी रूपे देखील परस्मैपदीच झाली.

आता आपण आत्मनेपदी वर्तमानकाळ पाहूया.
आत्मनेपदी वर्तमानकाळाचे प्रत्यय

इ   वहे   महे   प्रथम पुरुष
से   इथे   ध्वे   द्वितीय पुरुष
ते   इते   अन्ते   तृतीय पुरुष

वन्द् (१ आ.प) नमस्कार करणे
या धातूला आधी त्या गणाचे अ हे विकरण लागून वन्द् + अ = वन्द हे धातूचे अंग तयार होईल व नंतर त्याला आत्मनेपदी प्रत्यय लागतील.

वन्दे   वन्दावहे   वन्दामहे   प्रथम पुरुष
वन्दसे  वन्देथे   वन्दध्वे   द्वितीय पुरुष
वन्दते  वन्देते   वन्दन्ते   तृतीय पुरुष.

व अथवा म या अक्षरांनी सुरु होणारे प्रत्यय असतील तर धातूच्या अंगपुढे आणखी एक कान्हा येतो. म्हणून वन्दावहे वन्दामहे अशी रूपे झाली आहेत.


आपण इतके दिवस कर्ता, कर्म व विशेषण तसेच क्रियापद वाक्यात कसे योजावयाचे ते पाहिले. वाक्यात कर्ता प्रथमा विभक्तीत, कर्म द्वितीया विभक्तीत व क्रियापद कर्त्याच्या पुरुष व वचनाप्रमाणे योजावयाचे असते. आज आता आपण तृतीया विभक्ती वाक्यात कोणत्या शब्दांची येते ते पहाणार आहोत.

देवेन   देवाभ्याम्   देवै:   तृतीया

वनेन   वनाभ्याम्   वनै:   तृतीया

तेन         ताभ्याम्      तै:    तृतीया

येन     याभ्याम्       यै:      तृतीया

केन     काभ्याम्     कै:     तृतीया

मालया   मालाभ्याम्   मालाभि:  तृतीया

क्रियापदाने सांगितलेली क्रिया सिद्धीस जाण्यास जे अत्यंत उपयोगी असते त्याला करण म्हणतात. करण म्हणजे क्रियेचे साधन. अशा शब्दाची वाक्यात तृतीया विभक्ती योजावयाची असते. आता उदाहरणार्थ गोपाल: जलेन मुखं प्रक्षालयति । गोपाळ पाण्य़ाने तोंड धुतो. गोपालला मुख धुण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून जल हा शब्द तृतीया विभक्तीत वापरला आहे. आता मुख धुण्यासाठी हात व पाण्यासाठी तांब्या वगैरेंची पण आवश्यकता आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. या दोन्ही गोष्टी असून सुद्धा जर पाणीच नसेल तर मुख धुण्याची क्रिया करता येणार नाही. ‘साधकतमं करणम्’ अत्यंत सहाय्यक असेल ते करण कारक होते. म्हणून येथे जल हे करण-कारक आहे व त्याची तृतीया विभक्ती वापरलेली आहे.


आता खालील वाक्ये पाहूया.

१) अहं हस्तेन लिखामि ।
मी हाताने लिहितो.
२) अहं हस्ताभ्यां नमामि ।
मी दोन्ही हातांनी नमस्कार करतो
३) त्वं चरणाभ्यां चलसि ।
तू दोन्ही पायांनी चालतोस.
४) स: नयनाभ्यां पश्यति ।
तो दोन्ही डोळ्यांनी पहातो.
५) कुम्भकार: दण्डेन चक्रं चालयति ।
कुंभार दंडाने चक्र फिरवतो.
६) स्वर्णकार स्वर्णेन अलङ्कारान् निर्माति ।
सोनार सोन्याने अलंकार तयार करतो
७) सेवक: स्कन्धेन भारं वहति ।
सेवक खांद्याने ओझे वहातो


तृतीया विभक्तीवर आधारित पाठ
स्वाध्याय -
१) देव गीताने प्रसन्न होतो.
२) तुम्ही दोघे हातांनी नमस्कार करता
३) राम कोणत्या मार्गाने जातो ?
४) कान कुंडलांनी शोभतात.
५) चंद्रामुळे रात्र शोभते
६) गाय़क गोड आवाजाने गातो.
७) मुली चेंडूने (कन्दुक) खेळतात.
८) आंधळा स्पर्शाने जाणतो.
९) कष्टाने धन मिळते.
१०) व्याध बाणाने सिंहाला ठार मारतो.
११) लोक विमानाने परदेशी जातात
१२) सदाचाराने मन शुद्ध होते 

 ====================
उत्तरे - २९ वा पाठ 

आत्मनेपदी वर्तमानकाळ व तृतीया विभक्ती भाग १

तृतीया विभक्तीवर आधारित पाठ
स्वाध्याय -
१) देव गीताने प्रसन्न होतो.
देव: गीतेन प्रसीदति ।

२) तुम्ही दोघे हातांनी नमस्कार करता
युवां हस्ताभ्यां नमथ:

३) राम कोणत्या मार्गाने जातो ?
राम: केन मार्गेण गच्छति ?

४) कान कुंडलांनी शोभतात.
कर्णौ कुण्डलाभ्यां शोभेते । किंवा कर्णं कुण्डलेन शोभते ।

५) चंद्रामुळे रात्र शोभते
चन्द्रेण निशा शोभते ।

६) गाय़क गोड आवाजाने गातो.
गायक: मधुरेण स्वरेण गाय़ति ।

७) मुली चेंडूने (कन्दुक) खेळतात.
बालिका: कन्दुकेन क्रीडन्ति ।

८) आंधळा स्पर्शाने जाणतो.
अन्ध: स्पर्शेण अवगच्छति ।

९) कष्टाने धन मिळते.
कष्टेन (कष्टै:, प्रयत्नेन) धनं लभते ।

१०) व्याध बाणाने सिंहाला ठार मारतो.
व्याध: बाणेन सिंहं हिंसति ।

११) लोक विमानाने परदेशी जातात
जना: विमानेन परदेशं गच्छन्ति ।

१२) सदाचाराने मन शुद्ध होते
सदाचारेण मानसं पवित्रं भवति । 





"२९ वा पाठ आत्मनेपदी वर्तमानकाळ व तृतीया विभक्ती भाग १ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...