Thursday, June 4, 2020

संस्कृत अध्ययन पाठ २ रा - शब्द

नमस्कार

सरस्वति नमस्तुभ्यं सर्वेभ्यो ज्ञानदायिनि ।
सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा वरदा भव ॥

अन्वय - सर्वेभ्य: ज्ञानदायिनि सरस्वति,  तुभ्यं नम: । (त्वं) सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा वरदा भव

अर्थ - हे सर्वांना ज्ञान देणार्‍या सरस्वती देवी, तुला नमस्कार असो. तू नेहेमी सर्व कार्यांमधे सर्वकाही देणारी व वर देणारी हो.                

🎄🌸🎄
            *पाठ २ रा शब्द*
    आपण संस्कृत भाषा शिकत आहोत. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हटले जाते. कारण सर्व प्रादेशिक भाषांमधे ६० % ते ७० % शब्द हे संस्कृतमधून आलेले आहेत. माता, पिता, जननी, बन्धु, जल, मित्र, आदि शब्द मराठी हिंदी तसेच कानडी वगैरे भाषांमधे सुद्धा आहेत. त्यामुळे संस्कृतभाषा खरतर अपरिचित वाटण्याचे कारण नाही.

    काल आपण वर्णांचा अभ्य़ास केला. संस्कृत भाषेत १३ स्वर व ३३ व्यंजने आहेत. ती कोणती, ते आपण पाहिले. आज आपण शब्द शिकणार आहोत.

    एकापेक्षा अधिक अक्षरे एकत्र येऊन जे सार्थ असतात, विशिष्ट अर्थ सांगतात त्यांना शब्द म्हणतात.

संस्कृतमधे स्वरादि, स्वरांत, व्यंजनादि, व व्यंजनांत असे चार प्रकारचे शब्द असतात.

*१) स्वरादि -* म्हणजे स्वराने सुरू होणारा शब्द - उदा. आशुतोष.
हा शब्द आ + श् + उ + त् + ओ + ष् + अ अशा वर्णांचा बनला आहे. आ ह्या स्वराने सुरू झाला आहे. म्हणून स्वरादि. स्वर ज्याच्या आदि म्हणजे सुरवातीला आहे असा तो स्वरादि

*२ स्वरांत -* स्वराने अंत पावणारा. उदा. - देव -
देव = द् + ए + व् + अ अशा वर्णांचा बनला आहे. शेवटी अ आहे. म्हणून स्वरांत आहे.

*३ व्यंजनादि -* व्यंजनाने सुरू होणारा - उदा. विशाखा. विशाखा हा शब्द व् + इ + श् + आ + ख् + आ असा बनला आहे. सुरवातीला व् हे व्यंजन् आहे व शेवटी आ हा स्वर आहे. म्हणून व्यंजनादि म्हणजे व्यंजन ज्याच्या सुरवातीला आहे असा आहे.

*४) व्यजनांत -* व्यंजनाने अंत पावणारा शब्द - उदा. मरुत् + वारा. या शब्दात म् + अ + र् + उ + त् असे वर्ण आहेत शेवटी त् हे व्यंजन आहे. म्हणून हा शब्द व्यंजनांत आहे.

व्यंजनांत शब्द असणे हे सुद्धा संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. सुहृद्, जगत्, समिध्, वाच्, शशिन् मनोहारिन्, असे असंख्य व्यंजनांत शब्द आहेत.

शब्दांचे चार प्रकार म्हटले असले तरी दोन प्रकार विचारात घ्यावे लागतात. १) स्वरांत व २) व्यंजनांत.

स्वराने अंत पावणारे ते स्वरांत देव, महेश, वारि, नदी, माला, भानु वगैरे शब्द स्वरांत झाले तर मरुत्, सरित्, शशिन्, जगत्, वगैरे शब्द व्यंजनांत झाले. ह्या शब्दांना विभक्तिप्रत्यय लागून मग ते वाक्यात उपयोगात आणावे लागतात. आणि विभक्तिप्रत्यय लागतांना संधिनियमांप्रमाणे शब्दांची रूपे वेगवेगळी होतात.

*लिंगविचार*

संस्कृतमधे सुद्धा मराठीप्रमाणे, इंग्रजीप्रमाणे तीन लिंगे आहेत. पुंलिंग, स्त्रीलंग, नपुंसकलिंग.
हिंदी भाषेत दोनच लिंगे आहेत. नपुंसकलिंग हिंदीत नाही.

जे शब्द पुरुषजातीचा बोध करतात ते पुल्लिंगी शब्द असतात. उदा. छात्र, बालक, शिक्षक वगैरे.

जे शब्द स्त्रीजातीचा बोध करून देतात ते स्त्रीलिंगी शब्द असतात. उदा. छात्रा, बाला, रजनी वगैरे.

पुलिंग व स्त्रीलिंग यांच्यापेक्षा भिन्न सर्व शब्द नपुंसकलिंगाचा बोध करून देतात. उदा. पुस्तक, वन, फल, पत्र वगैरे.

*शब्दांच्या जाती -*

    शब्दांच्या नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषेण (यातच अव्ययांचा समावेश होतो) व क्रियापद अशा पाच जाती केलेल्या आहेत.

संस्कृत भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नाम व सर्वनामाप्रमाणे विशेषणाला सुद्धा लिंग असते.

*वचन विचार -*
बाकी सर्व भाषात दोनच वचने आहेत. एक वचन व बहु वचन. पण संस्कृतमधे एक वचन, द्विवचन व बहुवचन अशी तीन वचने आहेत. हे सुद्धा संस्कृतभाषेचे वैशिष्ट्य आहे. डोळे, हात, पाय, कान इत्यादी शब्द द्विवचनातच वापरले जातात.


*१) अकारांत पुलिंगी -* देव, छात्र, राम, बाल शिक्षक, अध्यापक वगैरे.

*२)अकारांत नपुंसकलिंगी शब्द -* वन, कानन, मुख, नेत्र

मराठीत जे स्नेहल सैजल वगैरे शब्द अकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत तसे अकारांत स्त्रीलिंगी शब्द संस्कृतमधे नाहीत.

*३) आकारांत स्त्रीलिंगी -* (अपवादात्मक शब्द सोडल्यास आकारांत शब्द फक्त स्त्रीलिंगी असतात) माला, कला, छाया, वनिता

*४) र्‍हस्व इकारांत पुं. शब्द -* कवि, मुनि, यति, अलि, वह्नि, मणि वगैरे. (हे शब्द मराठीत दीर्घईकारांत लिहितात)

*५) र्‍हस्व इकारांत स्त्रीलिंगी शब्द. -* मति, गति, भूमि, भक्ति, प्रकृति, रुचि, कृति वगैरे. (हेही शब्द मराठीत दीर्घ ईकारांत लिहितात)

*६) र्‍हस्व इकारांत नपुं शब्द -* वारि, सुरभि (सुवासिक), शुचि (पवित्र), भूरि (पुष्कळ) वगैरे.

*७) दीर्घ ईकारांत स्त्री. -* नदी, दासी, वापी, मही वगैरे.
दीर्घ ईकारांत मधे पुं व नपुं. शब्द नाहीत.

*८) र्‍हस्व उकारांत पुं. -* भानु, गुरु, पशु, इन्दु, राहु, केतु, विष्णु, ऋतु वगैरे.

*९) र्‍हस्व उकारांत नपुं. -* मधु (मध), अम्बु (पाणी), वस्तु, वसु (धन), जानु (गुडघा), सानु (शिखर), लघु वगैरे.

*१०) र्‍हस्व उकारांत स्त्री. -* धेनु, चञ्चु, रज्जु वगैरे.

*११) दीर्घ ऊकारांत स्त्री -* वधू, चमू, चम्पू वगैरे.
दीर्घ ऊकारांत मधे पुं व नपुं शब्द नाहीत.

*१२) ऋकारांत पुं -* धातृ, पितृ, नतृ, श्रोतृ, सवितृ (सूर्य), वगैरे.
ऋकारांत स्त्री. - मातृ, यातृ (जाऊ), दुहितृ (मुलगी), स्वसृ (बहीण).

*१३) ओकारान्त शब्द -* गो - गाय, बैल हा एकच ओकारांत शब्द आहे व तो सुद्धा पुंल्लिंगी व स्त्री. सारखाच चालतो.

आपण आपली मराठी मातृभाषा शिकत असतांना मोठ्या माणसांचे ऐकून भाषा शिकत गेलो. त्यामुळे लहानपणी बोलत असता आपल्याला त्या शब्दाला कोणता विभक्ती प्रत्यय लावला आहे हे न कळताही आपण वाक्यरचना करत होतो. देवाला, देवाने, देवावर, देवाचा असे विभक्तीप्रत्यययुक्त शब्द सहज बोलत होतो. संस्कृतमधे असे विभक्तिप्रत्यय लावून तयार होणारे शब्द प्रथम पाठ करावे लागतात. असे वास्तविक २० / २५ शब्द पाठ केले की काम भागते. पण लोक पाठांतराचा उगाचच बाऊ करतात. जसे पाढे पाठ केले की पुढील गणिते करायला सोपे जाते तसेच हे आहे. पाठ करण्याचे कारण असे की विभक्ति प्रत्यय लावल्यानंतर संधीच्या नियमाप्रमाणे त्या शब्दांची रूपे वेगळी होतात.

 या पाठाचे ध्वनिमुद्रणासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक् करा - 



"संस्कृत अध्ययन पाठ २ रा - शब्द" या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...