Saturday, June 6, 2020

५ वा पाठ व्याकरणोपयोगी काही शब्दांचा परिचय*

५ वा पाठ व्याकरणोपयोगी काही शब्दांचा परिचय*

आजपासून आपण रोज संस्कृतभाषेविषयीचे  तिचा गौरव करणारे एकेक सुभाषित पहाणार आहोत. सुभाषितकार म्हणतात -

भवन्तु सकला बाला: सुरभाषानुरागिण: ।
गौरवं ते वर्धयन्तु स्वभाषाराष्ट्रयो: सदा ॥७४-११८॥

अर्थ - सर्व मुले सुरभाषा म्हणजे देवांची भाषा जी संस्कृत, तिच्यावर प्रेम करणारे असोत व ते स्वत:च्या भाषेचा व राष्ट्राचा गौरव वाढवोत.
   
    संस्कृत भाषा ही देवांची भाषा आहे असे म्हटले जाते. म्हणून तिची सुरभारती, सुरभाषा, देववाणी वगैरे नावे आहेत. म्हणून आपले सगळे पूजेचे मंत्र संस्कृतभाषेत आहेत. संस्कृत म्हणजे संस्कार केलेले. संस्कृत भाषेवर व्याकरणाचे परिपूर्ण संस्कार केलेले आहेत. इतर भाषातील शब्द ह्या भाषेत घुसडता येत नाहीत. नाहीतर आपली सध्या मराठी भाषा काय किंवा हिंदी भाषा काय कर्ता व क्रियापद सोडलं तर जवळ जवळ सगळ्या इंग्लिश शब्दांनीच युक्त असते. कोणी शुद्ध मराठी किंवा हिंदी बोलले तर तो चक्क चेष्टेचा विषय होतो. संस्कृत भाषा ही व्याकरणाच्या नियमांनी घट्ट बांधलेली असल्यामुळे कितीही वर्षे झाली तरी त्यात बदल झालेला नाही. आज ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची भाषा ७५० वर्षे जुनी आहे तर दुर्बोध होऊन बसली आहे. पण कित्येक शतकापूर्वीचे रामायणा-महाभारतादी ग्रंथ आज सुद्धा अभ्यासता येऊ शकतात. तर हे ही एक संस्कृतभाषेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

‘भारतात कमीतकमी १५/२० भाषा बोलल्या जातात. तरीही आपण ‘सर्व भारतीय एक आहो’ असे अभिमानाने सांगतो. आज दिसून येते की भारतात प्रत्येक राज्याचा भाषाभिमान उसळून येत आहे. ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्याबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे की एका राज्यातून दुसर्‍या राज्यात गेल्यावर दोन माणसांना संवाद साधण्यासाठी एक तरी समान भाषा नको का ? नाहीतर मराठीने केला कानडी भ्रतार. बायको काय बोलते ते नवर्‍याला कळणार नाही व नवरा काय बोलतो ते बायकोला कळणार नाही असे होईल. पण सर्वच राज्यांना संस्कृतभाषेबद्दल मात्र प्रेम आहे. मग तीच राष्ट्रभाषा का होऊ नये ? अर्थात स्वप्न पहायला तरी काही हरकत नाही. असो

    म्हणून सुभाषितकार सुभाषितात म्हणतात की सर्व मुले संस्कृतभाषेवर प्रेम करणारी होवोत. व ते स्वत:च्या भाषेचा व राष्ट्राचा गौरव वाढवोत. आणि मी म्हणते की तो सुदिन लवकरच येवो.

    आता आपण आपल्या पाठाकडे वळूया. आपण संस्कृत भाषेतील व्याकरणात वापरल्या जाणार्‍या काही शब्दांचा परिचय करून घेत आहोत.

*१३) कारक -* क्रियापदाशी अन्वित होणार्‍या शब्दाला कारक विभक्ती म्हणतात. हा भाग आपण पुढच्या पाठात पहाणार आहोत.

*१४) प्रयोग -* वाक्यामधे क्रियापदाचा वापर कसा झाला आहे, त्यावरून प्रयोग निश्चित होत असतो. मराठी प्रमाणेच संस्कृतमधेही कर्तरी, कर्मणी व भावे असे तीन वाक्यप्रयोग आहेत. कर्तरी प्रयोगात क्रियापद कर्त्याप्रमाणे असते, तर कर्मणी प्रयोगात ते कर्माप्रमाणे असते. भावे प्रयोगात ते कुणाप्रमाणेच नसते. वाक्यरचनेच्या वेळी आपण त्याची ओळख करून घेऊ.

*१५) वचन -* वचन याचा अर्थ बोललेले शब्द. पण व्याकरणात संख्या दाखवण्याकरता या शब्दाचा उपयोग केला जातो. एकवचन म्हणजे एक संख्येने युक्त (एक वस्तु), द्विवचन म्हणजे दोन या संख्येने युक्त (दोन वस्तु) व बहुवचन म्हणजे तीन किंवा तीन पेक्षा जास्त संख्येने युक्त (अनेक वस्तु)

*१६) सकर्मक धातू -* ज्या धातूंना कर्माची आवश्यकता असते त्यांना सकर्मक धातू म्हणतात. उदा. स: खादति = तो खातो. हे वाक्य ऐकल्यावर तो काय खातो हे जाणून घेण्याची इच्छा होते. म्हणजे खाणे या क्रियापदाला कर्माची आवश्यकता आहे. त्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजे ज्या धातूंना कर्माची अपेक्षा असते ते सकर्मक धातू.

*१७) अकर्मक धातू -* ज्या धातूंना कर्माची आवश्यकताच नसते ते अकर्मक धातू. उदा. स: धावति = तो धावतो. हे वाक्य पूर्ण झाले. धावणे ह्या क्रियापदाला कर्माची आवश्यकताच नाही. अशा धातूंना अकर्मक धातू असे म्हणतात.

*१८) काळ -* वाक्यात घडलेली क्रिया केव्हा घडली हे क्रियापदावरून सांगितले जाते.
पर्जन्य: पतति = पाऊस पडतो. - ही क्रिया वर्तमान काळात घडत आहे.
पर्जन्य: अपतत् = पाऊस पडला - ही क्रिया भूतकाळात घडली.
पर्जन्य: पतिष्यति - पाऊस पडेल - ही क्रिया भविष्यकाळात घडेल.
म्हणजे क्रियापदावरून क्रिया केव्हा घडली ते सांगितले जाते त्याला काळ म्हणतात.

    संस्कृतमधे वर्तमानकाळ एकच आहे. भूतकाळ तीन आहेत. व भविष्यकाळ दोन आहेत.

*१९) अर्थ -* संस्कृतमधे अर्थ व्यक्त करण्याकरता . १) आज्ञार्थ २) विध्यर्थ ३) आशीर्वादार्थ व ४) संकेतार्थ अशी चार प्रकारची क्रियापदे वापरली जातात. त्यापैकी आज्ञार्थ व विध्यर्थ यांचे प्रमाण अधिक आहे. १) आज्ञार्थ - इच्छा, अनुमती मागणे, हुकुम सोडणे, उपदेश, विनंती इत्यादी अर्थ व्यक्त करण्याकरता क्रियापदाची आज्ञार्थी रूपे वापरली जातात. २) विध्यर्थ - कर्तव्य, उपदेश, इच्छा हे अर्थ व्यक्त करण्याकरता क्रियापदाची विध्यर्थी रूपे वापरली जातात.

*२०) पुरुष -* पुरुष या शब्दाचा सामान्य अर्थ ‘नर’ असा जरी होत असला तरी व्याकरणात हा शब्द क्रियापदाने सांगितलेली क्रिया करणारा कोण आहे अशा अर्थाने वापरला जातो. व्याकरणात पुरुष तीन आहेत. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष व तृतीय पुरुष. क्रियापदाने सांगितलेली क्रिया करणारे कर्ते हे तीनच प्रकारचे असू शकतात. १) कर्ता जेव्हा स्वत: विषयी सांगतो, बोलतो, तेव्हा तो प्रथम पुरुष. उदा. मी बाजारात जाणार आहे. २) कर्ता जेव्हा ऐकणार्‍याविषयी बोलतो तेव्हा तो द्वितीय पुरुष. उदा. तू सिनेमाला जाणार आहेस का ? ३) कर्ता जेव्हा स्वत: किंवा ऐकणारा यांच्या खेरीज इतरांविषयी विधान करतो तेव्हा तो तृतीय पुरुष. उदा, माधवी स्वयंपाक करते.

*२१) लिंग -* पुरुषजातीचा बोध करणार्‍या शब्दाचे पुंलिंग, स्त्रीजातीचा बोध करून देणार्‍या शब्दाचे स्त्रीलिंग व या दोघांपेक्षा भिन्न शब्दांचे लिंग नपुंसकलिंग असते.

    संस्कृतमधे शब्दांची लिंगव्यवस्था साधारणपणे मराठीतल्या शब्दांसारखीच आहे. काही शब्दांची लिंगे मात्र भिन्न आहेत. मराठीत मित्र शब्द पुं आहे तर संस्कृतमधे तो नपुंसकलिंगी आहे. मराठीत उपाधी शब्द स्त्री. आहे तर संस्कृतमधे तो पुंलिंगी आहे. मराठीत स्वप्न शब्द नपुं आहे तर संस्कृतमधे तो शब्द पुंलिंगी आहे. असा फरकही आहे.

मराठीत तर वस्तु एकच असून सुद्धा त्या वस्तूची लिंगे वेगवेगळी होतात. तिने केसांची वेणी घातली. तिने केसांचा अंबाडा घातला. तिने केसांचे चक्र घातले. केशरचनेलाच तीन लिंगात नावे झाली आहेत. किंवा एखादा शब्द कोणत्या लिंगात वापरावा त्याविषयीही मराठीमधे एकमत नाही. उदा. भडंग. कोणी नपुं शब्द वापरतात तर कोणी स्त्रीलिंगी. मराठीत वाघ-वाघिण, कावळा-कावळीण, वगैरे काही प्राण्यांच्याबाबत स्त्रीलिंगी व  पुंलिंगी शब्दप्रयोग केले जातात. पण ससा हा शब्द पुंलिंगीच वापरला जातो तर मगर हा शब्द स्त्रीलिंगीच वापरला जातो. संस्कृतमधे नक्र-नक्री, वायस-वायसी, बक-बकी असे पुं व स्त्री. शब्द वापरले जातात. 

आता पुढच्या पाठात आपण विभक्तीविचार करू. 


"५ वा पाठ व्याकरणोपयोगी काही शब्दांचा परिचय* " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  



No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...