Saturday, June 6, 2020

४ था पाठ : व्याकरणोपयोगी काही शब्दांचा परिचय भाग १

🎄🌷🎄🌷🎄
*४ था पाठ : व्याकरणोपयोगी काही शब्दांचा परिचय भाग १*

दोन तीन दिवस आपण आपल्या संस्कृत वर्गाची सुरवात ईशस्तवनाने केली. आज आपण संस्कृत-व्याकरणाकार पाणिनी यांच्या स्तवनाने वर्गाची सुरवात करूया.

*येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात् ।*
*कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नम: ॥*

ज्याने प्रत्यक्ष शंकरापासून वर्णांचा समूह प्राप्त केला व सर्व व्याकरण सांगितले म्हणजे व्याकरणाची रचना केली अशा पाणिनीला नमस्कार असो.

    जाता थोडी पाणिनीबद्दल माहिती ऐकूया. पाणिनी हा संस्कृतभाषेचा व्याकरणकार. साधारणपणे इ. स्. पूर्व  १००० ते ५०० वर्षे हा समय त्याचा मानला जातो. याचा अर्थ असा नव्हे की पाणिनीनेच फक्त व्याकरणाचे नियम सांगितले आहेत. व्याकरणाचे नियम सांगणारे त्याच्यापूर्वीही व्याकरणकार होते. पण पाणिनीचे नियम सर्वमान्य झाले. अष्टाध्यायी हा त्याचा ग्रंथ. त्याने आठ अध्यायात सर्व ग्रंथाची सूत्रमय रचना केली आहे. पण सूत्रमय असल्यामुळे नुसता ग्रंथ वाचून हे व्याकरण कोणाला कळणार नाही.
 
    पूर्वीच्या वेळी छपाईकला अस्तित्वात नसल्यामुळे साहित्य तोंडपाठ करून ठेवावे लागत असे. आचार्य एखादा ग्रंथ लिहीत, आपल्या शिष्यांना शिकवीत व त्यांच्याकडून तो पाठ करवून घेत. पुढे शिष्योपशिष्यांच्या द्वारे त्याची लोकांना शिकवण मिळत असे. पण जसजसा कालावधी लोटला तशी साहित्यात प्रचंड भर पडली. मग सूत्रमय ग्रंथलेखनपद्धती अस्तित्वात आली. पण सूत्रमय ग्रंथ सुद्धा स्पष्ट करण्याकरता पुन्हा भाष्यग्रंथांची निर्मिती झाली आणि संस्कृत वाङ्मय विशाल समुद्रासारखे झाले. 

    पाणिनीने शंकराकडून वर्णसमूह प्राप्त केला असे श्लोकात म्हटले आहे. पाणिनी हा प्रथम ‘ढ’ होता म्हणे. इतर शिष्य त्याची मस्करी करत असत. म्हणून त्याने शंकराची उपासना केली. त्याच्या उपासनेने शंकर प्रसन्न झाले व त्यांनी चौदा वेळा आपल्या हातातील डमरू वजवला. त्या चौदा नादांतून पाणिनीला आपल्या ग्रंथाची पहिली पायाभूत १४ सूत्रे स्फुरली व नंतर त्याने त्या सूत्रांवर आधारित आपल्या अष्टाध्यायी ह्या ग्रंथाची रचना केली, अशी एक कथा सांगितली जाते. अर्थात ह्या कथेत यथार्थता किती आहे ते माहित नाही. पण थोडक्यात काय़ तर पाणिनीने व्याकरण रचले. त्याला स्फुरलेली चौदा सूत्रे म्हणजे आपल्या संस्कृत भाषेची वर्णमाला. त्याने ही वर्णामाला चौदा सूत्रात बसवली. उदा.
१) अइउण् २) ऋलृक् ३) एओङ् ४) ऐऔच्
    
 आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया.

    काल म्हटले होते की आज आपण विभक्तिविचार करणार आहोत. पण आज मी काही संस्कृत शब्दांची ओळख करून देणार आहे. व्याकरणात ह्या शब्दांचा वारंवार प्रयोग होत असतो. त्यापैकी काही शब्द दोन तीन दिवसात पाहिले. आज सगळ्यांचा एकत्रित विचार करू.

*१) स्वरादी =* स्वराने सुरू होणारा शब्द. उदा. अरुण - हा शब्द अ ह्या स्वराने सुरू झाला.
*२) स्वरान्त -* स्वराने अंत पावणारा शब्द. उदा. अरुण हा शब्द अ ह्या स्वराने अंत पावला.
*३) व्यंजनादी =* व्यंजनाने सुरू पावणारा शब्द. उदा, मयूर हा शब्द म् ह्या व्यंजनाने सुरू झाला
*४) व्यंजनान्त =* व्यंजनाने अंत पावणारा शब्द. - उदा मरुत् (वारा) हा शब्द त् ह्या व्यंजनाने अंत पावला.
*५) अंत्य वर्ण -* शब्दाच्या शेवटी येणारा वर्ण. तो स्वर किंवा व्यंजन असू शकतो. आपण वरील उदाहरणात पाहिले.
*६) उपांत्य वर्ण -* म्हणजे अंत्य वर्णाच्या पूर्वीचा लगतचा वर्ण उदा. देव = द् + ए + व् + अ असा हा शब्द झाला आहे. यात अंत्य वर्ण अ आहे. त्याच्या आधी व् हे व्यंजन आहे. व् हे व्यंजन अंत्य वर्णाला लागून (उप) असल्यामुळे व् वर्ण हा देव शब्दातील  उपान्त्य वर्ण ठरला.
*७) संधी -* सम् + धा = एकत्र ठेवणे या धातूपासून ‘सन्धि’ हा शब्द बनला आहे. दोन जवळ येणारे वर्ण जेव्हा एकत्र जोडले जातात, तेव्हा त्या वर्णांचा संधी होतो. उदा. सूर्य + उदय = येथे सूर्य मधील अंत्य वर्ण ‘अ’ व उदय शब्दातील पहिला वर्ण ‘उ’ हे एकत्र आले व ‘ओ’ हा वर्ण बनला आणि संधी होऊन सूर्योदय हा शब्द तयार झाला. संस्कृतमधे १) स्वर संधी २) व्यंजनसंधी ३) विसर्गसंधी असे संधीचे तीन प्रकार आहेत.
*८) प्रातिपदिक -* नामाचे मूळ रूप. उदा. देवस्य या पदात देव हा मूळ शब्द आहे. त्या मूळा शब्दाला प्रातिपदिक असे म्हणतात.
*९) पद -* विभक्तीचे प्रत्यय वा क्रियापदांचे प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्याला पद असे म्हणतात.
*१०) प्रत्यय -* पद तयार करण्यासाठी शब्दाच्या पुढे जो घटक येतो, त्याला प्रत्यय म्हणतात. उदा. देव शब्दाच्या पुढे ‘स्य’ हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आला आहे. 
*११) धातू =* म्हणजे क्रियापद्चे मूळ रूप किंवा क्रियावाचक शब्द
*१२) उपसर्ग =* उपसर्ग म्हणजे शब्दाच्या मागे येणारा घटक. उदा. नमामि = नमस्कार करतो. प्रणमामि = नमस्कार करतो इथे नम् धातूच्या मागे प्र हा उपसर्ग लागला आहे. व पुढे मि हा प्रत्यय लागला आहे.
आता आणखी काही शब्दांचा परिचय आपण उद्या करून घेऊया.

या पाठाच्या ध्वनिमुद्रणासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक् करा 


"४ था पाठ : व्याकरणोपयोगी काही शब्दांचा परिचय भाग १ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

सौ. मनीषा अभ्यंकर.








 

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...