Saturday, June 6, 2020

पाठ ३ रा अनुस्वार व जोडाक्षरे यांचे लेखन


काल व परवा दोन दिवस आपण सरस्वतीवंदनाने अभ्यासाला सुरवात केली. कारण सरस्वती ही विद्येची देवता आहे. सरस्वतीप्रमाणेच श्रीगणेश सुद्धा विद्येची देवता आहे. म्हणून आज त्याचे स्मरण करून विद्याभ्यसास प्रारंभ करू या.

*नमाम्यहं गणेशं तं पार्वतीनन्दनं शुभम् ।*
*विनाशयति विघ्नान् नो विद्यां यश्च प्रयच्छति ॥६८-२॥*

अन्वय - य: विघ्नान् विनाशयति, न: च विद्यां यच्छति तं शुभं पार्वतीनन्दनं गणेशं अहं नमामि ।

अर्थ - जो विघ्नांचा नाश करतो आणि आम्हाला विद्या देतो, पार्वतीचा पुत्र शुभदायक अशा गणेशाला मी नमस्कार करतो.
=============================
   
    दोन दिवस आपण आपल्याला माहित असलेल्या गोष्टीच परत माहीत करून घेत आहोत. मुळाक्षरे शिकलो. नंतर शब्द शिकलो. संस्कृतमधे एकूण तीन लिंगे व तीन वचने आहेत याची माहिती करून घेतली. मी आज तुम्हाला संस्कृतलेखनपद्धतीविषयी सांगणार आहे.

    वास्तविक मराठी व संस्कृत यांची लिपी तर एकच देवनागरी आहे. पण तरीसुद्धा संस्कृत श्लोक वाचतांना आपली थोडी दमछाक होते. त्याचे कारण लेखनपद्धतीत आहे.

लेखनपद्धत -

    संस्कृतमधील अनुस्वारयुक्त शब्द लिहिण्याची पद्धत
-
    संस्कृतमधे शब्दावर अनुस्वार फक्त अनुस्वाराचा उच्चार ‘म्’ असा होत असेल तर देतात. एरवी अनुस्वारापुढे वर्गीय व्यंजन असेल तर अनुस्वाराच्या ऐवजी त्या वर्गातील अनुनासिक लिहिण्याची पद्धत आहे. उदा.

*मराठी -* आनंद, कंक, शंख, चंचू, वसंत, व्यंजन, संजय, संचय

*संस्कृत -* आनन्द, कङ्क, शङ्ख, चञ्चू, वसन्त, व्यञ्जन, सञ्जय, सञ्चय

अनुस्वारापुढे वर्गीय व्यंजन नसेल तर अनुस्वारच देतात. उदा. संस्कृत, संस्कृती.

जोडाक्षर लेखन -
जोडाक्षर म्हणजे संयुक्त व्यंजन. एकापेक्षा जास्त व्यंजने एकत्र येऊन ही व्यंजने बनतात. जोडव्यंजनात जे व्यंजन आधी येते ते व्यंजन अर्धे लि हून मग त्यापुढील व्यंजन लिहिले जाते. उदा. - ध्यान, म्लान, अभ्यास, कल्लोल.

संस्कृतमधे ‘ह्’ व्यंजनाने बनणार्‍या जोडाक्षरात ‘ह्’ व्यंजन नेहेमीच आधी असते. उदा. ब्रह्म, ब्राह्मण, ह्रस्व, आह्लाद. हे शब्द ब्रम्ह, ब्राम्हण, असे लिहीत नाहीत. मराठीतील म्हैस शब्द मात्र असाच म् वर्ण आधी लिहून लिहायचा असतो.
मराठीत आपण ‘चिन्ह’ हा शब्द असा लिहून दाखवल्याप्रमाणे लिहीतो. संस्कृतमधे ‘चिह्न’ हा शब्द लिहितांना ह् वर्ण आधी लिहून मग न् वर्ण लिहायचा असतो. व उच्चारण दृष्ट्या सुद्धा चिह्न असेच लिहिणे बरोबर आहे.

‘र्’ व्यंजनाने बनणार्‍या जोडाक्षरांचे दोन प्रकार आहेत.

१) ‘र्’ ह्या व्यंजनाचा आधी उच्चार होणारे शब्द - उदा. सूर्य, कार्य, वर्ग, कर्क, असे शब्द पुढील व्यंजनावर रफार देऊन लिहीतात. सूर्य शब्दात सू र् य् असा क्रम आहे. ‘र्’ हे व्यंजन आधी येऊन नंतर ‘य्’ हे व्यंजन येते. म्हणून ते रफार देऊन य् व्यंजन लिहिले जाते.

२) र् ह्या व्यंजनाचा नंतर उच्चार होऊन जोडवर्ण बनत असेल तर लिखाणाची पद्धत वेगळी आहे.
उदा. वक्र, शक्र, वज्र, प्रभा, अग्र,
वक्र या शब्दात - व क् र् असा क्रम आहे. आता क्, ज्, प्, ग् या अक्षरांमधे उभी रेघ असल्यामुळे त्याचे लेखन क्र्, ज्र्, प्र्, ग्र् असे त्या उभ्या रेघेला एक आडवी रेघ देऊन करतात. वर्णात जर उभी रेघ नसेल तर उष्ट्र, महाराष्ट्र, कृछ्र, असे करतात. कारण ट्, छ् अशा काही वर्णांमधे क्, ग् सारखी एखादी उभी रेघ देऊन केलेली अक्षर रचना नाही.

संस्कृतमधे पाच वर्ण एकत्र येऊन सुद्धा जोडाक्षरे बनलेली आहेत.
उदा, कार्त्स्न्य (पूर्णपणे) - या शब्दात का नंतर र्, त्, स्, न्, य् अशी पाच व्यंजने एकत्र येऊन जोडव्यंजन तयार झाले आहे.

काही जोडाक्षरे लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. उदा. भक्त, प्रश्न, त्रास, क्ष्, ज्ञ् ही जोडाक्षरे अशा पद्धतीनेच लिहीली जातात, हे लक्षात ठेवले पाहिजे.
काही वेळा s हे चिह्न दिसून येते या चिह्नाला अवग्रह चिह्न म्हणतात. लोकेऽस्मिन् वगैरे संधींमधे असे अवग्रह चिह्न दिसून येते. या शब्दात लोके अस्मिन् असे दोन शब्द एकत्र येऊन संधी झालेला आहे. संधी होतांना अ चा लोप झाला त्याऐवजी असे अवग्रह चिह्न येते. ‘अ’ या वर्णाचा लोप झालेला आहे असे हे चिन्ह दाखवते.

    खूप लोक ञ व त्र यात घोळ करतात. यातील तहिले ञ् हे च वर्गातील शेवटचे व्यंजन आहे. तर त्र् हे व्यंजन त् + र् मिळून झालेले जोडाक्षर आहे. तेव्हा मित्र शब्द लिहावा मिञ असे लिहू नये.

आज आपण लेखन पद्धतीचे नियम पाहिले. उद्या आपण विभक्तींची ओळख करून घेणार आहोत. 

"पाठ ३ रा अनुस्वार व जोडाक्षरे यांचे लेखन " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  



सौ. मनीषा अभ्यंकर 

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...