Wednesday, June 3, 2020

पाठ १ ला वर्णमाला


सरस्वति नमस्तुभ्यं सर्वेभ्यो ज्ञानदायिनि ।
सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा वरदा भव ॥ 

प्रत्येक भाषा ही वर्णांनी युक्त असते.
वर्ण म्हणजे मानवी मुखातून बाहेर पडणार्‍या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात.
वर्णांचे स्वर, व्यंजन व पराश्रित किंवा स्वराश्रित असे तीन भाग पडतात.

स्वर - ज्या वर्णांच्या पूर्ण उच्चारासाठी दुसर्‍या वर्णाची आवश्यकता लागत नाही त्यांना स्वर म्हणतात. ते उच्चाराच्या बाबतीत स्वयंपूर्ण असतात. ‘स्वयं राजन्ते इति  स्वरा:’ म्हणजे जे स्वत:च शोभतात ते

व्यंजन - उलट ज्या वर्णांना स्वरांची आवश्यकता असते त्यांना व्यंजने म्हणतात. उच्चारणासाठी ती स्वयंपूर्ण नसतात. जेव्हा व्यंजनात स्वर मिसळलेला नसतो त्यावेळी ती क्, प्, अशी पाय मोडून लिहीली जातात.

जेव्हा व्यंजनात स्वर मिळवून पूर्ण वर्ण तयार होतो तेव्हा त्याला अक्षर तयार म्हणतात.

संस्कृत वर्णमाला १३ स्वर ३३ व्यंजने यांनी युक्त आहे.

स्वर - स्वरांचे प्रकार र्‍हस्व, दीर्घ व प्लुत
ज्याच्या उच्चाराला एक एकक कालावधी लागतो तो स्वर र्‍हस्व, दुप्पट कालावधी लागतो तो दीर्घ स्वर व प्लुतला तिप्पट कालावधी लागतो.

संस्कृतभाषेतील स्वर -
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, लृ, ए, ऐ, ओ, औ  = एकूण स्वर १३
अं आणि अ: यांना संस्कृतमधे स्वर म्हणत नाहीत. अनुस्वार व विसर्ग हे स्वराश्रित किंवा पराश्रित वर्ण आहेत. ते स्वराच्या सहाय्याने येतात. अं, अ: आ: आं वगैरे. त्यांना ‘अयोगवाह’ असेही म्हणतात.
स्वरांची विभागणी दोन गटात होते.
१) र्‍हस्व स्वर - अ, इ, उ, ऋ, लृ
२) दीर्घ स्वर आ, ई, ऊ, ॠ, ए, ऐ, ओ, औ
लृ या स्वराला दीर्घ नाही व ए, ऐ, ओ, औ या स्वरांना र्‍हस्व नाही.

स्वरांची उच्चारस्थाने -
कंठ - अ, आ
मूर्धा - ऋ, ॠ
दंत - लृ
ओष्ठ - उ, ऊ
कंठ-तालु- ए, ऐ. या स्वरांना दोन उच्चारस्थाने लागतात.
कंठ-ओष्ठ - ओ, औ या स्वरांना दोन उच्चारस्थाने लागतात.

व्यंजने - ३३ आहेत. त्यांचे तीन गट पडतात. 
१) वर्गीय व्यंजने - कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग, पवर्ग. ह्यांना स्पर्श वर्ण म्हणतात. ह्या व्यंजनांना वर्गीय व्यंजने म्हणण्य़ाचे कारण म्हणजे प्रत्येक गटातील वर्णांना एकच उच्चारस्थान लागते. वर्ण उच्चारतांना जिभेचा स्पर्श मुखातील ज्या भागाला होतो त्या वर्णाचे ते उच्चारस्थान असते.
क-वर्ग - क्, ख्, ग्, घ्, ङ् = उच्चारस्थान कंठ
क-वर्गातील ही पाचही व्यंजने कंठातून उच्चारली जातात.

च-वर्ग - च्. छ्, ज्, झ्, ञ् = उच्चारस्थान तालु
च-वर्गातील वर्णांचा उच्चार करतांना जिभेचा स्पर्श वरच्या दातावरील हिरडीच्या भागाला करावा लागतो. या उच्चारस्थानाला तालु म्हणतात.
 
ट-वर्ग - ट्, ठ्, ड्, ढ्, ण् = उच्चारस्थान मूर्धा
ट-वर्गातील वर्णांचा उच्चार करतांना जिभेचा स्पर्श तोडांतील वरच्या भागाला होतो. या स्थानाला मूर्धा म्हणतात.

त-वर्ग - त्, थ्, द्, ध्, न् = उच्चारस्थान दंत
त-वर्गातील वर्णांचा उच्चार करतांना जिभेचा स्पर्श वरच्या दातांच्या आतल्या भागाला करावा लागतो. हे स्थान आहे दंत.

प-वर्ग - प्, फ्, ब्, भ्, म् = उच्चारस्थान ओष्ठ
प-वर्गातील वर्णांच्या उच्चारासाठी दोन्ही ओठांची आवश्यकता असते. हे ओष्ठ उच्चारस्थान आहे.
त्याव्यतिरिक्त नासिका हेही उच्चारस्थान आहे. या वर्गीय व्यंजनातील शेवटचा वर्ण उच्चारतांना नासिकेचाही उपयोग केला जातो. ‘मुखसहितनासिकया उच्चार्यमाण: वर्ण: अनुनासिक:’
अशी एकूण उच्चारस्थाने सहा आहेत. कंठ, तालु, मूर्धा, दंत, ओष्ठ व नासिका.

या वर्गीय व्यंजनातील पहिल्या दोन व्यंजनांना कठोर व्यंजने म्हणतात तर उरलेल्या तीन व्यंजनांना मृदु व्यंजने म्हणतात.
व्यंजनांचा दुसरा प्रकार
२) अर्धस्वर - अंत:स्थवर्ण - य्, व्, र्, ल्
यांचे उच्चारण मुखातल्या मुखात होते, म्हणून त्यांना अंत:स्थ व्यंजने म्हणतात
३) उष्मवर्ण  श्, ष्, स्, ह्.

उरलेल्या वर्णांचे उच्चारस्थान -
कंठ - ह्
तालु - य्, श्.
मूर्धा - र् ष्
दंत - लृ, ल्, स्.
दंत-ओष्ठ - व्

ळ, वर्ण लौकिक संस्कृतभाषेत नाही. तर क्ष व ज्ञ ही जोडाक्षरे मानली जातात.
क्ष् = क् + ष् = क्ष्
ज्ञ् = ज्  + ञ्
क्ष् व ज्ञ् ही जोडाक्षरे मानली जात असली तरी क्ष् व ज्ञ् अशीच लिखाणाची पद्धत आहे.

कठोर व मृदु व्यंजने -
    व्यंजनांमधे कठोर व मृदु असे दोन भाग पडतात. ज्या वर्णांच्या उच्चाराला थोडे प्रयत्न जास्त लागतात त्यांना कठोर व्यंजने म्हणतात व ज्यांना कमी प्रयत्न लागतात त्यांना मृदु व्यंजने म्हणतात.

    वर्गीय व्यंजनातील पहिली दोन कठोर व्यंजने व पुढची तीन कोमल व्यंजने. तसेच पुढच्या आठ व्यंजनातील य्, व्, र्, ल् ही कोमल व्यंजने आहेत

कठोर व्यंजने - क्, ख्, च्, छ्, ट्, ठ्, त्, थ्, प्, फ्, श्, ष्, स्, ह्.

मृदु व्यंजने - ग्, घ्, ङ्, ज्, झ्, ञ्, ड्, ढ्, ण्, ब्, भ्, म् , द्, ध्, न्, य्, व्, र्, ल्

   
    आज आपण संस्कृत वर्णांचा म्हणजे मूळाक्षरांचा अभ्यास केला. यात एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे च, छ, ज, झ या वर्णांचा उच्चार मराठी भाषेप्रमाणे दोन प्रकारचा होत नाही. मराठी भाषेत चमचा व चिवडा या दोन शब्दातील च या अक्षराचा उच्चार वेगळा आहे. चिवडा मधील च अक्षराचा उच्चार च् या व्यंजनात य अक्षर मिळाल्यावर जसा होतो तसेच उच्चार संस्कृतमधे च-वर्गातील व्यंजनांचे होतात.

व्यंजनांमधे स्वर मिसळून अक्षर तयार होते.
क् + अ = क
क् + आ = का
क् + इ = कि
क् + ई = की
क् + उ = कु
क् + ऊ = कू
क् + ए = के
क् + ऐ = कै
क् + ओ = को
क् + औ = कौ
क् + अम् = कं
क् + अ: = क:
अशी बाराखडी तयार झाली. अशी सर्व वर्णांची बाराखडी आपण माँटेसरीतच शिकलो. आज फक्त एक नजर टाकूया.

आता एक किंवा अनेक अक्षरे एकत्र येऊन ते जेव्हा अर्थाचा बोध करून देतात, त्यावेळी त्याला शब्द असे म्हणतात. उदा. कमल, निशा, मयूर वगैरे.

    भाषेमधे अक्षरे हा मूळ पाया. नंतर अक्षरे एकत्र येऊन बनणारे शब्द व नंतर शब्द एकत्र येऊन बनणारे वाक्य. मनुष्य भाषेतील वाक्यांच्या सहाय्याने दुसर्‍या मनुष्यापर्यंत आपल्या भावना पोचवू शकतो. आता शब्दांचा अभ्यास आपण उद्या करूया.

काही महत्वाच्या गोष्टी -

    संस्कृत भाषेमधे र्‍हस्व व दीर्घला म्हणजेच शुद्ध लेखनाला महत्व आहे.  कारण र्‍हस्व व दीर्घ लेखनामुळे शब्दांचे अर्थ व वचन बदलते. तसे ते प्रत्येकच भाषेतच असते. पण काटेकोरपणे पाळले जात नाही

कुल = वंश, कूल = किनारा.

अस्थि म्हणजे हाड = अस्थिनी = दोन हाडे, अस्थीनि = अनेक हाडे

संक्षेप हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. समास व संधि ह्यांच्यामुळे भाषेचा संक्षेप होतो. लिहितांना सुद्धा स्वरापुढे स्वर आला की संधी करण्य़ाची पद्धत आहे. सुटे शब्द लिहीत नाहीत.

उदा. आशा आज आली - असे आपण मराठीत लिहीतो. पण संस्कृत मधे आशा अद्य आगच्छत् असे सुटे शब्द न म्हणता आशाद्यागच्छत् असा तिथे संधी केला जातो. पण मग अर्थ कळून घेण्य़ासाठी शब्द संधी सोडवून सुटे करून घ्यावे लागतात. तसेच सामासिक शब्दांमुळे म्हणजे जोडशब्दांमुळे सुद्धा भाषेचा संक्षेप होतो.

    आजच्या धड्यातील महत्वाचे म्हणजे आपल्याला या अक्षरांची उच्चारस्थाने लक्षात ठेवायला हवीत. पुढे त्यांचा शब्दांचा संधी करण्याकरता काय उपयोग आहे ते कळू शकेल. तसेच कठोर व मृदु वर्ण कोणते तेही लक्षात ठेवायला हवेत. त्यांचाही संधीच्या वेळेला काय उपयोग असतो ते कळेल

"पाठ १ ला - शब्द उच्चारासंबंधी" या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  





1 comment:

  1. धन्यवाद . मी संस्कृत शिकण्यास सुरुवात केली आहे . तुमच्या ब्लॉगचा खुप उपयोग होईल . धन्यवाद

    ReplyDelete

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...