Saturday, July 4, 2020

संस्कृतसाहित्याची ओळख - ३) व्यासमहर्षी

उद्या गुरुपौर्णिमा. ह्या आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात.

पाराशर्यवच: सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटं
नानाख्यानककेसरं हरिकथासम्बोधनाबोधितम् ।
लोके सज्जनषट्पदैरहरह: पेपीयमानं मुदा
भूयात्भारतपङ्कजं कलिमलप्रध्वंसि न: श्रेयसे ॥

अर्थ - पराशरपुत्र व्यास मुनी म्हणजे वाणीरूपी सरोवरात उगवलेलं, निर्मल, कमल आहे. ते कमल गीतार्थाच्या सुगंधाने सुगंधित झालेले, नाना उपाख्यानरूपी परागांनी युक्त असलेले, हरिकथारूपी सदुपदेशाने विकसित झालेले, सज्जनसमूहरूपी भ्रमरांकडून नेहेमी आनंदाने सेवन केले जाणारे आणि कलिमलाचा नि:शेष नाश करणारे असे आहे. हे भारतरूपी कमळ आम्हांला कल्याणदायक होवो.

नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे
फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारततैलपूर्ण:
प्रज्वालितो ज्ञानमय: प्रदीप: ॥

फुललेल्या लाल कमळाच्या पाकळीप्रमाणे नेत्र असलेल्या, अति बुद्धिमान हे व्यासमहर्षे, तुम्हांला नमस्कार असो. तुम्ही भारतकथारूपी तेलाने तेवणारा ज्ञानरूपी दीपक प्रकाशित केला आहे.

व्यासमहर्षी हे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. महाभारताची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आणि टी, व्ही वर पण महाभारत मालिकाही पाहिली. पण व्यासांचे कार्य इतकेच आहे का ? महाभारताच्या निर्मिती-प्रक्रियेबद्दल आपण नंतर एकदा जाणून घेऊया.

श्रीव्य़ासांचे व्यक्तिमत्व व कार्य अलैकिक आहे. जणु व्यास म्हणजे संस्कृत साहित्याला पडलेले स्वप्नच आहे. व्यासांनी आपली जन्मकथा महाभारत ह्या आपल्या काव्यात सांगितली आहे. महाराज वसु यांचे वीर्य पाण्यात असलेल्या मासळीने गिळले व तिने तो गर्भ धारण केला. मासेमारी करत असतांना एकदा दाशराज कोळ्याला ती मासळी प्राप्त झाली. तिच्या पोटात मिळालेल्या ह्या मुलीचा त्याने आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. ही मुलगी मोठी झाल्यावर पित्याजवळ असलेली होडी यमुनाद्वीपात धर्मार्थ चालवू लागली. एकदा पराशरऋषी यमुनानदी पार करण्याकरता सत्यवतीच्या होडीत बसले. त्या पराशर व सत्यवतीचा पुत्र म्हणजे व्यासऋषी. सत्यवतीचा हा कौमार्यावस्थेतला पुत्र होता. ह्यांचा जन्म यमुनाद्वीपात झाला. म्हणून त्यांना द्वैपायन म्हणतात. रंगाने ते सावळे असल्यामुळे त्यांना कृष्णद्वैपायन म्हणतात. तसेच त्यांनी चार वेदांचे विभाजन केले, म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. पराशर ऋषींचा पुत्र असल्यामुळे त्यांना पाराशर असेही म्हणतात. पूर्वी मुला-मुलींची नावे त्यांच्या मातापित्यावरून, देशावरून पडलेली असत. उदा, जनक राजाची कन्या ती जानकी, विदेह देशाची राजकन्या म्हणून वैदेही. कुंतीचा मुलगा म्हणून कौन्तेय. कुंतीचे दुसरे नाव पृथा होते. पृथेचा मुलगा तो पार्थ. पांडूचा मुलगा तो पाण्डव, केकय देशाची राजकन्या ती कैकेयी. दोन कैकेयी प्रसिद्ध आहेत. एक रामाला वनात पाठवणारी व दुसरी विराट राजाची पत्नी सुदेष्णा. ही पण केकय देशाची राजकन्या आहे. म्हणून तिलाही कैकेयी म्हणतात. त्या विराटाच्याच आश्रयाला पांडव अज्ञातवासाच्या काळात राहिले होते. तसेच पराशर ऋषींचा पुत्र म्हणून पाराशर असेही व्यासांचे नाव आहे. पराशर ऋषी त्या बालकाला घेऊन गेले. नंतर ह्या बालकाने बदरिकावनात जाऊन तप केले. म्हणून त्यांना बादरायण असेही म्हणतात.

धृतराष्ट्र व पांडू राजा ही व्यासांची संतती आहे हा इतिहास आपल्याला माहीत आहे. सत्यवतीने भीष्मांजवळ आपल्या ज्येष्ठ पुत्राचे वर्णन करतांना म्हटले आहे - ‘सत्यवादी शमपरस्तपस्वी दग्धकिल्बिष:’ की व्यास हे सत्यवादी शांत, तपस्वी व पापशून्य आहेत.

व्यासमहर्षींच्या नावावर पुष्कळ साहित्य जमा आहे. महाभारत ग्रंथाचे कर्ते व त्या कथेतील एक भूमिका वठवणारे म्हणून तर ते आपल्याला सुपरिचित आहेतच. पण व्यासांच्या नावावर १८ पुराणे, अठरा उपपुराणे, ब्रह्मसूत्रे, असे अनेक ग्रंथ आहेत. पूर्वी एकच वेदराशी होती. पाठांतराला सोयीचे व्हावे म्हणून त्यांनी वेदांचे चार भागात विभाजन केले. तसेच पुराणे सुद्धा एकच राशी होती ती पुराणे सुद्धा त्यांनी अठरा भागात विभागली.  बरं त्यांची श्लोकसंख्या सुद्धा किती प्रचंड आहे ? महाभारतच १ लाख श्लोकांचे आहे. तशीच सर्व पुराणांची श्लोकसंख्या सुद्धा चार लाखाच्या वर आहे असे म्हणतात.

एकच मनुष्य एवढ्या अफाट वाङ्मयाची निर्मिती आपल्या आयुष्यात करू शकेल का ? विद्वानांचे मत असे आहे की व्यास हे एका पदाचे नाव असावे. जसे पंतप्रधान. त्या पदावर जो बसतो त्याला पंतप्रधान म्हणावयाचे. तसेच व्यासांनी वेदविभाजनाचे कार्य केले तशा स्वरूपाचे कार्य ज्या ज्या ऋषी-मुनींनी केले असेल, ग्रंथांचे संक्षेप, संपादन, प्रतिसंस्करणासारखे कार्य केले असेल तर त्यांना व्यास या उपाधीने संमानित केले जात असावे. आताचे हे २८ वे कलियुग आहे असे शास्त्र सांगते. या कलियुगातले व्यास हे कृष्णद्वैपायन होते.

वरील श्लोकात व्यासांना वाणीरूपी समुद्रात उगवलेलं कमळ म्हटलं आहे. महाभारतात भगवद्गीता आलेली आहे म्हणून हे कमळ गीतार्थरूपी सुगंधाने सुगंधित झालेले आहे असे म्हटले आहे. हे कमळ नाना उपाख्यानरूपी परागांनी युक्त आहे. कारण पुराणांमधे व महाभारतातही अनेक प्रकारची उपकथानके आलेली आहेत. सर्व साहित्यातून त्यांनी हरिकथा गायलेली आहे. त्यामुळे हे कमळ सदुपदेशाने विकसित झालेले आहे. आणि कमळांवर जसे भुंग्यांचा समूह गुंजारव करतो, तसा त्यांच्या साहित्यावर सज्जनांचा समूह गुंजारव करत असतो. म्हणून त्यांना पुढच्या श्लोकात विशालबुद्धी असे म्हटले आहे. त्यांनीच ज्ञानरूपी दिवा प्रज्वलित केला आहे.

त्यांच्या साहित्यात इतकी विविध कथानके व विषय आलेले आहेत की कोणात्याही प्रकारचे आधुनिक काळातील कथानक त्यांच्या साहित्यात सापडते. म्हणून ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्’ असे म्हटले जाते. म्हणजे व्यासांनी सगळे जग उष्टे केले आहे. म्हणजेच त्यांच्या साहित्यात या जगात घडणार्‍या सर्व गोष्टी दिसून येतात.

आज या व्यासपौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्यांना वंदन करूया.

सौ. मनीषा अभ्यंकर 

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...