Monday, July 6, 2020

पाठ २१ वा विशेषणे

नमस्कार.

आपण पूर्वीच्या पाठात कर्ता व कर्माची वाक्यात कोणती विभक्ती घालायची ते पाहिले. कर्ता प्रथमा विभक्तीत तर कर्म द्वितीया विभक्तीत घालायचे असते. आता तृतीया विभक्तीचा उपयोग सांगण्याआधी आज मी तुम्हाला संस्कृत भाषेमधे विशेषणे कशी वापरावयाची असतात त्याची माहिती करून देणार आहे.

संस्कृत भाषेमधे विशेषणांना पण लिंग असते. उदा. सुन्दर हे विशेषण पाहू. मराठीतील वाक्य पाहू.
१) मी सुंदर मुलगा पाहिला.
२) मी सुंदर मुलगी पहातो.
३) मी सुंदर वन पहातो.
या तिन्ही वाक्यात सुंदर हे विशेषण मुलगा, मुलगी व वन या तीन लिंगातल्या वेगवेगळ्या नामांकरता वापरले आहे. पण तरी ही सुंदर या विशेषणात काहीही फरक झालेला नाही. संस्कृतमधे मात्र विशेषण ज्या नामाकरता वापरावयाचे असते त्या नामाप्रमाणे त्या विशेषणाचे लिंग ठरते. उदा.
१) अहं सुन्दरं बालकं पश्यामि ।
२) अहं सुन्दरां बालिकां पश्यामि ।
३) अहं सुन्दरं वनं पश्यामि ।
इथे बालक, बालिका व वन या तीन शब्दांकरता सुंदर हेच विशेषण वापरले आहे. परंतु नामाच्या लिंगाप्रमाणे विशेषणाचेही लिंग ठेवले आहे. बालकं पुं. द्वि. ए. व. म्ह्णून सुन्दरं हे पण पुं द्वि. ए. व. ते नाम ज्या लिंगाचे, ज्या विभक्तीत व ज्या वचनात असेल तेच लिंग, विभक्ती व वचन विशेषणाचेही असते. बालक शब्द बहुवचनात घेतला तर विशेषण पण बहुवचनात ठेवावे लागेल. उदा अहं सुन्दरान् बालकान् पश्यामि । मी एकच नाही तर अनेक सुंदर मुलांना पहातो. हेही एक संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. नाम प्रथमे पासून संबोधनापर्यत कोणत्याही विभक्तीत असू शकेल. त्याच प्रमाणे विशेषणाचेही लिंग, वचन व विभक्ती योजावयाची आहे.

आता आणखी काही वाक्ये पाहूया.
१) बाल: श्रीराम: चन्द्रं पश्यति । (बाल श्रीराम चंद्र पहातो.)
या वाक्यात बाल हा शब्द श्रीराम या नामाचे विशेषण आहे. म्हणून श्रीराम पुं. प्र. ए. व. असल्यामुळे बाल या शब्दाचेही पुं. प्र. ए. व. आहे.

२) अशोक: अनेकान् शत्रून् जयति । (अशोक अनेक शत्रूंना जिंकतो.)
येथे अनेकान् हे विशेषण शत्रूचे आहे. शत्रु शब्द द्वि. ब. व. त आहे. म्हणून अनेकान् हे द्वि. ब. व. वापरले आहे.

३) जलं स्वच्छं भवति । (पाणी स्वच्छ आहे).
येथे स्वच्छ हे विशेषण जल या शब्दाचे आहे. या वाक्यात जल कर्ता आहे. म्हणून ती प्रथमा समजावयाची. कारण नपुंसकलिंगी शब्दात प्रथमा व द्वितीया सारखीच असते. म्हणून त्याचे स्वच्छ हे विशेषण सुद्धा नपुंसकलिंगी प्र. ए. व. आहे.

४) अहं स्वच्छं जलं पिबामि । या वाक्यात स्वच्छ व जल हे दोन्ही शब्द द्वितीया विभक्तीत समजावयाचे. कारण येथे जल हे कर्म आहे.

विशेषण जेव्हा स्त्रीलिंगात वापरावयाचे असेल तेव्हा अकारांत विशेषण आकारांत करून घ्यावयाचे व मग माला प्रमाणे चालवायचे. उदा. बालक: चञ्चल: अस्ति । बालिका चञ्चला अस्ति ।

अहं चञ्चलं बालकं पश्यामि ।
अहं चञ्चला: बालिका: पश्यामि ।

आज त्याचबरोबर माला या आकारांत स्त्रीलिंगी शब्दाची प्रथमा व द्वितीया विभक्ती सांगणार आहे.

माला (आकारान्त स्त्री.)
माला  माले  माला:  प्रथमा
मालां  माले माला: द्वितीया.
आता खाली स्वाध्यायाकरता काही वाक्ये दिली आहेत. त्यात विशेषणाची योग्य विभक्ती घालावयाची आहे.
 
स्वाध्याय़ २१ वा
खली कंसात दिलेल्या विशेषणांची योग्य ती विभक्ती वापरा.
१) दशरथ: ------- (वृद्ध) अस्ति ।
२) पुस्तकं ------- (उत्तम) अस्ति ।
३) जनक: ------- (चिन्तातुर) अस्ति ।
४) कोकिला ------- (चतुर) अस्ति ।
५) ऋषि: ----- (ध्यानस्थ) भावति ।
६) फलानि ------- (मधुर) सन्ति ।
७) हरिणा: -------- (चपल) सन्ति ।
८) कर्ण: ---- (दानशूर) अस्ति ।
९) छात्रा: ------- (प्रयत्नशील) भवन्ति ।
१०) वनिता -------- (रुष्ट) अस्ति ।
११) अहं -------- (मनोहर) उपवनं पश्यामि ।
१२) पुष्पं -------- (रक्तवर्ण) भवति ।
१३) पर्णानि ----- (हरित) भवन्ति ।
१४) विजया ------- (क्षमाशील) अस्ति ।
१५) जना: -------- (प्रेक्षणीय) स्थलानि पश्यन्ति ।

प्रश्न २ रा - खालील वाक्यातील क्रियापदे व विशेषणे ओळखा.

रविरुदयाचलमागमिष्यति जगत्प्रकाशयितुम् ।
जागृहि स्वामिन् जागृहि स्वामिन्नज्ञानं हन्तुम् ॥ध्रु॥

षड्रिपुस्थानं चञ्चलहृदयमाशामभिपतति
कामक्रोधैर्विप्रकृतमिदं विवेकं उत्सृजति ।
आह्वयामि त्वां स्वामिन् स्वामिन् मार्गं दर्शयितुम्
जागृहि स्वामिन् जागृहि स्वामिन्नज्ञानं हन्तुम् ॥१॥

हा कालच्याच भूपाळीतील श्लोक आहे. तो आपण उद्या समजावून घेऊया. 

" पाठ २१ वा विशेषणे " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

उत्तरे पाठ २१)
१) दशरथ: वृद्ध: अस्ति । (वृद्ध)
२) पुस्तकं उत्तमम् अस्ति । (उत्तम)
३) जनक: चिन्तातुर: अस्ति । (चिन्तातुर)
४) कोकिला चतुरा अस्ति । (चतुर)
५) ऋषि: ध्यानस्थ: भवति । (ध्यानस्थ)
६) फलानि मधुराणि सन्ति । (मधुर)
७) हरिणा: चपला: सन्ति । (चपल)
८) कर्ण: दानशूर: अस्ति । (दानशूर)
९) छात्रा: प्रयत्नशीला: भवन्ति । (प्रयत्नशील)
१०) वनिता रुष्टा अस्ति । (रुष्ट)
११) अहं मनोहरम् उपवनं पश्यामि । (मनोहर)
१२) पुष्पं रक्तवर्णं भवति । (रक्तवर्ण)
१३) पर्णानि हरितानि भवन्ति । (हरित)
१४) विजया क्षमाशीला अस्ति । (क्षमाशील)
१५) जना: प्रेक्षणीयानि स्थलानि पश्यन्ति । (प्रेक्षणीय)

प्रश्न २ रा क्रियापदे ओळखा
आगमिष्यति, जागृहि अभिपतति, उत्सृजति, आह्वयामि

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...