पाठ ९१ वा - नर्मविनोदयुक्त सुभाषिते
१) कमले कमला शेते हरश्शेते हिमालये ।
क्षीराब्धौ च हरिश्शेते मन्ये मत्कुणशङ्कया ॥
अर्थ - मला वाटते ढेकणांच्या भीतीने लक्ष्मी कमळात झोपते, शंकर हिमालयावर झोपतो, तर विष्णु क्षीरसमुद्रात झोपतो.
२) उच्चैरुच्चारितव्यं यत्किञ्चिदजानतापि पुरुषेण ।
मूर्खा बहु मन्यन्ते विदुषामपि संशयो भवति ॥
अर्थ - ज्ञान नसलेल्या माणसाने जे बोलायचे असेल ते मोठ्याने बोलावे. (मोठ्याने बोलणार्या) मूर्खांना फार मान मिळतो व (हळू बोलणार्या) विद्वान माणसाबद्दल सुद्धा संशय निर्माण होतो.
३) असारे खलु संसारे सारं श्वशुरमन्दिरम् ।
हरो हिमालये शेते हरिश्शेते महोदधौ ॥
अर्थ - असार अशा या संसारात सासर्याचे घरच सारभाग आहे. (सासर्याच्या घरीच सुखाचे वास्तव्य होते). उदा. शंकर (त्याच्या सासरी) हिमालय पर्वतावर झोपतो तर विष्णु (त्याच्या सासरी) समुद्रात झोपतात.
४) उष्ट्राणां वै गृहे लग्नं गर्दभा: स्तुतिपाठका: ।
परस्परं प्रशंसन्ति अहो रूपमहो ध्वनि: ॥
अर्थ - उंटांच्या घरी लग्न आहे व तेथे गाढवे स्तुतिपाठक आहेत. (दोघेही) परस्परांची प्रशंसा करतात. (गाढवे उंटाला पाहून म्हणतात) काय सुंदर रूप आहे तर (उंट गाढवांना म्हणतात) काय सुंदर आवाज आहे !
५) किं वाससा तत्र विचारणीयं वास: प्रधानं खलु योग्यताया: ।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां चर्माम्बरं वीक्ष्य विषं समुद्र: ॥
अर्थ - योग्यता ठरवण्यास वस्त्र हेच मुख्य आहे. वस्त्र नेसले नसेल तर लक्ष्मी सुद्धा त्याग करते. पीतांबर पाहून समुद्राने विष्णूला स्वत:ची मुलगी दिली व दिगंबर (नग्न) पाहून समुद्राने शंकराला त्याला विष दिले.
या सुभाषितात शंकर व विष्णू यांचा विशेषणांनी उल्लेख केलेला आहे.
६) धनधान्यप्रयोगेषु विद्यासङ्ग्रहणेषु च ।
आहारे व्यवहारे च त्यक्तलज्ज: सुखी भवेत् ॥
अर्थ - धन, धान्य यांचा वापर किंवा विद्या मिळवणे, आहार, व्यवहार याबाबतीत जो लाज सोडतो तो सुखी होतो.
७) चतुर: सखि मे भर्ता यल्लिखितं तत् परो न वाचयति ।
तस्मादप्यधिको मे स्वयमपि लिखति स्वयं न वाचयति ॥
अर्थ - एक मैत्रिण - हे सखि, माझा पती चतुर आहे. तो जे लिहितो ते दुसरा वाचू शकत नाही.
दुसरी मैत्रिण - अगं तु्झ्यापेक्षा सुद्धा माझा पति वरचढ आहे, तो स्वत: जे लिहितो ते तो स्वत:च वाचू शकत नाही.
८) वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदर ।
यमस्तु हरति प्राणान् वैद्य: प्राणान् धनानि च ॥
अर्थ - हे यमाच्या सख्खा भाऊ असलेल्या वैद्यराजा, तुला नमस्कार असो. यम फक्त प्राणच नेतो. पण वैद्य प्राण व धन दोन्ही नेतो.
९) वैद्यराज नमस्तुभ्यं ब्रह्मदेवसहोदर ।
ब्रह्मा तु सृजति सृष्टिं प्राणान् वैद्यस्तु रक्षति ॥
अर्थ - हे ब्रह्मदेवाच्या सख्या भाऊ असलेल्या वैद्यराजा, तुला नमस्कार असो. ब्रह्मदेव तर फक्त सृष्टी निर्माण करतो, वैद्य मात्र प्राणांचे रक्षण करतो.
No comments:
Post a Comment