पाठ ९५ वा - उपदेश (विध्यर्थी सुभाषिते)
१) दृष्टिपूतं न्यसेत् पादं वस्त्रपूतं पिबेत् जलम् ।
सत्यपूतां वदेत् वाणीं मन:पूतं समाचरेत् ॥४१-२॥
अर्थ - दृष्टीने पारखून पाऊल ठेवावे, वस्त्राने गाळून पाणी प्यावे. सत्याने पवित्र झालेली वाणी बोलावी व मनाने पवित्र आचरण करावे
२) सर्वथा सन्त्यजेद्वादं न कञ्चिन्मर्मणि स्पृशेत् ।
सर्वान् परित्यजेदर्थान् स्वाध्यायस्य विरोधिन: ॥४१-८॥
अर्थ - सर्वप्रकारचे वादविवाद टाळावेत, कोणाच्याही मर्मस्थानी स्पर्श करू नये, विद्याभ्यासाच्या आड येणार्या सर्व प्रतिकूल गोष्टींचा त्याग करावा.
३) यस्मिन् देशे न सम्मान: न प्रीतिर्नच बान्धवा: ।
न च विद्यागम: कश्चिन्न तत्र दिवसं वसेत् ॥४१-१४॥
अर्थ - ज्या देशात सन्मान, प्रेम मिळत नाही, जेथे बांधव नाहीत व विद्याही मिळत नाही तेथे एक दिवसही राहू नये.
४) यद्यत् परवशं कर्म तत्तद् यत्नेन वर्जयेत् ।
यद्यदात्मवशं तु स्यात् तत्तत् सेवेत यत्नत: ॥४१-३७॥
अर्थ - जे जे कर्म पराधीन आहे ते ते प्रयत्नपूर्वक वर्ज्य करावे. जे जे स्वाधीन आहे ते ते कर्म प्रयत्नपूर्वक करावे.
५) श्रेष्ठं जनं गुरुं चापि मातरं पितरं तथा ।
मनसा कर्मणा वाचा सेवेत सततं सदा ॥४१-४६॥
अर्थ - श्रेष्ठ लोक, गुरुजन, आई, वडील यांची मनाने, कृतीने व वाणीने सेवा करावी
६) धर्मेण राज्यं विन्देत धर्मेण परिपालयेत् ।
धर्ममूलां श्रियं प्राप्य न जहाति न हीयते ॥५५-१०॥
अर्थ - धर्माने राज्य मिळवावे, धर्मानेच त्याचा सांभाळ करावा. धर्माने मिळवलेली संपत्ती अशा माणसाचा त्याग करत नाही व ती संपत्ती सुद्धा नाहीशी होत नाही.
७) खरं श्वानं गजं मत्तं मूर्खं च बहुभाषिणम् ।
कृष्णसर्पं कुमित्रं च दूरत: परिवर्जयेत् ॥४१-२३॥
अर्थ - गाढव, कुत्रा मदोन्मत्त हत्ती, पुष्कळ बडबडणारा मूर्ख, कृष्णसर्प, वाईट मित्र यांना लांबूनच टाळावे.
No comments:
Post a Comment