Saturday, January 16, 2021

पाठ ९३ वा - व्याकरणकार पाणिनी

पाठ ९३ वा - व्याकरणकार पाणिनी


आज संस्कृत ग्रंथकारांमधील महत्वाचा ग्रंथकार व्याकरणकार पाणिनी याची ओळख करून घेणार आहोत. 


भाषा आधी निर्माण झाली त्यातील वाक्यप्रयोगांची व्यवस्था नीट लावण्यासाठी नंतर व्याकरणशास्त्राची निर्मिती झाली.


व्याकरण शब्दाची व्युत्पत्ती अशी दिली जाते - ‘व्याक्रियन्ते व्युत्पाद्यन्ते साधुशब्दा अस्मिन् अनेन वा इति व्याकरणम्ज्या शास्त्रावरून शब्दांची व्युत्पत्ती कळून येते म्हणजेच वाक्यामधे येणारा प्रत्येक शब्द कशाप्रकारे निष्पन्न झालेला आहे हे कळून येते त्यानुसार शुद्ध भाषा कशी बोलायची, कशी लिहावयाची ते कळते वाक्याचा अर्थ समजण्याचे सामर्थ्य येते त्याला व्याकरण असे म्हणतात. 


व्याकरणशास्त्र केव्हा निर्माण झाले हे बरोबर सांगणे कठीण असले तरी वैदिकयुगातच व्याकरणशास्त्र निर्माण झालेले होते. कारण चारही सांहितांमधे व्याकरणाच्या दृष्टीने अनेक पदांची व्युत्पत्ती सांगितलेली आहे. अर्थातच तोपर्यंत संस्कृत व्याकरणाशास्त्राची प्रत्यय, धातु, उपसर्ग, सामासिक शब्द इत्यादी विषयांची मांडणी झालेली होती. रामायणाच्या रचनेपर्यंत शास्त्रशुद्ध व्याकरणाचे अध्ययन अध्यापन यांची बैठक पक्की झाली होती. शाकटायन, य़ास्क वगैरे भाषाशास्त्रज्ञांनी व्याकरण-विषयक अनेक गोष्टी प्रकाशात आणलेल्या होत्या. 


व्याकरणाकारांच्या सुदीर्घ परंपरेचा ऐतिहासिक केंद्रबिंदू पाणिनी आहे. कारण व्यकरणशास्त्राची सुव्यवस्थित मांडणी आपल्याअष्टाध्यायीया ग्रंथात पाणिनीने केली म्हणून त्याला संस्कृतभाषेचा व्याकरणकर्ता असे म्हणतात. आणि उत्तरवर्ती जे व्याकरणाचे आचार्य झाले त्यांनी आपले व्याकरणावरील ग्रंथ पाणिनीला केंद्रबिंदू मानून रचले आहेत. त्यामुळे ऐतिहासिक व्याकरणाच्या अध्ययनाचा केंद्रबिंदु पाणीनी व्याकरण हा आहे. पण त्या आधी व्याकरणाकार झालेच नाहीत असे नाही. परंपरेने सर्व ग्रंथाचे कर्तृत्व ब्रह्मदेवाकडे दिले जाते. ब्रह्मा, बृहस्पती, इंद्र, भरद्वाज वगैरे आदिम व्याकरणकार मानले जातात. पाणीनीने आपल्या ग्रंथात आपिशली, काश्यप, गार्ग्य, गालव, चाक्रवर्मण, भारद्वाज, शाकटायन, शाकल्य, सेनक स्फोटायन अशा दहा व्याकरणकारांची नावे दिली आहेत. पाणिनीच्या आधी होऊन गेलेल्या २३ व्याकरणाकाराची माहिती इतिहासाला ज्ञात आहे. 


नेहेमीप्रमाणेच पाणिनीचा काल कोणता हा विवाद्य मुद्दा आहे. व्याकरणशास्त्रावर इतिहासग्रंथ लिहिणारे श्रीयुधिष्ठिर मीमांसक यांनी पाणिनीचा काळ महाभरतीय युद्धापासून श्रीकृष्णाच्या अवतारसमाप्तीपर्यंतच्या मधल्या काळात मानला आहे. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल त्याचा काळ . . पूर्व पाचव्या शतकाचा मध्यकाल मानतात. . . पूर्व ३०० ते २४०० वर्षापर्यंत पाणिनीचा काळ वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळा मानलेला आहे. 


पाणिनीविषयी अशी कथा सांगतात की पाणिनी हा अत्यंतविद्यार्थी होता. सर्व सहाध्यायी त्याची कुचेष्टा करत असत. म्हणून पाणिनीने शंकराची उपासना केली. त्याच्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी आपल्या हातातील डमरू चौदा वेळा वाजवला. त्या ध्वनीमधून पाणिनीला अष्टध्यायीला प्राणभूत असणारी मूळ चौदा सूत्रे सुचली. यासंबंधी नंदिकेश्वराची एक कारिका आहे.


नृत्तावसाने नटराजराजो ननाद ढक्कां नवपञ्चवारम्

उद्धर्तुकाम: सनकादिसिद्धानेतद्विमर्शे शिवसूत्रजालम्


सनकादी सिद्धांचा उद्धार करण्याच्या हेतूने नृत्य झाल्यावर नटराज शंकराने १४ वेळा डमरू वाजवला. त्यातून ही १४ शिवसूत्रे प्राप्त झाली.


 त्यांना शंकरांच्या कृपेमुळे प्राप्त झालेली असल्यामुळे माहेश्वरसूत्रे म्हणतात किंवा त्या सूत्रांपसून प्रत्याहार केले जातात म्हणून त्यांना प्रत्याहार सूत्रे म्हणतात. त्या मूळ चौदा सूत्रांवर पाणिनीने अष्टाध्यायीच्या रूपाने व्याकरणाची इमारत बांधली. भाषेच्या क्षेत्रात पाणिनी व्याकरणाने एका नव्या युगाचे प्रवर्तन केले. हे लौकिक संस्कृत साहित्य निर्माण होण्याचे युग होते. या युगात वैदिक साहित्यापेक्षा अनेक गोष्टीत साहित्याची अभिवृद्धी होण्यासाठी नवीन नवीन प्रयोग केले जात होते. ऋग्वेदाची भाषा प्राचीन अंशत: दुर्बोध होऊ लागली तेव्हा वायव्येकडील मध्य भारतातील ब्राह्मणांनी संस्कृत भाषेचे एक अर्वाचीन रूप प्रस्तुत केले. भाषेचे ते रूप साहित्यिकांची भाषा म्हणून प्रतिष्ठित झाले. पाणिनीने या नवीन साहित्यिक भाषेच्या व्याकरणाची रचना केली लौकिक भाषा म्हणून तिला संबोधले. नंतर या लौकिक भाषेचे नाव संस्कृत असे पडले.  


एवंच पाणिनी हा संस्कृतभाषेचा ख्यातिप्राप्त व्याकरणकार होता. अनेक ग्रंथांमधे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल चर्चा केलेली आहे. पुरुषोत्तम देव यांनी त्याची पाणिन, पाणिनी, दाक्षीपुत्र, शालंकी, शालातुरीय आहिक अशी सहा पर्यायी नावे आपल्यात्रिकाण्डशेषकोशग्रंथात दिली आहेत. कोणी पाणिन चा मुलगा तो पाणिनी या व्युत्पत्तीनुसार त्याला पाणिन चा पुत्र मानतात तर कोणी शालंकी या नावावरून त्याच्या पित्याचे नाव शालंक मानतात. पतंजलीने पाणिनीला दाक्षीपुत्र म्हटले आहे. त्यावरून पाणिनीची माता दक्ष कुलातली होती असे ठरते. छंद:शास्त्र (वृत्तशास्त्र) लिहिणारा पिंगल हा पाणीनीचा छोटा भाऊ होता. पाणिनीच्या गुरूंचे नाव वर्ष असे होते. माहेश्वर सुद्धा पाणिनीचे गुरू होते असे म्हणतात पण त्याला कोणाताही आधार नाही. पाणिनीचे अनेक शिष्य होते. त्यातील कौत्स या शिष्याचे नाव लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. पाणिनीचे एक नाव शालातुरीय आहे. त्यावरून तो शालातुर गावाचा रहिवासी असावा असा निष्कर्ष काढला जातो. 


जरी पाणिनीने पाराशर्य शिलाली यांच्या भिक्षुसूत्र नटसूत्र या दोन ग्रंथांचा उल्लेख केला आहे तरीही पाणिनी हाच संस्कृत भाषेचा पहिला व्याकरणकार मानला जातो. पाणिनीने जरी सर्वांगसुंदर असाअष्टाध्यायीहा आपला ग्रंथ प्रस्तुत केला असला तरी पूर्ववर्ती आचार्यांचे त्याच्यावर ऋण नक्कीच होते. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून चालत पाणिनीने ही सर्वांगसुंदर कृती निर्माण केली आहे. थोडक्यात दगडातून शिल्पाक्ती तयार करण्याचे काम जसे पूर्वीच्या अनेक पिढ्या करतात. तसेच व्याकरणावरील ग्रंथांचे लेखन पूर्ववर्ती अनेक लेखकांनी केलेले आहे. या सर्वांच्या सामुहिक प्रयत्नांमुळे पाणिनीला अष्टाध्यायी हा आपला ग्रंथ प्रस्तुत करता आला.


अष्टाध्यायी -

अष्टाध्यायी हा पाणिनीचा सूत्रग्रंथ. सूत्रग्रंथाची व्याख्या अशी केली आहे -


अल्पाक्षरमसंदिग्धं सारवद्विश्वतो मुखम्

अस्तोभमनवद्यं सूत्रं सूत्रविदो विदु:


अत्यंत कमी अक्षरांनी युक्त, परंतु स्पष्टार्थबोधक, निर्दोष असणारा शब्दसमूह म्हणजे सूत्र. टिकाऊ लेखनसाहित्य नसल्यामुळे पूर्वी साहित्य पाठ करून टिकवून ठेवावे लागत असे. पाठ करण्यास सोपे व्हावे म्हणून सूत्रशैली मुद्दामहून विकसित करण्यात आली होती. धर्मसूत्रे, शुल्बसूत्रे, ब्रह्मसूत्रे असे अनेक विषयांवर सूत्रग्रंथ रचले गेले आहेत.


पाणिनीने आपला अष्टाध्यायी हा व्याकरणग्रंथ सूद्धा सूत्ररूपात रचलेला आहे. ह्या ग्रंथाचे आठ अध्याय आहेत. म्हणून त्याचे नाव अष्टाध्यायी असे आहे. प्रत्येक अध्यायाचे चार भाग आहेत. त्यांना पाद असे म्हणतात. पहिली चौदा सूत्रे ही पायाभूत आहेत, त्यावर त्याने या अष्टाध्यायीचा डोलारा उभारला आहे.


चतुर्दशसूत्रे -


) अइउण् ) ऋलृक् ) एओङ् ) ऐऔच् ) हयवरट् ) लण् ) ञमङणनम् ) झभञ् ) घढधष् १०) जबगडदश् ११) खफछटतचटतव् १२) कपय् १३) शषसर् १४) हल्


ह्या पहिल्या चौदा सूत्रात त्याने संस्कृत वर्णमाला दिली आहे. पहिल्या चार सूत्रात सर्व स्वर आले आहेत पुढच्या दहा सूत्रात सर्व व्यंजने आहेत. त्याने व्यंजनांचा क्रम बदलला आहे. प्रत्येक सूत्राच्या शेवटी एकेक व्यंजन दिले आहे. त्यांचा उपयोग प्रत्याहार बनवण्याकरता करायचा आहे. तो शब्दसमूह पुन्हा पुन्हा वापरावा लागू नये म्हणून त्याने ही प्रत्याहाराची शक्कल लढवली आहे. उदा. 


पहिल्या सूत्रातील हा स्वर थ्या सूत्रातील शेवटचा च् हे व्यंजन जोडून अच् असा शब्द बनतो. अच् याचा अर्थ सर्व स्वर.


पहिल्या सूत्रातील हा वर्ण शेवटच्या सूत्रातील शेवटचे ल् हे व्यंजन जोडून अल् हा शब्द तयार होतो. अल् म्हणजे सर्व वर्ण. असे प्रत्याहार करून त्याने नामे बनवली आहेत. प्रत्याहार करतांना सूत्रातला व्यंजन सोडून कोणताही वर्ण घ्यायचा त्यापुढे मात्र त्या सूत्राच्या पुढील कोणत्याही सूत्रातील शेवटचे व्यंजन जोडायचे शब्द बनवायचे. त्या वर्णाच्या मागील सूत्रातील व्यंजन जोडता येणार नाही. 


उदा. एक संधिसूत्र पाहूया.

इको यणचि


यामधे संधी सोडवून इक: यण् अचि असे तीन शब्द दिसतात.


इक: ही इक् शब्दाची षष्ठी आहे. इक् म्हणजे पहिल्या सूत्रातील हा स्वर दुसर्‍या सूत्रातील क् हे व्यंजन. म्हणून इक् = . , , लृ या चार स्वरांचे नाव बनले इक्


यण् ही यण् शब्दाची प्रथमा आहे. यण् मधे पाचव्या सूत्रातील हा वर्ण सहाव्या सूत्रातील शेवटचे ण् हे व्यंजन मिळून यण् शब्द झाला. यण् - य्, व्, र्, ल्


अचि ही अच् शब्दाची सप्तमी आहे. अच् मधे पहिल्या सूत्रातील हा पहिला वर्ण चैथ्या सूत्रातील च् हे शेवटचे व्यंजन मिळून अच् हा शब्द बनला. अच् म्हणजे सर्व स्वर


आता षष्ठीने सांगितलेला वर्ण पहिल्या पदाच्या अंती हवा. सप्तमीने सांगितलेला वर्ण पुढे हवा. प्रथमेने सांगितलेला आदेश आहे.


म्हणून सूत्राचा अर्थ असा झाला की पहिल्या पदाच्या अंती , , वा लृ हे वर्ण असतील त्यापुढे कोणताही स्वर आला तर य्, व्, र्, ल् असे आदेश होतात. चार वर्ण चार आदेश आहेत. म्हणून हे क्रमाने होतील. म्हणून स्वराला य्, स्वराला व्, स्वराला र् आणि लृ स्वराला ल् असा आदेश होईल.


हा संधिनियम पाणिनीने पाच अक्षरात सांगितला. अशाप्रकारे व्याकरणातील सर्व नियमांची त्याने सूत्ररूपाने मांडणी केली आहे. संज्ञा, संधी, समास, दहा गणातील धातूंविषयीची माहिती, शब्दांपासून नवीन शब्द बनवण्याची प्रक्रियेसंबंधीचे तद्धिताचे नियम, धातूपासून बनवण्यात येणार्‍या शब्दांचे म्हणजे कृदन्तांचे नियम, विभक्त्यर्थ नियम वगैरे व्याकरणविषयक सर्व नियमांची माहिती यात आली आहे. असा हा व्याकरणावरचा परिपूर्ण ग्रंथ आहे.

" पाठ ९३ वा - व्याकरणकार पाणिनी " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...