पाठ ११५ वा - समास प्राथमिक माहिती
सामासिक शब्दयोजना हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. समास म्हणजे संक्षेप. गजस्य आननम् इव आननं या ऐवजी गजानन सं सुखं अर्थयते ऐवजी सुखार्थी हा शब्द वापरणे सुटसुटीत आहे. समास म्हणजे ‘सम्यक् अस्येते / अस्यन्ते पदानि इति ।’ म्हणजे ज्यामधे दोन किंवा जास्त पदे योग्य रीतीने ठेवली जातात, त्याला समास असे म्हणतात. समासामधे दोन शब्द एकत्र केले जाऊन एकच सुटसुटीत शब्द बनवला जातो.
समास बनवण्यासाठी कमीतकमी दोन शब्दांची तरी आवश्यकता असते. त्यातील पहिल्या पदाला ‘पूर्वपद’ व दुसर्या पदाला ‘उत्तरपद’ असे म्हटले जाते. या दोन पदातील कोणत्या पदाला प्राधान्य आहे त्यावरून समासांचे प्रकार ठरतात.
उदा. राजसेवक: = राज्ञ: सेवक:
आता राज्ञ: व सेवक: या पदात मुख्यपद कोणते ? व्यवहारात राजाच श्रेष्ठ असतो. त्यावरून राज्ञ: हे पद श्रेष्ठ असे वाटेल. पण व्याकरणात व्यवहारातील कल्पनेवरून शब्दांचा श्रेष्ठपणा ठरत नाही. राजसेवकाला पकडून आणा. असे वाक्य असेल तर त्यात कोणाला पकडून आणले जाईल ? राजाला की सेवकाला ? अर्थातच सेवकाला. म्हणजे येथे सेवक हे उत्तरपद श्रेष्ठ आहे.
तसेच देवमन्दिर या शब्दात देव हे पद महत्वाचे नसून मन्दिर हे पद महत्वाचे आहे.
पूर्वपद किंवा उत्तरपद यांच्या प्राधान्यावरून समासाचे मुख्य चार प्रकार पडतात.
समासांचे मुख्य प्रकार
१) पूर्वपदप्रधान अव्ययीभावसमास
२) उत्तरपदप्रधान तत्पुरुषसमास.
३) उभयपदप्रधान द्वन्द्वसमास
४) अन्यपदप्रधान बहुव्रीहीसमास.
१) पूर्वपदप्रधान अव्ययीभाव समासात पहिले पद नेहेमी अव्यय असते व त्या अव्ययाला महत्व असते. उदा. यथाकालम् अनुरूपम्. येथे यथा, अनु या अव्ययांना महत्व आहे. म्हणून हे अव्ययीभाव समाश झाले.
२) उत्तरपदप्रधान तत्पुरुषसमास.
या समासांमधे दुसर्या पदाला प्राधान्य असते. राजपुरुष, देवमन्दिर ह्या शब्दांमधे उत्तरपद प्रधान आहे.
३) उभयपदप्रधान द्वन्द्वसमास
काही समासात दोन्ही पदांना प्राधान्य असते. उदा. रामलक्ष्मणौ वनं अगच्छताम् । येथे राम व लक्ष्मण या दोन्ही शब्दांना प्राधान्य आहे. दोघेही वनात गेले. म्हणून हा द्वन्द्वसमास झाला.
४) अन्यपदप्रधान बहुव्रीहीसमास.
या प्रकारात समासामधे जे दोन शब्द आलेले असतात त्या दोन्ही शब्दांना महत्व नसून त्यावरून बोधित होणार्या तिसर्याच पदाला प्राधान्य असते. त्याला म्हणतात बहुव्रीही समास.
उदा. चक्रपाणि: = या समासात चक्र व पाणि हे दोन शब्द आलेले आहेत. चक्र ज्याच्या हातात आहे तो विष्णु. या समासात चक्र वा पाणि या दोन्ही शब्दांना महत्व नसून त्यावरून जो विष्णु या शब्दाचा बोध होतो त्या शब्दाला महत्व आहे म्हणून हा अन्यपदप्रधान समास झाला.
व्याकरणाच्या नियमात न बसणारे, केवळ दोन सुप् प्रत्यय म्हणजे विभक्ती प्रत्यय लागलेले दोन शब्द एकत्र येऊन समास बनला असेल तर त्याला केवलसमास, सुप् सुप् समास असे म्हणतात. हा समासांचा पाचवा प्रकार म्हणता येईल.
समास बनवण्याचे नियम -
१) समास नेहेमी दोन विभक्तीप्रत्यय लागलेले शब्द एकत्र आले तरच होऊ शकतात.
२) दोन शब्द एकत्र येऊन समास बनवतांना त्या दोन शब्दांच्या विभक्तींचा लोप करून जोडशब्द करून घेतला जातो.
उदा. - देवस्य मन्दिरम् = देवमन्दिर असा जोडशब्द किंवा सामासिक शब्द तयार होईल.
३) सामासिक शब्द बनवतांना तेथे संधी होत असेल तर केलाच पाहिजे.
उदा. देवस्य इच्छा = देवेच्छा
४) नवीन तयार झालेल्या सामासिक शब्दाला पुन्हा विभक्तीप्रत्यय लावून वाक्यात उपयोगात आणतांना त्या सामासिक शब्दातील उत्तरपदाचे म्हणजे दुसर्या पदाचे लिंग ते त्या सामासिक शब्दाचे लिंग असते.
५) ज्या दोन पदांचा समास होणार आहे ती दोन पदे समासात सुद्धा त्याच क्रमाने आली पाहिजेत.
उदा.
कलायां निपुण: = कलानिपुण: असा सामासिक शब्द तयार होईल. निपुणकला असा शब्द बनणार नाही.
ही झाली समासांची प्राथमिक माहिती. आता आपण एकेका समासाची माहिती एकेका पाठात घेऊया.
No comments:
Post a Comment