पाठ १०५ वा - लेखको भारतस्यास्य भव त्वं गणनायक ।
(सौती हे कथानक शौनकाला सांगत आहेत).
ब्रह्मोवाच -
१) तपोविशिष्टादपि वै विशिष्टान्मुनिसंचयात् ।
मन्ये श्रेष्ठतरं त्वां वै रहस्यज्ञानवेदनात् ॥ १-१-७१॥
अर्थ - (व्यासजी), जगामधे विशिष्ट तपस्या व विशिष्ट कुलामुळे जितके श्रेष्ठ मुनी आहेत, त्यांच्यामधे मी तुम्हाला श्रेष्ठ समजतो. कारण तुम्ही रहस्य जाणलेले आहे. (जगत्, जीव व ईश्वर यांचे जे गुप्त ज्ञान आहे ते करून घेतले आहे.
२) जन्मप्रभृति सत्यां ते वेद्मि गां ब्रह्मवादिनीम् ।
त्वया च काव्यमित्युक्तं तस्मात् काव्यं भविष्यति ॥१-१-७२॥
अर्थ - मी जाणतो की आजीवन तुमची वाणी सत्यभाषण करत आली आहे. आणि तुम्ही आपल्या रचनेला काव्य असे म्हटले आहे. तेव्हा आता (ही रचना) काव्य या नावानेच प्रसिद्ध होईल.
३) काव्यस्य लेखनार्थाय गणेश: स्मर्यतां मुने ।
एवमाभाष्य तं ब्रह्मा जगाम स्वं निवेशनम् ॥ १-१-७४॥
अर्थ - हे मुने, आपले काव्य लिहिण्यासाठी तुम्ही गणेशाचे स्मरण करा. असे त्यांना सांगून ब्रह्मदेव स्वस्थानी निघून गेले.
४) तत: सस्मार हेरम्बं व्यास: सत्यवतीसुत: ।
स्मृतमात्रो गणेशानो भक्तचिन्तितपूरक: ॥१-१-७५॥
अर्थ - नंतर सत्यवतीपुत्र व्यास यांनी गणेशाचे स्मरण केले. व स्मरण करताच भक्ताचे वांछित पूर्ण करणारे श्रीगणेश -
५) तत्राजगाम विघ्नेशो वेदव्यासो यत: स्थित: ।
पूजितश्चोपविष्टश्च व्यासेनोक्तस्तदानघ ॥१-१-७६॥
अर्थ - विघ्नांचा नाश करणारे (गणेश) जेथे वेदव्यास होते तेथे आले. नंतर व्यासांनी पूजा केल्यावर (प्रेमाने आदर-सत्कार केल्यावर) श्रीगणेश बसले. तेव्हा हे निष्पाप शौनका, व्यास त्यांना म्हणाले -
६) लेखको भारतस्यास्य भव त्वं गणनायक ।
मयैव प्रोच्यमानस्य मनसा कल्पितस्य च ॥१-१-७७॥
अर्थ - “हे गणनायका, या भारताचे (महाभारत काव्याचे) तुम्ही लेखक व्हा. मी हे काव्य मनामधे निर्माण केले आहे व मी ते (तुम्हाला) सांगत जाईन.
७) श्रुत्वैतत्प्राह विघ्नेशो यदि मे लेखनी क्षणम् ।
लिखतो नावतिष्ठेत तदा स्यां लेखको ह्यहम् ॥१-१-७८॥
अर्थ - हे ऐकून गणेश म्हणाले, “जर लिहीत असतांना माझी लेखणी क्षणभर जरी थांबणार नसेल तर मी या ग्रंथाचा लेखक होईन.
८) व्यासोऽप्युवाच तं देवमबुद्ध्वा मा लिख क्वचित् ।
ओमित्युक्त्वा गणेशोऽपि बभूव किल लेखक: ॥१-१-७९॥
अर्थ - व्यासांनीही उत्तर दिले की ‘देवा, न समजता मात्र काहीही लिहू नका. ‘हो’ असे म्हणून गणेश (त्या कथेचे) लेखक झाले.
९) ग्रन्थग्रन्थिं तदा चक्रे मुनिर्गूढं कुतूहलात् ।
यस्मिन् प्रतिज्ञया प्राह मुनिर्द्वैपायनस्त्विदम् ॥१-१-८०॥
अर्थ - तेव्हा व्यास कुतुहलाने ग्रंथात गाठ घालू लागले. (कूटश्लोक रचू लागले.) (त्या श्लोकांचा बाह्यत: एक अर्थ असतो तर त्यांचा मथितार्थ वेगळाच असतो). ज्याबाबतीत प्रतिज्ञापूर्वक द्वैपायन व्यासमुनींनी ही गोष्ट सांगितली आहे की -
१०) अष्टौ श्लोकसहस्राणि अष्टौ श्लोकशतानि च ।
अहं वेद्मि शुको वेत्ति संजयो वेत्ति वा न वा ॥१-१-८१॥
अर्थ - ८८०० श्लोक असे आहेत की ज्यांचा अर्थ मी समजतो, शुकदेव जाणतात परंतु संजयाला त्यांचा अर्थ कळला आहे की नाही याबाबतीत शंका आहे.
११) तच्छ्लोककूटमद्यापि ग्रथितं सुदृढं मुने ।
भेत्तुं न शक्यतेऽर्थस्य गूढत्वात् प्रश्रितस्य च ॥१-१-८२॥
अर्थ - हे मुने, व्यासांनी ते कूटश्लोक असे काही रचले आहेत की त्यांच्या आश्रयाने असणार्या अर्थाचा गूढपणामुळे भेद करता येत नाही.
१२) सर्वज्ञोऽपि गणेशो यत् क्षणमास्ते विचारयन् ।
तावच्चकार व्यासोऽपि श्लोकानन्यान् बहूनपि ॥१-१-८३॥
अर्थ - गणेश सर्वज्ञ असून सुद्धा जेव्हा (अर्थ समजून घेण्य़ासाठी) क्षणभर विचार करत असत तोपर्यंत व्यास इतर पुष्कळ श्लोक रचत असत.
No comments:
Post a Comment