पाठ ११०-१ वा - छन्दोविज्ञानम् भाग १ (प्राथमिक माहिती)
छन्द म्हणजे वृत्त. मात्रा अगर अक्षरे यांच्या ठराविक पद्धतीने केलेल्या रचनेला वृत्त असे म्हणतात. या संबंधीचे नियम सांगणारे अनेक ग्रंथ संस्कृतमधे आहेत. त्यात पिंगलाचार्यांनी लिहीलेला ‘छन्द:शास्त्र’ हा ग्रंथ महत्वाचा समजला जातो. केदार भट्ट याने वृत्त रत्नाकर, गंगादास पंडितांचा ‘छन्दोमञ्जरी’ श्रुतबोध (कालिदासाने लिहिलेला असावा अशी समजूत आहे). वगैरे वृत्तांची माहिती देणारे ग्रंथ संस्कृतमधे आहेत.
वेदांमधे गायत्री, जगती वगैरे वृत्ते वापरलेली आहेत ती वैदिक वृत्ते आहेत. रामायण, महाभारत, पुराणे, महाकाव्ये, नाटके वगैरे वाङ्मयात आलेली वृत्ते ही लौकिक वृत्ते आहेत. पिंगलाचार्यांनी वैदिक व लौकिक सर्वच वृत्तांची माहिती दिली आहे. बाकीच्या ग्रंथात फक्त लौकिक वृत्तांची माहिती आढळून येते.
मुळात हे ग्रंथ पाठ करून ठेवण्य़ाच्या दृष्टीने सोपे व्हावेत म्हणून हे ग्रंथ पद्यामधे लिहीलेले असतात. पद्यामधे लिहीलेले हे ग्रंथ पाठ करायला सोपे असतात, परंतु काही वेळेला पद्यरचना करतांना शब्दांची ओढाताण पण करावी लागते. आता दरवेळेला लघु गुरु असं न म्हणता ल, ग असे शब्द त्याकरता वापरलेले असतात. ग्रंथामधे वृत्ताची माहिती देण्याकरता वृत्ताचे जे लक्षण सांगितलेले असते तेही त्या वृत्त्तातच बांधलेले असते. त्यामुळे ते पद्यात रचलेले लक्षण म्हटले की लगेचच ते वृत्त कोणते आहे ते कळून येते. त्यामुळे लघु गुरु या शब्दांकरता ल, ग असे म्हटले आहे. तसेच काही वेळेला वृत्तासाठी अनावश्यक शब्दही घातले जातात, काहीवेळेला अप्रचलित असे समासही केले जातात. पण हे दोष स्वीकारावेच लागतात.
छंदशास्त्रातील पारिभाषिक संज्ञा
१) मात्रा - मात्रा म्हणजे कालाचे अत्यंत छोटे परिणाम. एक ह्रस्व स्वर उच्चारण्यास जेवढा कालावधी लागतो तो काल म्हणजे मात्रा.
ह्रस्व स्वराची १ मात्रा, दीर्घ स्वराच्या दोन मात्रा व प्लुत स्वराच्या तीन मात्रा मोजल्या जातात. व्यंजनाच्या उच्चाराला अर्धी मात्रा इतका काल लागतो. पण वृत्तशास्त्रात स्वरांच्याच मात्रा मोजल्या जातात, व्यंजनांच्या मात्रा मोजल्या जात नाहीत..
२) ल आणि ग
वृत्तशास्त्रामधे ‘ल’ म्हणजे लघु व ‘ग’ म्हणजे गुरु.
३) लघु गुरु अक्षरांचे नियम
लघु अक्षरे - अ, इ, उ, ऋ, लृ या स्वरांनी अंत पावणारी अक्षरे ती लघु अक्षरे. उदा. नम, यात तिन्ही अक्षरे लघु म्हणाजे ह्रस्व आहेत. मानावा यात तिन्ही अक्षरं गुरू म्हणाजे दीर्घ आहेत.
गुरु अक्षरे - दीर्घ अक्षर म्हणजे आ, ई, ऊ, ॠ ए, ऐ या स्वरांनी अंत पावणारी अक्षरे ती गुरु अक्षरे. तसेच अनुस्वारयुक्त अक्षर संन्य़ास कंस यातील सं, कं ही सुद्धा अक्षरं गुरू झाली. व विसर्गयुक्त अक्षरे ही गुरु समजावी. तसेच जोडाक्षराच्या पूर्वीचे अक्षर ह्रस्व असले तरी गुरु समजावे. कारण जोडाक्षर उच्चारतांना मागच्या ह्रस्व स्वरावर जोर येतो. उदा, लब्ध, नित्य, उक्त, कृत्य इत्यादी अक्षरातील अ, इ, उ व ऋ हे स्वर ह्रस्व आहेत. परंतु त्यांच्यापुढे जोडाक्षर आल्यामुळे दीर्घ अथवा गुरु होतात.
चरणाचे शेवटचे ह्रस्व अक्षर जरुरीनुसार लघु किंवा गुरु समजावे. ज्या वृत्ताला शेवटचे अक्षर गुरु असावे लागते, त्या वृत्तातील शेवटचे अक्षर जरी ह्रस्व असले तरी गुरु समजतात. जोडाक्षर जर ह्रस्व स्वराने युक्त असेल तर ते लघुच समजतात. उदा. वस्तु, अस्थि, उपस्पृशति
संस्कृतमधे वृत्तात पद्याची बांधणी करतांना वृत्ताच्या सोयीनुसार मराठीतील प्रमाणे ह्रस्व दीर्घ बदलता येत नाही्. ह्रस्व दीर्घ मुळात जसे आहे तसे योजूनच वृत्तात पद्य रचावे लागते. त्यामुळे शेवटचे अक्षर जरी ह्रस्व असले व वृत्ताला ते गुरु आवश्यक असेल तर लिहीतांना ते ह्रस्वच लिहाय़चे आहे, फक्त मानतांना ते गुरु मानायचे आहे.
चरण - प्रत्येक पद्याचे चार भाग असतात. त्यांना चरण अथवा अंघ्रि असे म्हणतात. या चार चरणांचा सारखेपणा अथवा वेगळेपणा ह्यामुळे वृत्तांचे तीन प्रकार पडतात. सम, अर्धसम व विषम.
वृत्तांचे दोन प्रकार -
काही वृत्तात मात्रांची संख्या ठराविक असते तर काही वृत्तात अक्षरांची संख्या ठराविक असते. त्यामुळे लौकिक वृत्तांचेही दोन प्रकार आहेत.
१) मात्रावृत्त - मात्रावृत्तामधे अक्षरे मोजली जात नाहीत. त्यात अक्षरांची संख्या कमीजास्त असू शकते. पण मात्रा मात्र वृत्ताच्या आवश्यकतेनुसार ठराविक असतात.
२) अक्षरगणवृत्त - वृत्तांमधे मात्रा मोजल्या जात नाहीत तर अक्षरे मोजली जातात. अक्षरांची संख्या ठराविक पाहिजे. तसेच लघु गुरू अक्षरांचा क्रम सुद्धा ठराविकच आवश्यक असतो.
गण - अक्षरगणवृत्तामधे अक्षरांचा लघु गुरु क्रम कसा असावा हे सांगण्यासाठी ह्या शास्त्रामधे तीन तीन अक्षरांचे गट पाडले जातात व त्या गटांना एकाक्षरी नावे दिली जातात. त्या गटांना गण असे म्हणतात. एकूण आठ गण होतात.
१) सर्व ह्रस्व अक्षरे = न गण (नमन) (। । ।)
२) सर्व गुरु अक्षरे = म गण (मानावा) (ऽ ऽ ऽ)
३) पहिले अक्षर लघु व उरलेली दोन अक्षरे गुरु = य गण (यमाचा) (। ऽ ऽ)
४) पहिले अक्षर गुरु व उरलेली दोन अक्षरे लघु = भ गण (भास्कर) (ऽ । ।)
५) मधले अक्षर लघु व उरलेली दोन अक्षरे गुरु = र गण (राधिका) (ऽ । ऽ)
६) मधले अक्षर गुरु व उरलेली दोन अक्षरे लघु = ज गण (जनास) (। ऽ ।)
७) शेवटचे अक्षर लघु व उरलेली दोन अक्षरे गुरु = त गण (ताराप) (ऽ ऽ ।)
८) शेवटचे अक्षर गुरु व उरलेली दोन अक्षरे लघु = स गण (सरला) (। । ऽ)
यति - वृत्तात ज्या ठिकाणी विराम घेतला जातो त्याला यति असे म्हणतात.
११०-२) छन्दोविज्ञानम् भाग २ (मात्रावृत्ते)
१) मात्रावृत्त - वृत्ताच्या या प्रकारात अक्षरांची संख्या न मोजता मात्रा मोजल्या जातात.
१) आर्यावृत्त - (१२-१८ १२-१५) या वृत्तात पहिल्या व तिसर्या चरणात १२ मात्रा असतात व दुसर्या चरणात १८ व चौथ्या चरणात १५ मात्रा असतात.
उदा.
दानं भोगो नाश:, तिस्रो गतय: भवन्ति वित्तस्य ।
यो न ददाति न भुङ्क्ते, तस्य तृतीया गतिर्भवति ॥
दानं भोगो नाश:,
ऽऽ ऽऽ ऽऽ = १२ मात्रा
तिस्रो गतय: भवन्ति वित्तस्य ।
ऽऽ ।।ऽ ।ऽ। ऽ ऽ ऽ = १८ मात्रा
यो न ददाति न भुङ्क्ते
ऽ । ।ऽ। । ऽ ऽ = १२ मात्रा
तस्य तृतीया गतिर्भवति
ऽ। ।ऽऽ । ऽ । । ऽ = १५ मात्रा
२) उपगीति (मात्रा १२-१५ १२-१५)
यदमी दशन्ति दशना, रसना तत्स्वादमनुभवति ।
प्रकृतिरियं विमलानां, क्लिश्यन्ति यदन्यकार्येषु ॥४-४६॥
३) उद्गीति (मात्रा १२-१५ १२-१८)
नलिकागतमपि कुटिलं न भवति सरलं शुन: पुच्छम् ।
तद्वत्खलजनहृदयं बोधितमपि नैव याति मधुरत्वम् ॥६-४२॥
४) गीतिवृत्त (मात्रा १२-१८. १२-१८)
रविरपि न दहति तादृक् यादृक्सन्दहति वालुकानिकर: ।
अन्यस्माल्लब्धपदो नीच: प्रायेण दु:सहो भवति ॥६-२४॥ (१२-१८ १२-१८)
५) अनुष्टुभ् (श्लोक)
लक्षण -
श्लोके षष्ठं गुरु ज्ञेयं सर्वत्र लघु पञ्चमम् ।
द्विचतुष्पादरोर्ह्रस्वं सप्तमं दीर्घमन्ययो: ॥
प्रत्येक चरणात आठ अक्षरं असतात.चारही चरणातील पाचवे अक्षर लघु व सहावे गुरु पाहिजे. दुसर्या व चौथ्या चरणात सातवे अक्षर लघु पाहिजे. पहिल्या व तिसर्या चरणातील सातवे अक्षर गुरु असावे.
यदा यदा हि धर्मस्य
। ऽऽ
ग्लानिर्भवति भारत ।
। ऽ।
अभ्युत्थानमधर्मस्य
। ऽऽ
तदात्मानं सृजाम्यहम् ॥
। ऽऽ
स्वाध्याय
खालील वृत्तातील मात्रा मोजून वृत्त कोणते आहे ते सांगा.
१) अहो दुर्जनसंसर्गात्, सज्जन पुरुषोऽपि दोषमायाति ।
रावणकृतापराधात्, जलधेरपि बन्धनं प्राप्तम् ॥६-६७॥
२) दुर्जनदूषितमनसां, पुंसां सुजनेऽपि नास्ति विश्वास: ।
दुग्धेन दग्धवदन,स्तक्रं फूत्कृत्य पामर: पिबति ॥६-१७॥
३) अद्यापि दुर्निवारं, स्तुतिकन्या वहति कौमारम् । सद्भ्यो न रोचते सा,ऽसन्तोऽप्यस्यै न रोचन्ते ॥५-१६॥
No comments:
Post a Comment