भारतीय दर्शनशास्त्राची सामान्य रूपरेषा
आज आपण भारतीय दर्शनसाहित्याची माहिती करून घेणार आहोत. आपण देवीची आरती म्हणतो दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी’ त्या आरतीत पुढच कडवं आहे.
त्रिभुवनी भुवनी पहाता तुज ऐसी नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडली प्रवाही
ते तू भक्तालागी पावसी लवलाही
यात चारी श्रमले व साही पडली असे म्हटले आहे. कवी म्हणत आहे की ‘हे देवी तुझे वर्णन करता करता चारी श्रमले म्हणजे चारही वेद थकले पण तुझ्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही आणि साही प्रवाही पडली म्हणजे सहा शास्त्रे प्रवाहपतित झाली. त्यांनाही तुझ्या स्वरूपाचे वर्णन करता आले नाही.
ती सहा शास्त्रे म्हणजे आपली भारतीय आस्तिक षड् दर्शने.
सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा, उत्तर मीमांसा.
प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यात ‘दर्शनवाङ्मय’ हे तत्वज्ञानाचे विशाल दालन आहे. ‘दर्शन’ हा शब्द ‘दृश्’ या धातुपासून व्युत्पन्न झालेला आहे. ‘दृश्’ म्हणजे पहाणे, भेटणे, जाणणे, शोधणे, सिद्ध करणे, पुरावा देणे, डोळ्यांना गोचर होणे असे या धातूचे अनेक अर्थ आहेत. पहाणे हे फार व्यापक असते. चर्मचक्षूने पहाणे हे जसे खरे, तसेच ज्ञानचक्षूने म्हणजेच बुद्धीने पहाणे हे सुद्धा तितकेच किंबहुना त्याहीपेक्षा खरे आहे. इतकेच नाही तर साध्या व्यावहारिक बुद्धीने पहाण्यापेक्षा सूक्ष्म, शुद्ध व व्यापक बुद्धीने पहाणे हे सर्व पहाण्यांमधे श्रेष्ठ आहे. शुद्ध बुद्धीला सद्बुद्धी किंवा प्रतिभा असे म्हणतात. त्यामुळे दर्शन या शब्दात नुसते पहाणे एवढाच अर्थ अभिप्रेत नाही तर खरेखुरे ज्ञान असा अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळॆ दर्शन हा शब्द तत्वज्ञान या शब्दाला समानार्थी शब्द आहे. दर्शन म्हणजे अंतिम तत्वाचे ज्ञान, साक्षात्कार असा अर्थ होतो.
मनुष्य हाही एक पशूच आहे. शारीरिक गरजा व मनोभावना या मानव व पशू या दोघांमधेही सारख्याच असतात. त्यादृष्टीने दोघांच्यात काही भेद नाही. पण तरीही मानव हा पशूपेक्षा वेगळा ठरला. कारण दोघांमधे भेद आहे तो विचार करण्याच्या शक्तीत. ऐतरेय आरण्यकामधे माणसाचे लक्षण सांगतांना ऋषी म्हणतात की, “वनस्पतींचे जीवन त्यांच्यातील रसावर अवलंबून असते, प्राण्यांमधे जाणीव दृष्टीस पडते, पण मनुष्यांमधे मात्र विज्ञान म्हणजे बुद्धी कार्य करत असून त्यांचे सर्व व्यवहार बुद्धीवर चालतात.” (ऐतरेय आरण्यक, द्वितीय आरण्यक, अध्याय ३, द्वितीय खंड). मानव या शब्दामधे ‘मन्’ हा धातू आहे. जाणणे, विचार करणे, समजणे असे या धातूचे अर्थ आहेत. त्यामुळे जाणणारा, विचार करणारा, समजून घेणारा तो मानव. आद्य शंकराचार्यांनी ‘व्युत्पन्नचित्त’ असे मानवाला विशेषण लावले आहे. व्युत्पन्नचित्त म्हणजे विशेष विचार करणारा, किंवा तर्क करणारा प्राणी असा त्याचा अर्थ होतो. विचार करून ज्ञान मिळवण्याची शक्ती ही फक्त मनुष्यातच आहे असा मनुष्याचा विशेष गुणधर्म ऑरिस्टॉटलने सुद्धा सांगितला आहे.
मानवामधे पशुत्वाचा अंश असला तरी पशूंना इंद्रियांच्या पलिकडचे जीवन नसते. मनुष्याला इंद्रियांच्या पलिकडचे मानसिक जीवन असते. इंद्रियांना जे दिसते, त्या पलिकडे पशूंची जाणीव जाऊ शकत नसल्यामुळे त्यांची जाणीव वर्तमानातच संकुचित होते. उलट मनुष्य अनादि भूतकाळ व अनंत भविष्यकाळाची कल्पना करू शकतो. त्यामुळेच जन्मलेला प्राणी मृत्यु पावतो हा त्रिकालाबाधित अनुभव आल्यावर मनुष्य त्यादृष्टीने विचार करू लागला. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु:’ ही गोष्ट तर प्रत्येकाच्या अनुभवाची आहे पण मग मृत्यु पावलेला प्राणी सुद्धा पुन्हा जन्म घेतो का, प्राणिमात्र मृत्यु पावतात म्हणजे नेमके काय होते, एका देहापासून दुसरा देह कसा निर्माण होतो, देहापासून देह निर्माण झाला तरी त्यात चैतन्य कसे निर्माण होते, देहातील चैतन्य निघून गेल्यावर देह अचेतन होतो म्हणजे या सृष्टीत चेतन व अचेतन असे दोन भाग असतात का, ही सृष्टी तरी कशी निर्माण झाली असेल, अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे मनुष्य शोधू लागला. आणि या सृष्टीचे मूळ कारण शोधू लागला. या दृश्य जगाचे अवलोकन करून प्राचीन विचारवंतांनी जे व्यवस्थित मत प्रतिपादन केले त्यातूनच ‘दर्शन’ नामक तात्विक स्वरूपाच्या वाङ्मयाचा उगम व विकास भारतात झाला.
‘षड्दर्शने’ हा शब्द भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध आहे. षड्दर्शने म्हणजे सहा शास्त्रे.
गौतमस्य कणादस्य कपिलस्य पतञ्जले: ।
व्यासस्य जैमिनेश्चापि दर्शनानि षडेव हि ॥
या प्रसिद्ध श्लोकात सहा दार्शनिकांचा उल्लेख केला आहे.
१) कपिलांचे सांख्यदर्शन
२) पतंजलींचे योगदर्शन
३) गौतमांचे न्यायदर्शन
४) कणादांचे वैशेषिकदर्शन
५) जैमिनीचे पूर्व मीमांसा दर्शन व
६) व्यासांचे उत्तरमीमांसादर्शन किंवा वेदांत अशी षड्दर्शने आहेत.
पण फक्त सहाच शास्त्रे भारतात प्रचलित होती असे नाही. या व्यतिरिक्तही अनेक दर्शने आहेत. चार्वाकदर्शन, जैनदर्शन, बौद्धदर्शन, रामानुजदर्शन, पूर्णप्रज्ञदर्शन, नकुलीशपाशुपतदर्शन, शैवदर्शन, प्रत्यभिज्ञदर्शन, रसेश्वरदर्शन, औलुक्यदर्शन, अक्षपाददर्शन, पाणिनिदर्शन, अशा अनेक दर्शनांची चर्चा सर्वदर्शनसंग्रहामधे केलेली आहे.
यातील काही दर्शने आस्तिक आहेत तर काही दर्शने नास्तिक आहेत. त्यातील आस्तिक व नास्तिक हे शब्द ईश्वराच्या अस्तित्वाशी निगडित नाहीत. त्यांचा संबंध वेदप्रामाण्याशी आहे. वेदप्रामाण्य मानतात ते आस्तिक व जे मानत नाहीत ते नास्तिक.
दर्शनशास्त्राचा मुख्य विषय मनुष्याचे जीवन हाच आहे. कवी व कादंबरीकार सुद्धा मनुष्याच्या जीवनातील नाना समस्यांवर प्रकाश टाकतात. पण ते समस्येच्या मुळाशी भिडत नाहीत. प्रत्येक कवीचा अथवा कादंबरीकाराचा मानवी जीवनातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न हा भावनिक असतो. कारण ते त्या समस्येवर भावनिक विचार करतात. पण दार्शनिक त्या समस्येचा वैज्ञानिकपद्धतीने विचार करतो. वैज्ञानिक पद्धतीने जीवनाचे अध्ययन करणे हे दर्शनशास्त्राचे काम असते. त्यामुळेच साहित्यात कविता, कादंबरीहून दर्शनशास्त्र हे वेगळ्याप्रकारचे साहित्य ठरले.
मनुष्याचे जीवन संसारातील अनेक गोष्टींशी संबद्ध असते. आपण जमीनीवर रहातो, आकाशाखाली हवेमधे श्वास घेतो, पृथ्वीवर असणार्या पाण्यावर व वनस्पतींवर आपला जीवननिर्वाह चालतो. ती पृथ्वी एक सौरमंडलाचा भाग आहे. त्या सौरमंडलात असंख्य तारे आहेत. अशा या विराट ब्रह्मांडात मनुष्याचे स्थान दिसायला अगदी तुच्छ दिसते. मग मनुष्याचे नेमके स्थान काय आहे, तो जी जी कर्मे करतो त्यांचे मूल्य काय आहे यावर दर्शनशास्त्राने विचार केला. त्यामुळे जगात दु:ख आहे तर ते दूर करण्याचा उपाय कोणता, तो प्रत्यक्ष जीवनात कसा अंमलात आणावयाचा, सध्याचे जीवन अनेक बंधनांनी युक्त आहे. त्यामुळे पूर्ण सुख मिळत नाही. मग या बंधनांतून सुटका कशी करून घ्यावयाची, म्हणजेच मोक्ष कसा मिळवायचा, शुभाशुभ कर्मांची मिळणारी फळे, त्यांचा वैयक्तिक व वैश्विक घटनांमधे सहभाग कोणता, जन्म आहे, मृत्यु आहे मग पुनर्जन्म आहे का, असलाच तर तो कसा असतो, का घ्यावा लागतो, अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह दर्शनवाङ्मयात केलेला असतो.
दर्शनवाङमयाचे आणखी एक वैशिष्ट्य असे असते की त्यांची मांडणी खंडन-मंडनात्मक असते. आपल्या मतावर येणारे वेगवेगळे आक्षेप गृहीत धरून त्या आक्षेपांना त्यात उत्तरे दिलेली असतात. त्यामुळे अशा ग्रंथात पूर्वपक्ष, उत्तरपक्ष अशा स्वरूपाची मांडणी असते. त्यामुळे दार्शनिकाला इतर दर्शनांचाही अभ्यास असावा लागतो. या खंडन-मंडन मांडणीमुळे या ग्रंथांना थोडे क्लिष्टरूप आले. पण याचा एक फायदा असा झाला की सध्या चार्वाक दर्शनाचा ग्रंथ उपलब्ध नाही. पण चार्वाकांची मते सर्व दर्शनकारांनी खोडून काढली आहेत. त्यामुळे त्यांनी खोडून काढलेली मते संगृहीत करून चार्वाकांचा ग्रंथ तयार करता आला.
तत्वज्ञानाचे मुख्य प्रश्न - जगात वावरणार्या विचारी मनुष्यास अनेक प्रश्न पडतात. त्यांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नातून निरनिराळी तत्वज्ञाने निर्माण झाली.
१) जग - हे जग कसे निर्माण झाले? त्यात काही बदल होतो की ते तसेच रहाते ? ते नाश पावते का ? नाश पावले तर ते पुन्हा उत्पन्न होते का ? ते कोण उत्पन्न करते ? त्याच्यावर कोणाचे नियंत्रण असते का ? की या गोष्टी स्वाभाविकपणे घडत असतात ? हे जग दिसते तसेच ते आहे की त्याचे त्यापेक्षा वेगळे स्वरूप आहे ?
२) आपण स्वत: - मी कोण आहे ? मी जन्माला का आलो ? माझा मृत्यु का होतो ? जन्मापूर्वी मी कोठे होतो व मृत्युनंतर मी कोठे जाणार ? मी म्हणजेच देह आहे की माझे वेगळे स्वरूप आहे ? सुखदु:ख कशामुळे प्राप्त होते ? दु:खनिवृत्ति कशी करता येईल ? या जगात मला काय साधायचे आहे ? त्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील ?
यातील सर्व प्रश्नांची उत्तरे काही दर्शनांनी दिली. काही दर्शनांनी काही प्रश्नांची उत्तरे दिलीच नाहीत. काहींनी वेदप्रामाण्याच्या आधारे दिली तर काहींनी आपल्या संस्थापकाचा शब्द खरा मानून उत्तरे दिली.
काही म्हणतात की जग स्वत:सिद्ध आहे. दिसते ते खरे आहे. काहीजण जग भूतांपासून स्वभावानुसार बनले असे म्हणतात. काही यदृच्छेने / कालतत्वामुळे झाले असे मानतात. जग परमाणूंपासून बनले असून ईश्वर परमाणूंना प्रेरणा देतो असे काहींचे मत आहे. काही जण मानतात की ईश्वराने जड प्रकृतिपासून जगाची निर्मिती केली आहे. काही प्रकृतीच जग निर्माण करते असे मानतात तर काही जग म्हणजे ब्रह्माचा विवर्त मानतात.
काही देह म्हणजेच आत्मा मानतात व मरण म्हणजेच मोक्ष मानतात. काहीजण मी हा शरीरापेक्षा वेगळा आहे असे मानतात तर काही मी म्हणजे चैतन्याचाच अंश मानतात. काही मी अविनाशी असून कर्माप्रमाणे पुनर्जन्म होतो असे मानतात. काही मी क्षणिक असून पंचस्कंधांचा समुदाय आहे असे मानतात.
जग व जीव यांना आधारभूत असणारे तत्व कोणते ? कोणत्या प्रमाणांनी त्या तत्वज्ञानाचा शोध घ्यावयाचा ? असा शोध घेतांना विचार कसा करायचा ? शोध लागल्यानंतर ते तत्वज्ञान प्राप्त करण्याकरता आचरण कसे हवे ? मोक्ष म्हणजे काय ? हे तत्वज्ञानाचे मूलभूत प्रश्न आहेत. यांची चर्चा भारतीय दर्शनग्रंथात केलेली आहे. प्रत्येक दर्शनाचे मत वेगवेगळे आहे.
दर्शनग्रंथांमधे प्रामुख्याने पुढील गोष्टींची चर्चा केलेली असते.
१) प्रमाणशास्त्र - आपले मतच बरोबर आहे असे सिद्ध करतांना आपण कोणती प्रमाणे मानली आहेत याची या शास्त्राला चर्चा करावी लागते. प्रमा म्हणजे ज्ञान व प्रमाण म्हणजे ज्ञानाचे साधन. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, ऐतिह्य अशी अनेक प्रमाणे आहेत. त्यापैकी आपण कोणती प्रमाणे मानून अंतिम सिद्धांत प्रस्थापित केला हे दर्शनग्रंथात सांगितलेले असते. चार्वाक फक्त प्रत्यक्षप्रमाण मानतात तर न्यायशास्त्रात अनुमान प्रमाण महत्वाचे मानलेले आहे.
२) तत्वमीमांसा - ही शाखा विश्वतत्वाचे अध्ययन करते. जगाची मूलतत्वे किती व कोणती ? ईश्वर आहे की नाही ? ईश्वर, जीव व प्रकृति ही तीन भिन्न आहेत का ? सृष्टी कशी अस्तित्वात येते ? वगैरे प्रश्नांची उत्तरे तत्वमीमांसेत दिली जातात. चार्वाक प्रकृति हे एकच तत्व मानतात तर सांख्यशास्त्र प्रकृति व पुरुष अशी दोन तत्वे मानते तर वेदांती केवळ ब्रह्म अथवा आत्मा हे एकच तत्व मानतात. काही लोक तत्व परमाणुमय मानतात तर काही शून्य मानतात.
३) तर्कशास्त्र - ज्ञान करून घेण्यासाठी कोणत्या प्रकारे विचार करायचा ? त्यासाठी तर्कशास्त्र हेही दर्शनग्रंथांचे एक महत्वाचे अंग आहे.
४) व्यवहारशास्त्र - व्यवहारशास्त्र म्हणजेच आचरणशास्त्र. तत्वज्ञान करून घ्यायचे असेल तर त्यासाठी माणसाचे आचरण कसे हवे ते यात सांगितले जाते. चांगली कर्मे का करावीत, सत्य का बोलावे, हिंसा का करू नये, कर्माचे फळ कोण भोगतो, ते कोण देतो, मानवी जीवनाचे लक्ष्य काय आहे, कर्म व मोक्ष यात कोणता संबंध आहे, मोक्ष म्हणजे काय, तो कसा प्राप्त होईल यासंबंधी चर्चा आचरणशास्त्रात केली जाते.
५) मनोविज्ञान - प्राचीनकाळी मनोविज्ञान हाही एक दर्शनशास्त्राचा भाग होता. तत्वज्ञानाच्या या अंगामधे मनामधे उठणारे विचारतरंगांचे स्वरूप, त्यांचे नियम, त्यांची कर्मात होणारी प्रवृत्ती व त्यांचा शरीरावर व मानसिक जीवनावर होणारा परिणाम याविषयी अभ्यास केला जात असे.
अशा विविध अंगांमुळे भारतामधे ‘दर्शनवाङ्मय’ सर्व अंगांनी विकास पावले. दर्शनवाङ्मयाचे मूळ ग्रंथ सूत्ररूपात आहेत.
अशाप्रकारे भारतात दर्शन साहित्याचा प्रचंड प्रमाणात विकास झाला. त्यातून भारतीय संस्कृतीची विचाराधारा समजून घेण्यास मदत होते.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment