Sunday, August 2, 2020

पाठ ३७ वा - पंचमी विभक्ती

पाठ ३७ पंचमी विभक्ती

नमस्कार. आज आपण वाक्यात पंचमी विभक्तीचा उपयोग कसा केला जातो ते पहाणार आहोत. वाक्यात अपादान कारकाची पंचमी विभक्ती होते. ज्याच्यापासून एखादी वस्तू विलग होते, त्याला अपादानकारक असे म्हणातात. उदा. वृक्षात् पर्णं पतति । झाडावरून पान पडते. पान आधी झाडाशी संलग्न होते नंतर ते त्याच्यावरून पडले. इथे वृक्ष हा शब्द अपादानकारक ठरला व त्याची पंचमी विभक्ती झाली.  मराठी मधे आपण जे ऊन, हून पासून वरून वगैरे शब्दाला प्रत्यय लावतो, ते पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. 

१) भय व रक्षण या अर्थाच्या धातूंना पंचमी विभक्तीची अपेक्षा असते. उदा. व्याघ्रात् बिभेति = वाघाला घाबरतो. व्याघ्रात् रक्षति = वाघापासून रक्षण करतो.
२) एखाद्या वस्तूपासून दूर घालवणे याअर्थी सुद्धा पंचमी विभक्ती होते. उदा. गुरु: शिष्यं पापात् निवारयति । = गुरु शिष्याला पापासून अडवतो.
३) गुरूंपासून शिक्षण घेणे या अर्थी सुद्धा पंचमी विभक्ती होते. उपाध्यायात् अधीते । = आचार्यांकडून शिक्षण घेतो.
४) जायते, प्रभवति, उद्गच्छति, उद्भवति, निलीयते, प्रतियच्छति (अदलाबदल करतो) या अर्थी सुद्धा पंचमी विभक्ती वापरली जाते. उदा. -
१) ब्रह्मदेवात् लोक: प्रजाय़ते ।
 ब्रह्मदेवापासून लोक निर्माण होतो.
२) हिमालयात् गङ्गा प्रभवति / जायते / उद्ग्च्छति ।
हिमालयामधून गंगा उगम पावते.
३) राजपुरुषात् चौर: निलीयते ।
शिपायापासून चोर लपतो.
४) तिलेभ्य: माषान् प्रतियच्छति ।
तिळांनी उडीद बदलतो. म्हणजे तीळ देऊन उडीद घेतो.
५) दोन वस्तूंमधे तुलना करतांना पंचमी विभक्तीचा वापर करतात. उदा.
सह्याद्रिपर्वतात् हिमालय: उत्तुङ्गतर: ।
सह्याद्री पर्वतापेक्षा विमालय पर्वत उंच आहे.
 तसेच काही ठराविक अव्ययांना सुद्धा पंचमी विभक्तीची अपेक्षा असते.
१) ऋते = शिवाय
- ज्ञानात् ऋते न सुखम् ।
ज्ञानाशिवाय सुख नाही.
२) पूर्वं किंवा प्राक्
सूर्योदयात् पूर्वं / प्राक् नीलेश: उत्तिष्ठति ।
सूर्योदयाच्या आधी नीलेश उठतो.
३) प्रभृति = पासून
शैशवात् प्रभृति स: व्यायामं करोति ।
लहानपणापासूनच तो व्यायाम करतो.
४) पृथक् किंवा विना या अव्ययांना द्वितीया, तृतीया अथवा पंचमी विभक्ती लागते.
स: बन्धो: (बन्धुं बन्धुना) पृथक् वसति ।
तो भावापासून वेगळा रहातो
विद्याया: (विद्यां विद्यया) विना जीवनं पशुतुल्यम् ।
विद्येशिवाय जीवन पशुतुल्य आहे.
५) बहि: = बाहेर
सर्प: बिलात् बहि: न आगच्छति ।
साप बिळाच्या बाहेर येत नाही.

" पंचमी विभक्ती " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...