४७ वा पाठ क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग १)
आपण सामान्यपणे क्रियापदांची रूपे कशी बनतात त्याची माहिती घेतली. पहिल्या व सहाव्या गणाच्या धातूचे विकरण ‘अ’ असे आहे, चौथ्या गणाचे विकरण ‘य’ आहे तर दहाव्या गणाचे विकरण ‘अय’ असे आहे. मूळ धातूमधे ते विकरण जोडून धातूचे अंग तयार केले जाते व त्यानंतर त्याला प्रत्यय लावले जातात. एक, चार, सहा व दहा या गटातील धातूंची अंगे अकारांत होतात. धातूचे अंग तयार करून घेतल्यावर मग प्रत्यय लावून पहिल्या गणाची नमति, वन्दते; चौथ्या गणाची तुष्यति, युध्यते; सहाव्या गणाची क्षिपति, क्षिपते व दहाव्या गणाची कथयति, कथयते अशी धातू पासून क्रियापदाची परस्मैपदी व आत्मनेपदी रूपे तयार होतात.
क्रियापदातील रूपात धातू, विकरण व प्रत्यय असे तीन घटक असतात. धातूवरून क्रियेचा अर्थ कळतो, विकरणावरून गण समजतो व प्रत्ययावरून पुरुष, वचन, काळ किंवा अर्थ यांचा बोध होतो.
पहिल्या व सहाव्या गणाच्या ‘अ’ या विकरणाविषयी माहिती -
पहिल्या गणाचे विकरण पाणिनीच्या परिभाषेत शप् (श् + अ + प्) असे आहे तर सहाव्या गणाचे विकरण नुसते ‘श’ (श् + अ) असे आहे. प्रत्यक्षात पहिल्या गणाच्या विकरणांमधील ‘श्’ चा व अंत्य ‘प्’ चा लोप होऊन नुसते अ विकरण धातूला लागते. तर व सहाव्या गणातील ‘श’ यातील ‘श्’ चा लोप होतो व ‘अ’ हे विकरण धातूला लागते. त्यातील ‘शप्’ हे पहिल्या गणाचे विकरण लागतांना त्या विकरणातील ‘प्’ या अनुबंधामुळे संधीच्या नियमानुसार धातूचे अंग बनवतांना त्या धातूमधे बदल होतो. परंतु सहाव्या गणामधे असा ‘प्’ हा अनुबंध नसल्यामुळे सहाव्या गणाच्या धातूचे अंग बनवतांना धातूमधे बदल होत नाही व लिख् - लिखति, क्षिप् - क्षिपति, क्षिपते, मिल् - मिलति अशी रूपे तयार होतात. म्हणून पहिल्या गणाचे ‘अ’ हे विकरण विकारक आहे. म्हणजे धातूमधे बदल करणारे आहे. पण सहाव्या गणाचे ‘अ’ हे विकरण अविकारक आहे. कारण ते विकरण धातूमधे बदल घडवून आणत नाही.
पहिल्या गणातील भू-भव्, बुध्-बोध् वगैरे धातूंमधे बदल होण्याची कारणे -
आता शप् प्रत्यय लागतांना पहिल्या गणाच्या धातूचे अंग तयार करतांना त्या धातूमधे का व कसे बदल होतात ते पहावयाचे आहे. तत्पूर्वी विकरण लावून धातूचे अंग तयार करणे सुलभ व्हावे म्हणून धातूंचे वर्गीकरण कसे केलेले आहे ते पाहू.
धातूंचे वर्गीकरण -
प्रथमत: धातूंचे वर्गीकरण दोन गटात होते.
१) व्यजनान्त धातू - हिंस्, लप्, जप्, गम्.
२) स्वरान्त धातू - नी, क्षि, म्लै, श्रि, हृ, दा, पा, शी, हे स्वरान्त धातू आहेत.
असे स्वरान्त व्यंजनान्त धातू सर्व गणांमधे असतात. त्यातही स्वरान्त धातूंची संख्या व्यजनान्त धातूंपेक्षा कमी आहे.
यातील दोन्ही प्रकारच्या धातूंचे पुन्हा प्रत्येकी दोन गट पडतात.
व्यंजनान्त धातूंचे दोन गट -
१) इ, उ, ऋ, लृ हे ह्रस्व सोडून इतर स्वर उपान्ती आलेले व्यंजनान्त धातू.
उदा. पत्, धाव्, ईक्ष्, सेव् वगैरे.
अन्त्य वर्ण म्हणजे शेवटचा वर्ण व उपान्त्य वर्ण म्हणजे शेवटून दुसरा वर्ण.
पत् = प् + अ + त् म्हणजे येथे अ हा उपान्त्य वर्ण आहे.
धाव् = ध् + आ + व् = येथे आ हा उपान्त्य वर्ण आहे.
ईक्ष् = ई + क्ष् = येथे ई हा उपान्त्य वर्ण आहे.
सेव् = स् + ए + व् = येथे ए हा उपान्त्य वर्ण आहे.
आता नियम असा आहे की ह्रस्व इ, उ, ऋ आणि लृ सोडून कोणताही स्वर उपान्त्य स्थानी आला तर धातूमधे बदल होत नाही. म्हणून वरील धातूंची पतति, धावति, ईक्षते, सेवते अशी सरळ रूपे तयार होतात.
२) व्यंजनान्त धातूंचा दुसरा गट आहे उपान्ती इ, उ, ऋ, लृ हे ह्रस्व स्वर असलेले व्यंजनान्त धातू. उदा. सिध्, बुध्, कृष्, क्लृप्. या धातूंमधे क्रमाने इ, उ, ऋ, लृ हे ह्रस्व स्वर उपान्त्य स्थानी क्रमाने आलेले आहेत.
सिध् = स् + इ + ध् = उपान्त्य वर्ण आहे इ
बुध् = ब् + उ + ध् = उपान्त्य वर्ण आहे उ
कृष् = क् + ऋ + ष् = उपान्त्य वर्ण आहे ऋ
क्लृप् = क् + लृ + प् = उपान्त्य वर्ण आहे लृ
या गटातील पहिल्या गणाच्या धातूंपुढे ‘अ’ हे विकरण आले असता उपान्त्य वर्णांना गुणादेश होतो. पाणिनी व्याकरणात ‘अ, ए, ओ’ या स्वरांना गुण म्हटले आहे. म्हणजे इ, उ, ऋ आणि लृ यांना अनुक्रमे ए, ओ, अर्, अल् असे आदेश होतात. म्हणजे ‘इ’ च्या जागी ए येतो, ‘उ’ च्या जागी ‘ओ’ येतो. ‘ऋ’ च्या जागी ‘अर्’ येतो तर ‘लृ’ च्या जागी अल् असा आदेश होतो. आदेश म्हणजे पहिला वर्ण हटवून त्या जागी दुसरा वर्ण येतो. उदा.
चित् (१ प. प.) = ज्ञान होणे, कळणे, समजणे
चित् + अ (शप्)
= च् + इ + त् + अ (शप्)
= च् + ए + त् + अ (शप्)
= चेत् + अ (शप्)
= चेत असे धातूचे अंग तयार झाले.
बुध् + शप्
= ब् + उ + ध् + शप्
= ब् + ओ + ध् + शप्
बोध् + अ (शप्)
बोध
अशाप्रकारे बुध् मधील ‘उ’ या वर्णाला ओ, कृष् यातील ‘ऋ’ या वर्णाला अर् व क्लृप् यातील लृ या वर्णाला अल् असा गुणादेश होऊन बोध, कर्ष व कल्प अशी धातूची अंगे तयार होतात.
तेव्हा तो धातू सहाव्या गणातील आहे की पहिल्या गणातील आहे हे ओळखण्याची ही एक खूण झाली की असा बदल होत असेल तर तो धातू पहिल्या गणातील आहे. अर्थात वर दिलेल्या पहिल्या गटातील धातू मात्र असे ओळखता येणार नाहीत.
स्वरान्त धातूंचे दोन गट -
३) आ, इ-ई, उ-ऊ, ऋ-ॠ हे स्वर अन्त्य असलेले धातू. म्हणजेच ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर सोडून इतर स्वर अन्त्यपदी असलेले धातू
उदा. जि, नी, द्रु, भू, कॄ हे पहिल्या गणाचे धातू आहेत.
या गटातील धातूंच्या पुढे जेव्हा पहिल्या गटातील ‘अ’ (शप्) हे विकरण आले असता इ-ई, उ-ऊ, ऋ-ॠ या अंत्य स्वरांना गुणादेश होतात व मग संधीनियमानुसार धातूचे अंग बनते.
उदा. जि (१. प. प.) = जिंकणे
जि + अ (शप्)
= ज् + इ + अ
= ज् + ए + अ
= जे + अ
जय् + अ = जय
आता जे मधील ए स्वरापुढे अ आल्यामुळे त्या अन्त्य ए वर्णाला ‘अय्’ असा आदेश होईल. ए, ओ, ऐ, औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला की त्या अन्त्य स्वरांना क्रमाने अय्, अव्, आय्, आव् असे आदेश होतात. म्हणून
जे + अ
= ज् + ए + अ
= ज् + अय् + अ
= जय् + अ
= जय
असे धातूचे अंग तयार झाले. त्याप्रमाणेच नी-नय्, द्रु-द्रव्, भू-भव्, सृ-सर्, तृ-तर् असा बदल होतो.
४) धातूंच्या वर्गीकरणाचा चौथा प्रकार आहे की काही धातूंच्या अंती संयुक्त स्वर असतो. संयुक्त स्वर म्हणजे ए, ऐ, ओ, औ. उदा. धे, गै, ध्यै. संयुक्त स्वरांपैकी ‘औ’ या वर्णाने अंत पावणारे धातू नाहीत.
धातू संयुक्त स्वराने युक्त असेल तर पहिल्या गणाचे ‘अ’ हे विकरण लागतांना संधिनियमानुसार त्या धातूतील ए, ओ, ऐ, औ या स्वरांना अय्, अव्, आय्, आव् असे क्रमाने आदेश होतात. म्हणजे ए वर्णाला अय्, ओ वर्णाला अव्, ऐ वर्णाला आय् आणि औ वर्णाला आव् असे आदेश होतात.
उदा. गै + अ (शप्)
= ग् + ऐ + अ (शप्)
= ग् + आय् + अ (शप्)
= गाय् +अ (शप्)
= गाय हे धातूचे अंग तयार झाले व पुढे प्रत्यय लावून गायति असे रूप तयार होईल.
प्रथम गणामधे काही अनियमित धातू आहेत. असे काही धातू आहेत की मूळ धातू एक असतो व त्याचे चालणारे रूप वेगळेच असते. विकरण लागण्यापूर्वी तसे आदेश होतात. उदा. गम्-गच्छ्, पा-पिब्, ऋ-ऋच्छ्, घ्रा-जिघ्र्, दा-यच्छ्, दृश्-पश्य, यम्-यच्छ्, सद्-सीद्, स्था-तिष्ठ्. हे धातू परस्मैपदी आहेत व त्यांची गच्छति, पिबति, ऋच्छति, जिघ्रति अशी रूपे होतात.
" क्रियापदांच्या रूपांविषयी अधिक माहिती. (भाग १) " या Audio साठी खाली क्लिक् करा :
No comments:
Post a Comment