पाठ ७४ वा - अनद्यतन भूतकाळ (प्रथम भूतकाळ)
संस्कृतमधे भूतकाळाचे तीन प्रकार आहेत. १) अनद्यतन (प्रथम भूतकाळ) २) परोक्ष भूतकाळ (द्वितीय भूतकाळ) ३) सामान्य भूतकाळ (तृतीय भूतकाळ)
अद्यतन म्हणजे आजचा. आजचा नाही तो अनद्यतन. म्हणून अनद्यतन भूतकाळ असे म्हणातात.
परस्मैपदी भूतकाळाचे प्रत्यय खालीलप्रमाणे आहेत.
अम् व म प्रथम पुरुष
स् (:) तम् त द्वितीय पुरुष
त् ताम् अन् तृतीय पुरुष
या भूतकाळाचे वैशिष्ट्य असे की धातूला आधी ‘अ’ असा आगम होतो. त्याला अडागम असे म्हणतात व नंतर विकरण मिसळून प्रत्यय लावले जातात.
नम् (१ प. प.) = नमस्कार करणे
अ + नम् + अ + अम् = अनमम्
अनमम् अनमाव अनमाम प्रथम पुरुष
अनम: अनमतम् अनमत द्वितीय पुरुष
अनमत् अनमताम् अनमन् तृतीय पुरुष
कुप् (४ प.) = रागावणे
अ + कुप् + य + प्रत्यय
अकुप्यम् अकुप्याव अकुप्याम प्रथम पुरुष
अकुप्य: अकुप्यतम् अकुप्यत द्वितीय पुरुष
अकुप्यत् अकुप्यताम् अकुप्यन् तृतीय पुरुष
लिख् (६ प.) = लिहीणे
अ + लिख् + अ + प्रत्यय
अलिखम् अलिखाव अलिखाम प्रथम पुरुष
अलिख: अलिखतम् अलिखत द्वितीय पुरुष
अलिखत् अलिखताम् अलिखन् तृतीय पुरुष
तड्-ताड् (१०) = मार देणे
अ + ताड् + अय् + प्रत्यय
अताडयम् अताडयाव अताडयाम प्रथम पुरुष
अताडय: अताडयतम् अताडयत द्वितीय पुरुष
अताडयत् अताडयताम् अताडयन् तृतीय पुरुष
भूतकाळी रूपात अ + नम् + अ (विकरण) + प्रत्यय असे चार घटक दिसून येतात. थोडक्यात भूतकाळी प्रत्यय लागण्यापूर्वी धातूच्या मागे अ लावतात. दुसरी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे द्वितीय पुरुष ब. व. मधे शेवटचा ‘त’ पूर्ण आहे व तृतीय पुरुष एक वचनात शेवटचा ‘त्’ वर्ण व्यंजन आहे. त्यामुळे उच्चार करतांना व लिहीतांनाही ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते. त्यामुळे पुरुष व वचन बदलू शकते.
धातू स्वरादि असेल तर -
धातू स्वरादी असेल म्हणजे स्वराने सुरू होणारा असेल तर अडागम व धातूमधील स्वर यांचा संधी होऊन रूप तयार होते.
उदा. तृतीय पुरुषी रूपे खाली दिली आहेत.
अर्ज् (१ प.) आर्जत्
अस् (४ प.) आस्यत्
इष्-इच्छ् (६ प.) ऐच्छत्
ईर् (१० उ. प.) ऐरयत्
उष् (१ प.) औषत्
ऋच्छ् (६ प.) आर्च्छत्
या ठिकाणी अडागम व धातूचा आद्य स्वर यांचा वृद्धिसंधी झालेला आहे.
धातू उपसर्गयुक्त असेल तर -
अनद्यतन प्रथम भूतकाळामधे जो अडागम होणार आहे तो धातूला होणार आहे. त्यामुळे उपसर्ग + अडागमाने युक्त असे भूतकाळाचे रूप तयार होईल. उपसर्गाच्या मागे अ लागणार नाही.
उदा.
चर् (१ प.) = फिरणे = अचरत्
सम् + चर् = संचार करणे = सम् + अचरत् = समचरत् असे रूप तयार होईल. असञ्चरत् असे रूप होणार नाही. थोडक्यात धातूचे भूतकाळी रूप तयार करून घेऊन मग ते उपसर्गात मिसळायचे असते.
एरवी वाक्यात ही रूपे वापरतांना नेहेमी प्रमाणेच कर्त्याच्या पुरुष व वचनाप्रमाणे येतील.
उदा. बालक: हसति । = बालक हसतो. (वर्तमनकाळ)
बालक: अहसत् । = बालक हसला. (भूतकाळ)
अहम् अनमम् । = मी नमस्कार केला.
आवाम् अनमाव । = आम्ही दोघांनी नमस्कार केला.
वयम् अनमाम । = आम्ही सर्वांनी नमस्कार केला.
त्वम् अनम: । = तू नमस्कार केलास.
युवाम् अनमतम् । = तुम्ही दोघांनी नमस्कार केलात.
यूयम् अनमत । = तुम्ही सर्वांनी नमस्कार केलात.
स: अनमत् । = त्याने नमस्कार केला.
तौ अनमताम् । = त्या दोघांनी नमस्कार केला.
ते अनमन् । = त्या सर्वांनी नमस्कार केला.
==============
प्रश्न १ ला खालील धातूंची अनद्यतन भूतकळी रूपे तयार करा.
१) वद् (१ प.)
२) तुष् (४ प.)
३) क्षिप् (६ प.)
४) कथ् (१० उ. प.)
प्रश्न २ रा खाली वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) कुंभार राजाकडे गेला. २) हरीने साप पाहिला. ३) त्याने उपाय चिंतिला. ४) चोराने घरात प्रवेश केला. ५) सेवकाने बातमी सांगितली. ६) नोकरांनी विहिर खणली. ७) राजाने ब्राह्मणांना धन दिले. ८) कविताने चित्रपट पाहिला. ९) देवाने कर्णाचे रक्षण केले. १०) शांभवीने कविता पाठ केल्या. ११) शेतकर्यांनी शेते नांगरली. १२) गोपाळाने बी पेरले. १३) अशोकराजाने शत्रूंना ठार मारले. १४) राजाने सेवकाला मुक्त केले. १५) रामाने चंद्र पाहिला. १६) न्यायाधीशाने दुर्जनांना दंड केला. १७) साधूने तलाव पाहिला. १८) हरीने दु:खे अनुभवली. १९) सरस्वतीने ज्ञान दिले. २०) संपदाने फळे खाल्ली.
===============
उत्तरे
प्रश्न १ ला खालील धातूंची अनद्यतन भूतकळी रूपे तयार करा.
१) वद् (१ प.)
अवदम् अवदाव अवदाम
अवद: अवदतम् अवदत
अवदत् अवदताम् अवदन्
२) तुष् (४ प.)
अतुष्यम् अतुष्याव अतुष्याम
अतुष्य: अतुष्यतम् अतुष्यत
अतुष्यत् अतुष्यताम् अतुष्यन्
३) क्षिप् (६ प.)
अक्षिपम् अक्षिपाव अक्षिपाम
अक्षिप: अक्षिपतम् अक्षिपत
अक्षिपत् अक्षिपताम् अक्षिपन्
४) कथ् (१० उ. प.)
अकथयम् अकथयाव अकथयाम
अकथय: अकथयतम् अकथयत
अकथयत् अकथयताम् अकथयन्
प्रश्न २ रा खाली वाक्यांचे संस्कृतमधे भाषांतर करा.
१) कुंभार राजाकडे गेला.
कुम्भकार: नृपं प्रति अगच्छत् ।
२) हरीने साप पाहिला.
हरि: सर्पम् अपश्यत् ।
३) त्याने उपाय चिंतिला.
स: उपायम् अचिन्तयत् ।
४) चोराने घरात प्रवेश केला.
स्तेन: गृहं प्राविशत् ।
५) सेवकाने बातमी सांगितली.
सेवक: वार्ताम् अकथयत् ।
६) नोकरांनी विहिर खणली.
सेवक: कूपम् अखनत् ।
७) राजाने ब्राह्मणांना धन दिले.
नृप: ब्राह्मणेभ्य: धनम् अयच्छत् ।
८) कविताने चित्रपट पाहिला.
कविता चित्रपटम् अपश्यत् ।
९) देवाने कर्णाचे रक्षण केले.
देव: कर्णम् अरक्षत् ।
१०) शांभवीने कविता पाठ केल्या.
शांभवी कविता: अपठत् ।
११) शेतकर्यांनी शेते नांगरली.
कृषका: क्षेत्राणि अकृषन् ।
१२) गोपाळाने बी पेरले.
गोपाल: बीजानि अवपत् ।
१३) अशोकराजाने शत्रूंना ठार मारले.
अशोकनृप: शत्रून् अहिंसत् ।
१४) राजाने सेवकाला मुक्त केले.
नृपति: सेवकम् अमुञ्चत् ।
१५) रामाने चंद्र पाहिला.
राम: चन्द्रम् अवालोकयत् ।
१६) न्यायाधीशाने दुर्जनांना दंड केला.
न्यायाधीश: दुर्जनान् अदण्डयत् ।
१७) साधूने तलाव पाहिला.
साधु: तडगम् अपश्यत् ।
१८) हरीने दु:खे अनुभवली.
हरि: दु:खानि अन्वभवत् ।
१९) सरस्वतीने ज्ञान दिले.
सरस्वती ज्ञानम् अयच्छत् ।
२०) संपदाने फळे खाल्ली.
सम्पदा फलानि अखादत् ।
" पाठ ७४ वा - अनद्यतन भूतकाळ (प्रथम भूतकाळ) " या Audio साठी खाली क्लिक् करा :
No comments:
Post a Comment