पाठ ६१ वा विशेषणयुक्त सुभाषिते तर-तम भाव
यापूर्वी आपण वाक्यात विशेषणांची योजना कशी करायची ते पाहिले होते. विशेषणे ही विशेष्याचे गुण दाखवतात. कधी कधी गुणांमधे कमी-अधिकपणा असतो. इंग्लिशमधे त्य़ासाठी Good - better - best अशी Comparative व superlative degree वापरतात.
संस्कृतमधे त्यासाठी विशेषणांना 'तर' व 'तम' हे प्रत्यय लावून विशेषणे केली जातात.
उदा.
भीमार्जुनौ शूरौ ।
भीमात् अर्जुन: शूरतर: । (अतिशयेन शूर:)
भीम व अर्जुन शूर आहेत.
भीमापेक्षा अर्जुन अधिक शूर आहे.
भीम व अर्जुन दोघेही शूर आहेत. पण अर्जुन भीमापेक्षा अधिक शूर आहे. येथे त्या दोघातील कमी-अधिकपणा दाखवला आहे. दोघात तुलना केली आहे.
दोन गोष्टीत गुणांचा कमी-अधिकपणा दाखवण्यासाठी तरवाचक विशेषणे वापरली जातात. इंग्रजी भाषेत यासाठी Comparative degree वापरली जाते. ज्याच्यापेक्षा अधिकपणा दाखवायचा आहे त्या शब्दाची पंचमी वापरतात व विशेषणाला 'तर' हा प्रत्यय लावतात. म्हणून वरील वाक्यात भीम या शब्दाची पंचमी विभक्ती वापरली आहे.
पाण्डवेषु अर्जुन: शूरतम: ।
पर्वतेषु हिमालय: उत्तुङ्गतम: ।
पांडवांमधे अर्जुन सगळ्यात शूर आहे. किंवा पर्वतांमधे हिमालय सगळ्यात उंच आहे. या वाक्यात पुष्कळांमधे एकाकडे गुणाचे आधिक्य दाखवले आहे. तेव्हा विशेषणाला 'तम' प्रत्यय लावला जातो. इंग्रजी भाषेत यासाठी superlative degree वापरली जाते. सर्व वस्तूंमधे एकाचे गुणाधिक्य दाखवायचे असेल त्या वस्तुवाचक शब्दाची षष्ठी किंवा सप्तमी विभक्ती योजतात. इथे पाण्डव व पर्वत यांची सप्तमी विभक्ती योजली आहे. पाण्डवानाम् अर्जुन: शूरतम: किंवा पर्वतानां हिमालय: उत्तुङ्गतम: अशी षष्ठी वापरली तरी चालते. ही विशेषणे पुन्हा अकारान्त होतात. त्यामुळे ती पुंलिंगी नामांकरता देव शब्दाप्रमाणे, स्त्रीलिंगी नामांकरता आकारान्त करून घेऊन माला शब्दाप्रमाणे व नपुंसकलिंगी नामांकरता वन शब्दाप्रमाणे चालतात.
'तर' व 'तम' प्रत्यय हे जसे विशेषणांना लागतात त्याप्रमाणे नाम, क्रियापद, क्रियाविशेषण व अव्यय या सर्वांनाच लागतात.
ईयस्-इष्ठ प्रत्यय -
तर-तम भाव हा तर-तम प्रत्ययांप्रमाणेच ईयस्-इष्ठ या स्वरादी प्रत्ययांनी सुद्धा दाखवला जातो. पण ईयस् व इष्ठ हे प्रत्यय मात्र गुणविशेषणांनाच लागतात.
उदा. -
गुरु गरीयस् गरिष्ठ
प्रिय - प्रेयस् - प्रेष्ठ
खाली काही विशेषणयुक्त सुभाषिते दिली आहेत.
१) भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती ।
तस्माद्धि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम् ॥
संधिविग्रह - तस्मात् हि, तस्मात् अपि
अन्वय - भाषासु मुख्या दिव्या गीर्वाणभारती मधुरा । तस्मात् हि काव्यं मधुरं । तस्मात् अपि सुभाषितम् (मधुरम्) ॥
अर्थ - सर्व भाषांमधे मुख्य दिव्य अशी संस्कृतभाषा मधुर आहे. त्यातही काव्य मधुर आहे व त्यातही सुभाषित अधिक मधुर आहे.
२) रूपयौवनसम्पन्ना विशालकुलसम्भवा: ।
विद्याहीना न शोभन्ते निर्गन्धा इव किंशुका: ॥
संधिविग्रह - रूपयौवनसम्पन्ना: विशालकुलसम्भवा: ।
विद्याहीना: न शोभन्ते निर्गन्धा: इव किंशुका: ॥
अन्वय - रूपयौवनसम्पन्ना: विशालकुलसम्भवा: ।
विद्याहीना: निर्गन्धा: किंशुका: इव न शोभन्ते ॥
अर्थ - रूप, तारुण्य यांनी संपन्न, मोठ्या कुळात जन्मास आलेले पण विद्याहीन असलेले लोक सुगंधरहित बांबूप्रमाणे शोभून दिसत नाहीत.
३) संसारकटुवृक्षस्य द्वे फले अमृतोपमे । सुभाषितरसास्वाद: सङ्गति: सुजनै: सह ॥
संधिविग्रह - येथे संधी नाही.
अन्वय - संसारकटुवृक्षस्य द्वे अमृतोपमे फले (स्त:) । सुभाषितरसास्वाद: सङ्गति: सुजनै: सह ॥
अर्थ - संसाररूपी कडु वृक्षाची दोन फळे अमृताप्रमाणे (गोड) आहेत. एक म्हणजे सुभाषितांच्या रसाचा आस्वाद व दुसरे म्हणजे सज्जनांबरोबर संगत.
४) सदयं हृदयं यस्य भाषितं सत्यभूषितम् ।
देह: परहिते यस्य कलिस्तस्य करोति किम् ॥४-७०॥
संधिविग्रह - कलि: तस्य
अन्वय - यस्य हृदयं सदयं, (यस्य) भाषितं सत्यभूषितम्, यस्य देह: परहिते, तस्य कलि: किम् करोति ?
अर्थ - ज्याचे हृदय दयाळू आहे व बोलणे सत्य आहे ज्याचा देह परोपकारासाठी असतो त्याचे कली काय बरे वाकडे करू शकणार ?
५) आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण
लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् ।
दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना
छायेव मैत्री खलसज्जनानाम् ॥ (नी.श.)
संधिविग्रह - छाया इव
अन्वय - दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छाया इव आरम्भगुर्वी, क्रमेण क्षयिणी, पुरा लघ्वी, पश्चात् च वृद्धिमती खलसज्जनानाम् मैत्री (अस्ति) । (नी.श.)
अर्थ - दिवसाच्या पूर्वभागातील व उत्तरभागातील सावलीप्रमाणे प्रारंभी मोठी व नंतर क्रमाक्रमाने कमी होणारी आणि प्रथम लहान व नंतर वाढणारी अशी (अनुक्रमे) दुर्जनांची व सज्जनांची मैत्री असते.
६) सर्प: क्रूर: खल: क्रूर: सर्पात् क्रूरतर: खल: । मन्त्रौषधिवश: सर्प: खल: केनोपशाम्यति ॥
संधिविग्रह - केन उपशाम्यति
अन्वय - सर्प: क्रूर: (अस्ति) । खल: क्रूर: (अस्ति) । सर्पात् खल: क्रूरतर: (अस्ति) । सर्प: मन्त्रौषधिवश: खल: केन उपशाम्यति ?
अर्थ - साप क्रूर आहे, दुष्ट मनुष्य क्रूर आहे. पण सापापेक्षा दुष्ट मनुष्य अधिक क्रूर आहे. कारण मंत्र व औषधी यांनी साप ताब्यात येतो पण दुष्ट मनुष्य कशाने शांत होतो ?
७) कान् पृच्छाम: सुधा स्वर्गे निवसाम: वयं भुवि ।
किं वा काव्यरस: स्वादु: किं वा स्वादीयसी सुधा ॥
संधिविग्रह - यात संधी नाही.
अन्वय - किं वा काव्यरस: स्वादु किं वा स्वादीयसी सुधा (एतत्) कान् पृच्छाम: ? (हि) सुधा स्वर्गे (अस्ति), वयं भुवि निवसाम: ।
अर्थ - काव्यरस गोड आहे की अमृत अधिक गोड आहे हे आम्ही कोणला बरे विचारावे ? कारण अमृत स्वर्गात आहे व आम्ही तर पृथ्वीवर रहातो.
८) नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा ।
कवित्वं दुर्लभं तत्र शक्तिस्तत्र सुदुर्लभा ॥
संधिविग्रह - शक्ति: तत्र
अन्वय - लोके नरत्वं दुर्लभं, विद्या तत्र सुदुर्लभा, तत्र कवित्वं दुर्लभं, शक्ति: तत्र सुदुर्लभा ।
अर्थ - या जगात मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्यातही विद्या दुर्लभ आहे, त्यातही कवित्व दुर्लभ आहे व काव्य करण्याची शक्ती अधिक दुर्लभ आहे.
प्रश्न १ - खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१) का भाषा मधुरा ?
२) के न शोभन्ते ? कथम् ?
३) किंशुका: कीदृशा: ?
४) संसारकटुवृक्षस्य के द्वे फले ?
५) कलि: कं न बाधते ?
६) खलसज्जनानां मैत्री कीदृशी ?
७) कस्मात् खल: क्रूरतर: ? किमर्थम् ?
८) सुधा कुत्र अस्ति ?
९) लोके किं किं दुर्लभम् ?
प्रश्न २ खालील रिक्तस्थानी उद्यम या शब्दाची एकवचनी रूपे लिहा.
१) ----- श्री: प्रतिवसति ।
२) ----, त्वमेव अस्माकं ईश्वर:
३) ---- धीर: प्रभवति ।
४) ---- त्यजति अलस: नर: ।
५) ---- अशक्यम् अपि शक्यं भवति ।
६) ---- धीर: पुरुष: न विरमति ।
७) ----- नाम दीर्घप्रयत्न: ।
८) ---- अनुज: विभव: ।
प्रश्न ३ - अ गटातील विशेष्ये व ब गटातील विशेषणे यांच्या जोड्या लावा.
अ गट - विद्याहीना:, सर्प:, काव्यम्, किंशुका:, गीर्वाणभारती, फले, हृदयं, भाषितं, छाया, सुधा, काव्यरस:,
ब गट - सदयं, अमृतोपमे, वृद्धिमती, मधुरा, निर्गन्धा:, स्वादीयसी, सत्यभूषितम्, मधुरम्, रूपयौवनसम्पन्ना:, स्वादु:, क्रूर:,
प्रश्न ४) संस्कृतमधे भाषांतर करा. -
१) गीर्वाणभारती मधुर आहे. त्याहीपेक्षा काव्य मधुर आहे व सुभाषिते सगळ्यात मधुर आहेत.
२) शिक्षक श्रेष्ठ आहेत. त्याहीपेक्षा आचार्य अधिक श्रेष्ठ आहेत. गुरू सर्वात श्रेष्ठ आहेत.
३) मनुष्यत्व दुर्लभ आहे. त्याहीपेक्षा विद्या अधिक दुर्लभ आहे. काव्यशक्ति त्याहूनही दुर्लभ आहे.
४) दशरथाच्या तीन राण्यांमधे कौसल्या सगळ्यात मोठी होती तर कैकेयी सगळ्यात धाकटी होती.
५) सत्यभामेपेक्षा श्रीकृष्णाला रुक्मिणी अधिक प्रिय होती.
सरावासाठी अभ्यास
प्रश्न १) रूपे द्या -
१) वर्त प्र. पु. ब. व. - नि + वस्, शुभ-शोभ्, उप + शम्-शाम्, प्रच्छ्-पृच्छ्,
२) आज्ञार्थ तृ. पु. ए. व, - गम्-गच्छ्, कुप्, कथ्, स्पृह्, धाव्, लिख्, नृत्
३) पं ए. व. - कवि, वारि, एतद्, अस्मद्
४) स. ब. व. - माला, मेघ, तद्, युष्मद्, कपि, मति
प्रश्न २ - कर्त्याला योग्य वर्तमानकाळी क्रियापद तयार करा. सर्व धातू ४ थ्या गणाचे परस्मैपदी आहेत.
अ गट कर्ते = अहम्, आवाम्, वयम्
अ गट क्रियापदे = कुप्, क्रुध्, नश्, स्निह्, नृत्, पुष्, मुह्, हृष्, तुष्, क्षुध्, लुप्, शुध्,
ब गट कर्ते = त्वम् युवाम्, यूयम्
ब गट क्रियापदे = भ्रम्-भ्राम्, भ्रंश्-भ्रश्, मद्-माद्, रञ्ज्-रज्, शम्-शाम्, श्रम्-श्राम्,
क गट = स:, तौ, ते
क गट क्रियापदे = नि+अस्, सम्+ऋध्, सम्+तुष्, वि+नश्, अप+राध्, अनु+इष्,
============================
६१) विशेषणयुक्त सुभाषिते तर-तम भाव (उत्तरे)
प्रश्न १ - खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१) का भाषा मधुरा ?
संस्कृतभाषा मधुरा ।
२) के न शोभन्ते ? कथम् ?
विद्याहीना निर्गन्धा इव किंशुका: न शोभन्ते ।
३) किंशुका: कीदृशा: ?
किंशुका: निर्गन्धा: ।
४) संसारकटुवृक्षस्य के द्वे फले ?
सुभाषितरसास्वाद: सुजनै: सह सङ्गति: एते संसारकटुवृक्षस्य द्वे फले ।
५) कलि: कं न बाधते ?
यस्य हृदयं सदयं, भाषितं सत्यभूषितम्,
यस्य देह: परहिते अस्ति तं कलि: न बाधते ।
६) खलसज्जनानां मैत्री कीदृशी ?
खलानां मैत्री दिनस्य पूर्वार्धा छाय़ा इव क्रमेण क्षयिणी अस्ति । सज्जनानां मैत्री दिनस्य परार्ध छाया इव वृद्धिमती अस्ति ।
७) कस्मात् खल: क्रूरतर: ? किमर्थम् ?
सर्पात् क्रूरतर: खल: । यत: सर्प: मन्त्रौषधिवश: अस्ति परं तु खल: केन अपि न उपशाम्यति ।
८) सुधा कुत्र अस्ति ?
सुधा स्वर्गे अस्ति ।
९) लोके किं किं दुर्लभम् ?
नरत्वं, विद्या, कवित्वं कवित्वस्त शक्ति: च एतानि वस्तूनि दुर्लभानि ।
प्रश्न २ खालील रिक्तस्थानी उद्यम या शब्दाची एकवचनी रूपे लिहा.
१) उद्यमे श्री: प्रतिवसति ।
२) उद्यम, त्वमेव अस्माकं ईश्वर:
३) उद्यमाय धीर: प्रभवति ।
४) उद्यमं त्यजति अलस: नर: ।
५) उद्यमेन अशक्यम् अपि शक्यं भवति ।
६) उद्यमात् धीर: पुरुष: न विरमति ।
७) उद्यम: नाम दीर्घप्रयत्न: ।
८) उद्यमस्य अनुज: विभव: ।
प्रश्न ३ - अ गटातील विशेष्ये व ब गटातील विशेषणे यांच्या जोड्या लावा.
अ गट - विद्याहीना:, सर्प:, काव्यम्, किंशुका:, गीर्वाणभारती, फले, हृदयं, भाषितं, छाया, सुधा, काव्यरस:,
ब गट - सदयं, अमृतोपमे, वृद्धिमती, मधुरा, निर्गन्धा:, स्वादीयसी, सत्यभूषितम्, मधुरम्, रूपयौवनसम्पन्ना:, स्वादु:, क्रूर:,
उत्तर -
विद्याहीना: - रूपयौवनसम्पन्ना:
सर्प: - क्रूर:
काव्यम् - मधुरम्
किंशुका: -निर्गन्धा:
गीर्वाणभारती -मधुरा
फले - अमृतोपमे
हृदयं - सदयं
भाषितं - सत्यभूषितम्
छाया - वृद्धिमती
सुधा - स्वादीयसी
काव्यरस: - स्वादु:
प्रश्न ४) संस्कृतमधे भाषांतर करा. -
१) गीर्वाणभारती मधुर आहे. त्याहीपेक्षा काव्य मधुर आहे व सुभाषिते सगळ्यात मधुर आहेत.
गीर्वाणभारती मधुरा । गीर्वाणभारते: अपि काव्यं मधुरतरम् । सुभाषितानि मधुरतमाणि ।
२) शिक्षक श्रेष्ठ आहेत. त्याहीपेक्षा आचार्य अधिक श्रेष्ठ आहेत. गुरू सर्वात श्रेष्ठ आहेत.
शिक्षक: श्रेष्ठ: । शिक्षकात् आचार्य: श्रेष्ठतर: । गुरु: श्रेष्ठतम: ।
३) मनुष्यत्व दुर्लभ आहे. त्याहीपेक्षा विद्या अधिक दुर्लभ आहे. काव्यशक्ति त्याहूनही दुर्लभ आहे.
मनुष्यत्वं दुर्लभम् अस्ति । मनुष्यत्वात् विद्या दुर्लभतरा । काव्यशक्ति: दुर्लभतमा ।
४) दशरथाच्या तीन राण्यांमधे कौसल्या सगळ्यात मोठी होती तर कैकेयी सगळ्यात धाकटी होती.
दशरथस्य तिसृषु राज्ञीषु कौसल्या ज्येष्ठा अपि तु कैकेयी कनिष्ठा ।
५) सत्यभामेपेक्षा श्रीकृष्णाला रुक्मिणी अधिक प्रिय होती.
सत्यभामाया: रुक्मिणी श्रीकृष्णस्य प्रियतरा ।
=================================
No comments:
Post a Comment