पाठ ६६ वा - धातुसाधित अव्यये भाग २ पूर्वकालवाचक अव्यये त्वान्त अव्यये
विधान पूर्ण करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य. अशी वाक्याची व्याख्या आहे. विधान पूर्ण करण्यास वाक्यात क्रियावाचक शब्द आवश्यक असतो. काही वेळा वाक्यात एकच कर्ता अनेक क्रिया करतो. त्यातील क्रिया क्रमाने घडलेल्या असतात.
उदा. मालाकार: उद्यानं गच्छति, पुष्पाणि चिनोति माला: च गुम्फति ।
माळी बागेत जातो, फुले गोळा करतो व हार बनवतो. ह्या क्रिया क्रमाने घडलेल्या आहेत. अशी वेगवेगळी तीन वाक्ये न करता एका वाक्यात सुद्धा हे सांगता येते.
मालाकार: उद्यानं गत्वा, पुष्पाणि चित्वा माला: गुम्फति ।
माळी बागेत जाऊन, फुले गोळा करून हार करतो.
येथे गत्वा, चित्वा हे शब्द क्रियावाचक असले तरी त्या शब्दांनी वाक्य पूर्ण होत नाही. गुम्फति या क्रियापदाने कळून येणार्या क्रियेच्या दृष्टीने त्या क्रिया गौण वाटतात. तसेच गत्वा, चित्वा ह्या धातुसाधितांनी कळून येणार्या क्रिया मुख्य क्रियेच्या पूर्वीची आहे हे समजते.
यात लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे मुख्य क्रिया घडण्यापूर्वी एकाच कर्त्याकडून अगोदर घडून गेलेल्या एक किंवा अनेक क्रियांचा बोध करण्याकरता या अव्ययांचा उपयोग केला जातो. पूर्वकाळातील क्रिया दाखवलेल्या असल्यामुळे त्यांना पूर्वकालवाचक अव्यये असे म्हणतात.
या धातूसाधित अव्ययांचा उपयोग करतांना शेवटची मुख्य क्रिया करणार्या कर्त्यानेच मागीलही क्रिया केलेल्या असाव्या लागतात. उदा. आनन्द: प्रात: उत्थाय, स्नानं कृत्वा, दुग्धं पीत्वा पाठशालां गच्छति । (आनंद सकाळी उठून स्नान करून, दूध पिऊन शाळेत जातो.) या वाक्यात उठणे, स्नान करणे दूध पिणे व शाळेत जाणे या सर्व क्रियांचा कर्ता एकटा आनन्दच आहे. ही अव्यये वाक्यात एकावेळी एक किंवा अनेकही येऊ शकतात.
मराठीमधे खाऊन, पिऊन, वाचून, बोलून इत्यादी जी ऊन प्रत्ययान्त धातुसाधिते आहेत, तोच अर्थ व्यक्त करण्याकरता संस्कृतमधे पूर्वकालवाचक अव्यये वापरली जातात.
या अव्ययांचे दोन प्रकार आहेत. १) त्वान्त २) ल्यबन्त.
दोन किंवा अधिक वाक्ये जोडण्यासाठी त्वान्त किंवा ल्यबन्त अव्ययांचा उपयोग होतो. त्वान्त किंवा ल्यबन्त अव्यये घालून जशी वाक्यरचना करता येते त्याप्रमाणे त्या अव्ययांच्या ऐवजी कालार्थ क्रियापद घालूनही वाक्यरचना करता येते.
स: दुग्धं पीत्वा शालां गच्छति किंवा स: दुग्धं पिबति शालां गच्छति च । दोन क्रियापदे वापरली की वाक्यात ‘च’ या अव्ययाचा उपयोग करावा लागतो.
त्यांचे दोन प्रकार आहेत. १) त्वान्त अव्यये २) ल्यबन्त अव्यये
१) त्वान्त अव्यये -
मूळ धातूला त्वा प्रत्यय लावून ही अव्यये तयार केली जातात. त्वा ने अंत पावणारी असतात म्हणून या अव्ययांना त्वान्त अव्यये असे म्हणतात.
त्वान्त अव्ययांसंबंधी नियम -
१) उपसर्गरहित धातूला त्वा प्रत्यय जोडल्याने ही अव्यये तयार होतात.
उदा. गम् - गत्वा, भू - भूत्वा, क्षिप् - क्षिप्त्वा, गै -गीत्वा, जि - जित्वा, तप् - तप्त्वा, त्यज् - त्यक्त्वा, दा - दत्वा, नम् - नत्वा, पा - पीत्वा,
२) काही धातूंच्या पूर्वी इडागम होतो. म्हणजे त्वा प्रत्यय लागण्यापूर्वी इ हा वर्ण लागतो. उदा.
अट् - अटित्वा, ईक्ष् - ईक्षित्वा, चल् - चलित्वा, जन् - जनित्वा, धाव् - धावित्वा, मूर्च्छ् - मूर्च्छित्वा, वन्द् - वन्दित्वा,
३) काही रूपांमधे त्वा मधील त् वर्णाच्या जागी ट्, ढ्, ध् असा बदल होतो
उदा.
इष् -इष्ट्वा किंवा एष्ट्वा, कृष् - कृष्ट्वा, तुष् - तुष्ट्वा,
रुह् - रुढ्वा, वह् - ऊढ्वा,
क्रुध् - कुद्ध्वा, दह् - दग्ध्वा, युध् - युद्ध्वा, रभ् - रब्ध्वा, लभ् - लब्ध्वा,
दहाव्या गणाच्या धातूंची रूपे तयार करतांना ती अय या विकरणासहित करतात. भक्ष् - भक्षयित्वा, कथ् - कथयित्वा. धृ-धार् - धारयित्वा
प्रश्न ११ संस्कृतमधे भाषांतर करा =
१) तो चित्र पाहून आनंदित होतो.
२) शत्रूला जिंकून राजा म्हणतो.
३) साधू राजाला पाहून बोलतो.
४) तो काम करून परत येतो.
५) हरी पाणी पिउन तृप्त होतो.
६) ऋषी रागावून निघून जातात.
७) सज्जन दोष टाकून गुण घेतात.
८) विद्यार्थी शास्त्र शिकून विद्वान होतात.
९) घरी जाऊन तो विचारतो.
१०) देवाला नमस्कार करून तो प्रार्थना करतो.
११) धन चोरून चोर जातो.
१२) ज्ञान मिळवून तो पण्डित होतो.
१३) शेत नांगरून शेतकरी बी पेरतो.
१४) अभय स्नान करून शाळेत जातो.
१५) भात खाऊन तो तृप होतो.
१६) संतुष्ट होऊन राजाने धन देतो.
१७) सेनापतीला बोलावून राजा त्याला बक्षिस देतो.
१८) हरिणाला ठार मारून वाघ गुहेत शिरतो.
१९) माशी उडून जाते.
२०) परीक्षा उत्तीर्ण होऊन राधा बक्षिस मिळवते.
प्रश्न २) रूपे द्या
पूर्वकालवाचक अव्यय (त्वान्त) = ईक्ष्, काङ्क्ष्, काश्, कुप्, कृष्, क्लृप्-कल्प्, क्षिप्, क्षुभ्, खन्, गम्, गाह्, गै, घ्रा,
No comments:
Post a Comment