पाठ ६५ वा - धातुसाधित अव्यये भाग १ तुमन्त अव्यये.
धातूपासून ज्याप्रमाणे गच्छति, गच्छतु वगैरे क्रियापदे बनतात त्याच प्रमाणे गन्तुम्, गत्वा, आगत्य, गच्छत्, गत, गन्तव्य, गति, गमन इत्यादी अनेक प्रकारचे शब्द तयार होतात. हे शब्द धातूपासून बनत असल्यामुळे त्यांना धातुसाधिते असे म्हणतात. धातुसाधितांचे नाम, विशेषण व अव्यय असे तीन प्रकार दिसून येतात. त्यातील अव्ययांची माहिती या पाठात करून घ्यायची आहे.
धातुसाधित अव्ययांचे दोन प्रकार आहेत. १) हेत्वर्थक धातुसाधित तुमन्त अव्यये. २) पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यये.
१) हेत्वर्थक धातुसाधित तुमन्त अव्यये -
जेव्हा वाक्यातील मुख्य क्रियेचा उद्देश किंवा हेतु दाखवायचा असतो, तेव्हा तुमन्त अव्ययांचा उपयोग केला जातो. अमक्यासाठी अमूक निमित्ताने असा अर्थ त्यातून व्यक्त होतो. मराठीत जेव्हा आपण क्रियापदाला साठी हा प्रत्यय लावतो, जाण्यासाठी, येण्य़ासाठी वगैरे, त्याकरता संस्कृतमधे तुमन्त अव्यये वापरली जातात. ही रूपे तयार करतांना धातूला तुम् असा प्रत्यय लागतो. ही रूपे तुम् ने अन्त पावत असल्यामुळे यांना हेत्वर्थक धातुसाधित तुमन्त अव्यये असे म्हणतात. ही अव्यये असल्यामुळे त्या तुमन्त अव्ययांना पुन्हा विभक्तीप्रत्यय लागत नाहीत.
नृप: धनं दातुम् इच्छति । = राजा धन देऊ इच्छितो.
छात्र: पठितुं शालां गच्छति । = विद्यार्थी शाळेत शिकण्यासाठी जातो.
सिंह: जलं पातुं तडागम् आगच्छति । = सिंह पाणी पिण्यासाठी तळ्यावर येतो.
सकर्मक धातूंच्या बाबतीत तुमन्त अव्यय वापरतांना जे करण्याची इच्छा आहे त्याची द्वितीया होते. नृप: धनं दातुं इच्छति । या वाक्यात धन देण्याची राजाला इच्छा आहे. म्हणून धन शब्दाची द्वितीया विभक्ती झाली.
हेत्वर्थक धातुसाधित तुमन्त अव्ययांसंबंधी नियम -
१) मूळ धातूला तुम् प्रत्यय जोडल्याने ही अव्यये तयार होतात.
तुम् प्रत्यय लागण्यापूर्वी धातूतील उपान्त्य ह्रस्व स्वर आणि अन्त्य ह्रस्व किंवा दीर्घ स्वर यांना गुण होतो. काही धातूंना इडागम होतो.
उदा.
गम् - गन्तुम्, गै - गातुम्, जि - जेतुम्, तप् - तप्तुम्, त्यज् - त्यक्तु, दा - दातु, नम् - नन्तुम्, नी - नेतुम्, पा - पातुम्, मन् - मन्तुम्, रम् - रन्तुम्
२) काही धातूंना तुम् प्रत्यय लागण्यापूर्वी इडागम होतो. म्हणजे त्या आधी ‘इ’ लागून मग तुम् प्रत्यय लागतो.
अर्च् - अर्चितुम्, खाद् = खादितुम्, वन्द् = वन्दितुम्, पठ् - पठितुम्, अट् - अटितुम्, ईक्ष् - ईक्षितुम्, कुप् - कोपितुम्, क्रीड् - क्रीडितुम्, खन् - खनितुम्, निन्द् - निन्दितुम्, भाष् - भाषितुम्, शिक्ष् - शिक्षितुम्, हस् - हसितुम्.
३) काही धातूंच्या बाबतीत तुम् मधील त् च्या जागी ट्, ढ्, ध् असा बदल होतो.
उदा.
साधारणपणे जे धातू श् किंवा ष् या वर्णाने अन्त पावतात त्यांची तुमन्त अव्यये होतांना त् च्या जागी ट् वर्ण येतो.
उदा.
दिश् - देष्टुम्, विश् - वेष्टुम्, दृश् - द्रष्टुम्, इष् - एष्टुम्, कृष् - क्रष्टुम् किंवा कर्ष्टुम्, तुष् - तोष्टुम्, नश् - नष्टुम्, पुष् - पुष्टुम्, प्रच्छ् -प्रष्टुम्, यज् - यष्टुम्
काही धातूंच्या बाबतीत तुम् च्या ऐवजी त् या वर्णाच्या जागी ढ् वर्ण येतो.
उदा, = वह् - वोढुम्, सह् - सोढुम्, रुह् - रोढुम्,
काही धातूंच्या बाबतीत त् वर्णाच्या ऐवजी ध् हा वर्ण येतो.
उदा. = दह् - दग्धुम्, युध् - योद्धुम्, रभ् - रब्धुम्
ही रूपे ओळखणे सोपे असते. कारण या रूपांमधे तुम् (टुम्, ढुम् किंवा धुम्) प्रत्यय स्पष्टपणे दिसून येतो. दहाव्या गणाच्या धातूंची रूपे तयार करतांना ती अय या विकरणासहित करतात. भक्ष् - भक्षयितुम्, कथ् - कथयितुम्. धृ-धार् - धारयितुम्
संस्कृतमधे भाषांतर करा. = १) धन मिळवण्यासाठी तो परदेशी जातो. २) नमस्कार करण्यासाठी सुभद्रा देवळात जाते. ३) बोलण्यासाठी तो तोंड उघडतो. ४) स्नान करण्यासाठी दुर्वासऋषी तळ्याकडे जातात. ५) दान देण्याचा सुदेश विचार करतो. ६) मुलांचे पालन करण्यासाठी तो येतो. ७) पाणी पिण्यासाठी लोक विहिरीकडे जातात. ८) लोकांच्या पीडेचा नाश करण्यास देव समर्थ आहे. ९) सातवाहनाचे काव्य ऐकण्यास पशू पक्षी सुद्धा येतात. १०) संजीवनी मंत्र मिळवण्यास कच शुक्राचार्यांकडे जातो. ११) चंद्रेश विविध विषय शिकण्यासाठी विद्यालयात जातो. १२) सर्व लोक सुख मिळवण्याची इच्छा करतात. १३) तो वडिलांना काही सांगण्यास उत्सुक झाला. १४) आई देवाची पूजा करण्यास मंदिरात जाते. १५) तुम्ही भार वाहून नेण्यास समर्थ नाही. १६) चंद्र पहाण्यास तो अंगणात येतो. १७) मुले खेळाण्यासाठी मैदानावर येतात. १८) अग्नि सर्वकाही जाळण्यास समर्थ आहे. १९) शंका विचारण्यास माधव शिक्षकांकडे जातो. २०) धन मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो.
प्रश्न २) रूपे द्या
हेत्वर्थक धातुसाधित तुमन्त - कृ, य़ा, वह्, वद्, गद्, भाष, कथ्, चिन्त्, नि+यन्त्र्, अट्, सृज्, दृश्, ईक्ष्, मस्ज्, नम्, तृ-तर्, पाल्, उप + दिश्, आ + श्रि-श्रय्, कथ्, चल्, क्षिप्, वह्, क्रम्
==============================================
६५) भाग १ तुमन्त अव्यये उत्तरे -
संस्कृतमधे भाषांतर करा. =
१) धन मिळवण्यासाठी तो परदेशी जातो.
धनं लब्धुं स: परदेशं गच्छति ।
२) देवाला नमस्कार करण्यासाठी सुभद्रा देवळात जाते.
देवं नन्तुं सुभद्रा देवालयं गच्छति ।
३) बोलण्यासाठी तो तोंड उघडतो.
भाषितुं स: मुखम् उद्घाटयति ।
४) स्नान करण्यासाठी दुर्वासऋषी तळ्याकडे जातात.
स्नानं कर्तुं दुर्वासऋषि: सरोवरं प्रति गच्छति ।
५) दान देण्याचा सुदेश विचार करतो.
सुदेश: दानं दातुं चिन्तयति ।
६) मुलांचे पालन करण्यासाठी तो येतो.
बालान् पालयितुं स: आगच्छति ।
७) पाणी पिण्यासाठी लोक विहिरीकडे जातात.
जलं पातुं जना: कूपं प्रति गच्छन्ति ।
८) लोकांच्या पीडेचा नाश करण्यास देव समर्थ आहे.
जनानां पीडां हर्तुं देव: समर्थ: ।
९) सातवाहनाचे काव्य ऐकण्यास पशू पक्षी सुद्धा येतात. सातवाहनस्य काव्यं आकर्णयितुं पशव: खगा: अपि आगच्छन्ति ।
१०) संजीवनी मंत्र मिळवण्यास कच शुक्राचार्यांकडे जातो.
सञ्जीवनीमन्त्रं लब्धुं कच: शुक्राचार्यं प्रति गच्छति ।
११) चंद्रेश विविध विषय शिकण्यासाठी विद्यालयात जातो.
चन्द्रेश: विविधान् विषयान् शिक्षितुं विद्यालयं गच्छति ।
१२) सर्व लोक सुख मिळवण्याची इच्छा करतात.
सर्वे जना: सुखम् अधिगन्तुम् इच्छन्ति ।
१३) तो वडिलांना काही सांगण्यास उत्सुक आहे.
स: जनकं भाषितुं उत्सुक: ।
१४) आई देवाची पूजा करण्यास मंदिरात जाते.
जननी देवम् अर्चितुं मन्दिरं गच्छति ।
१५) तुम्ही भार वाहून नेण्यास समर्थ नाही.
यूयं भारं वोढुं न समर्था: ।
१६) चंद्र पहाण्यास तो अंगणात येतो.
चन्द्रं द्रष्टुं सं अङ्गणम् आगच्छति ।
१७) मुले खेळाण्यासाठी मैदानावर येतात.
बाला: क्रीडितुं क्रीडाङ्गणम् आगच्छन्ति ।
१८) अग्नि सर्वकाही जाळण्यास समर्थ आहे.
अग्नि: सर्वं दग्धुं समर्थ: ।
१९) शंका विचारण्यास माधव शिक्षकांकडे जातो.
शङ्कां प्रष्टुं माधवं शिक्षकं प्रति गच्छति ।
२०) धन मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो.
धनं लब्धुं स: प्रयतते ।
प्रश्न २) रूपे द्या
हेत्वर्थक धातुसाधित तुमन्त -
कृ - कर्तुम्
य़ा - यातुम्
वह् - वोढुम्
वद - उदितुम्
गद् -गदितुम्
भाष - भाषितुम्
कथ् - कथयितुम्
चिन्त् - चिन्तयितुम्
नि+यन्त्र् - नियन्त्रितुम्
अट् -अटितुम्
सृज् - स्रष्टुम्
दृश् - द्रष्टुम्
ईक्ष् - ईक्षितुम्
मस्ज् - मज्जितुम्
नम् - नन्तुम्
तृ-तर् - तरितुम्
पाल् - पालयितुम्
उप + दिश् - उपदेष्टुम्
आ + श्रि-श्रय् -आश्रयितुम्
कथ् - कथयितुम्
चल् - चलितुम्
क्षिप् -क्षेप्तुम्
क्रम् - क्रमितुम्
=============================
No comments:
Post a Comment