१०) महान नाटककार भास
भास हा संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार. संस्कृत साहित्यात उपलब्ध नाटक-परंपरेचा प्रवर्तक भास हा आहे. इतर अनेक कवींप्रमाणेच त्याचे प्रामाणिक चरित्र इतिहासाला ज्ञात नाही. त्यामुळे ह्या कवीचाही काळ काही दंतकथा व बहि:साक्ष प्रमाणांवरच ठरवावा लागतो.
भासाच्या नाटकात ज्या संस्कृतीचा व आचारविचारांचा समावेश झालेला आहे त्यावरून कोणी त्याला दक्षिणभारतातील त्रावणकोरचा निवासी आहे असे मानतात. तर कोणी त्याच्या नाटकात जे भरतवाक्य येते की त्याचा राजा हिमाचलापासून विन्धाचला पर्यंत एकछत्री शासन करो, त्यावरून कोणी त्याला उत्तरभारतीय ठरवतात. एका दंतकथेप्रमाणे तो धोबी आहे तर दुसर्या दंतकथेप्रमाणे तो कवी घटकर्पराचा ग्रामवासी आहे. एक दंतकथा सांगते की भास व व्यास ह्यांच्यामधे प्रतिष्ठेच्या प्रश्नावरून भांडण झाले. तेव्हा त्यांच्यात श्रेष्ठ कोण हे ठरवण्यासाठी दोघांचे ग्रंथ अग्नीत टाकले गेले. परंतु अग्नीने ते जाळले नाहीत. विशेषत: भासाचे 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक त्या अग्नीत जसेच्या तसे राहिले. एकूण ह्या दंतकथेवरून कवी भास हा श्रेष्ठ नाटककार होता व स्वप्नवासवदत्तम् ही त्याची श्रेष्ठ कलाकृती होती असे दिसते. नाटककार भासाचे अभ्यासक श्री पुसाळकर यांच्या मतानुसार भास हा धर्मभीरु ब्राह्मण होता व तो उत्तरभारतातील निवासी होता. एकूण भासाच्या प्रामाणिक चरित्राविषयी अभ्यासकांमधे मतभेद आहेत.
जी अवस्था चरित्राविषयीची आहे तीच अवस्था त्याच्या काळासंबंधीही आहे. इतिहासकार त्याला इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. से सहावे शतक या काळात केव्हातरी भास झाला असे मानतात. दंडी सहाव्या शतकात होऊन गेला त्याने भासाची प्रशंसा केली आहे. त्याअर्थी त्यापूर्वी भास होऊन गेला. ही त्याची उत्तरसीमा झाली. शूद्रकाचे मृच्छकटिक नाटकावर भासाच्या चारुदत्त नाटकाची छाप आहे. शूद्रक इ. स. च्या तिसर्या किंवा चौथ्या शतकात होऊन गेला. म्हणजे भास त्यापूर्वी होऊन गेला. कालिदासाने त्याला असामान्य महाकवी म्हटले आहे. म्हणजे तो कालिदासाच्या पूर्वी होऊन गेला असला पाहिजे. कालिदास इ. स. पूर्व दुसरे शतक ते इ. स. चे सहावे शतक अशा कालिदासाच्या कालाविषयी सुद्धा मतभेद आहेत. वाचस्पती गैरोलांनी कालिदासाचा काळ इ. स. पूर्व पहिले शतक असा सिद्ध केला आहे. त्याअर्थी भास हा इ. स. पूर्व पहिल्या शतकाच्या आधी होऊन गेला असावा.
भासाचा वर्णव्यवस्था, यज्ञ-पूजा-प्रार्थना, गोपूजन यावर विश्वास आहे. त्याच्या नाटकांवरून त्याला कोणत्या तरी राजाचा आश्रय मिळालेला असावा असं दिसून येतं. राजघराण्यातील प्रचलित रीतीरिवाजांची त्याला पूर्ण माहिती आहे. नम्र स्वभाव, हजरजबाबी, विनोदप्रिय, इत्यादी गुणांनी तो युक्त होता, असे त्याच्या साहित्यावरून दिसून येते.
भासाचा उल्लेख मालविकाग्नी नाटकात कालिदासाने केलेला आहे. त्यावरून तो कालिदासापूर्वी होऊन गेला. कालिदासानंतर बाण (इ. स. ६५०), दण्डी (इ. स. ७००) वाक्पतिराज (इ. स. ७५०), व राजशेखर (इ. स. ९००), 'प्रसन्नराघव' नाटकाचा रचयिता कवी जयदेव (इ. स. १२००) यांनी भासाचे एक श्रेष्ठ नाटककार म्हणून स्मरण केले आहे व भासाचे 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक अग्निपरीक्षेतून खरे उतरले याचाही उल्लेख केला आहे. तसेच काव्यशास्त्रावर ग्रंथ लिहिणार्या दंडी, भामह, वामन, अभिनवगुप्त यांनी भासाच्या नाटकातील श्लोक उदाहरणे म्हणून दिलेले आहेत. अर्थातच राजशेखरापर्यंत कवी भासाची नाटके उपलब्ध असली पाहिजेत. राजशेखराने 'भासनाटकचक्रम्' असे म्हणून त्याने अनेक नाटके लिहिली होती असा उल्लेख केला आहे. अभिनवगुप्त (इ. स. १०००), भोजदेव (इ. स. ११००), सर्वानंद (इ. स. ११५९) रामचन्द्र गुणभद्र (इ. स. १२००) शारदातनय (इ. स. १२००) या सर्वांनी भासाच्या 'स्वप्नवासवदत्तम्' नाटकाचा केवळ उल्लेखच नाही तर त्याच्या वैशिष्ट्यांची पण चर्चा केली आहे.
परंतु त्यानंतर मात्र त्याने लिहिलेली नाटके लिखित स्वरूपात मिळत नव्हती. त्यावेळचा काळही परकीय आक्रमणांचा होता. त्यामुळे त्याची नाटके काळाच्या ओघात नष्टही झालेली असावीत असा विद्वानांचा कयास होता. परंतु १९१२ मधे टी. गणपति शास्त्री यांना दक्षिणभारतात १३ नाटके असलेले एक हस्तलिखित बाड मिळाले. त्यात 'स्वप्नवासवदत्तम्' हे नाटक होते. स्वप्नवासवदत्तम् हे नाटक व भास ह्यांचे समीकरण जुळले. त्याअर्थी गणपतिशास्त्री यांना मिळालेली नाटके भासाची असली पाहिजेत असे म्हणता येते. नंतर त्या सापडलेल्या सर्व नाटकांची भाषा, त्यांचे अंतरंग परीक्षण करून ती सर्व नाटके भासाची आहेत असे विद्वानांनी ठरवले. अर्थात त्या सिद्धांताला विरोध करणारीही मंडळी आहेतच.
टी. गणपती शास्त्री यांना भासाने लिहिलेली एकंदर १३ नाटके सापडली. त्यातील सात नाटके महाभारतावर आधारित, दोन नाटके रामायणावर आधारित, दोन नाटके उदयन राजाशी संबंधित आहेत तर दोन नाटकांना परंपरागत आख्यायिकांचा आधार आहे. स्वप्नवासवदत्तम्, प्रतिज्ञायौगन्धरायणम्, प्रतिमा, पञ्चरात्रम्, अभिषेकम्, मध्यमव्याय़ोगम्, कर्णभारम्, दूतवाक्यम्, घटोत्कचम्, उरुभंगम्, बालचरितम्, अविमारकम्, चारुदत्तम् अशी त्याची तेरा नाटके आहेत असे गणपती शास्त्रींनी शोधून काढले आहे.
रामायण, महाभारतादी ग्रंथावर आधारित ही नाटके असली तरी भासाने त्यात पर्याप्त बदल केलेले आहेत. भासाच्या नाटकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो रामायण अथवा महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण करतांना दिसतो. उदा. रामायणावर आधारित प्रतिमा नाटकामधे त्याने कैकयीचे उदात्तीकरण केले आहे. भरत जेव्हा कैकेयीला 'तू रामाला वनात का पाठवलेस' असे विचारतो त्यावेळी कैकेयी उत्तर देते की, 'दशरथांना पितृवियोगाने मृत्यू येईल असा शाप होता. तेव्हा दोन मृत्यू टाळण्यासाठी मी रामाला वनात धाडले.' पुन्हा भरत तिला विचारतो की रामालाच का वनात पाठवलेस ? मला का नाही पाठवलेस ? तेव्हा कैकेयी सांगते की तू आधीच मामाकडे गेलेला होतास. त्यामुळे तुझ्या वियोगाने दशरथांना इतके दु:ख झाले नसते की जेवढे रामाच्या वियोगाने झाले असते.' कैकेयीने सांगितलेली कारणेही अगदी समर्पक आहेत. अशा प्रकारे खलपात्रे ही खलपात्रे नसून ती मूलत: चांगलीच आहेत असे दाखवण्याचा त्याचा हेतू आहे.
भरतमुनींनी नाटक, ईहामृग, प्रकरण, अङ्क, व्यायोग, समवकार वगैरे दशरूपकाचे जे दहा प्रकार सांगितले आहेत त्या सर्व प्रकारात भासाची नाटके उपलब्ध होतात.
.
दूतवाक्यम् हे एक अंकी नाटक महाभारतातील श्रीकृष्ण-शिष्टाईवर आधारित आहे. तर कर्णभारम् परशुरामांनी कर्णाला दिलेल्या शापावर आधारित असणारे एक अंकी नाटक आहे. दूतघटोत्कच, नाटक महाभारतातील घटोत्कचाने केलेल्या युद्धावरच आधारित एक अंकी नाटक आहे. तर उरुभंगम् सुद्धा एक अंकी नाटक भीम दुर्योधनाची मांडी फोडतो त्या प्रसंगावर आधारित आहे. मध्यमव्यायोगम् या एक अंकी नाटाकामधे भीम एका ब्राह्मणपुत्राचे संरक्षण करतो त्यावर आधारित आहे.
पंचरात्रम् हे तीन अंकी नाटक आहे. या नाटकामधे जरी दुर्योधन, द्रोण, पांडव ही महाभारतातील पात्रे असली तरी त्यातील कथानकाला महाभारतातील कथेचा आधार नाही. एका यज्ञाच्या निमित्ताने दुर्योधन द्रोणाचार्यांना दानस्वरूपात काही देऊ इच्छितो. त्यावेळी द्रोण त्याला पांडवांना अर्धे राज्य देण्याची विनंती करतात. तेव्हा दुर्योधन सांगतो की अज्ञातवासात असणारे पांडव जर पाच रात्रींमधे आपल्याला सापडले तर मी त्यांना त्यांचे अर्धे राज्य देईन. तेव्हा द्रोणाचार्यांच्या प्रयत्नांनी दुर्योधनाला विराटानगरात अज्ञातवासात असलेले पांडव सापडतात व तो त्यांना अर्धे राज्य देतो असं याचं कथानक आहे..
बालचरित हे सात अंकी नाटक आहे. या नाटकात कृष्णजन्मापासून कंसवधापर्यंतचे कथानक आलेले आहे.
अभिषेक हे सहा अंकी नाटक आहे. या नाटकात रामाचा राज्याभिषेक हा विषय आहे.
अविमारक हे सहा अंकी नाटक आहे. या नाटकात कुन्तिभोज राजाची मुलगी कुरंगी व महाराज सौवीरचा मुलगा अविमारक यांच्या प्रेमकथेचे वर्णन केली आहे.
प्रतिमा नाटकात रामाच्या वनवासापासून रावणवधा पर्यंतच्या घटना वर्णन केल्या आहेत. हे सात अंकी सर्वांगसंपूर्ण नाटक आहे. रामाच्या वनवासापासून रावणवधापर्यंतचे कथानक यात वर्णिले आहे. याट कैकेयीचे उदात्तीकरण केले आहे.
प्रतिज्ञायौगन्धरायण हे नाटक सहा अंकी आहे. यात वत्सराज उदयन व वासवदत्ता यांच्या विवावाहाची कथा रहस्यमय रीत्या वर्णन केली आहे.
स्वप्नवासवदत्त हे सात अंकी नाटक आहे. या नाटकात सुद्धा उदयन-वासवदत्ता यांचे कथानक आहे. प्रतिज्ञायौगन्धरायण नाटकाचा हा उत्तरार्ध आहे.
चारुदत्त हे चार अंकी प्रकरण नाटक आहे. चारुदत्त व वसंतसेना यांच्या प्रेमाची कल्पित लोककथा यात वर्णन केली आहे. असं म्हटलं जातं की हे नाटक पूर्ण करण्याअगोदरच भासाचे निधन झाले. तेव्हा मग शूद्रक नावाच्या नाटाककाराने 'मृच्छकटिक' नावाचे नाटक याच कथानकावर रचले.
भासाच्या नाटकाची वैशिष्ट्ये -
भासाची नाटके प्रभावी आहेत. त्याच्या नाटकात सुंदर लोकोक्तींचा वापर असतो. त्याच्या नाटकात सर्व रस कमीअधिक प्रमाणात असतात. प्रसादगुण, माधुर्य, सरल सुगम भाषा त्याच्या नाटकात पहायला मिळते. भासाच्या नाटकात अनेक पात्रे असतात. पण ती कोणतेही पात्र निरर्थक नसते. तसेच त्याच्या नाटकातील पात्रे समाजातील विभिन्न स्तरातील असतात. तो खलपात्रांचे उदात्तीकरण करतो; अशी त्याची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.
No comments:
Post a Comment