Monday, September 21, 2020

पाठ ५६ वा स्वरसंधी भाग २


 पाठ  ५६ वा स्वरसंधी भाग २

मागच्या एका भागात आपण स्वरसंधीचा सवर्णांचा दीर्घ संधी हा एक प्रकार पाहिला होता. सवर्ण म्हणजे ज्या स्वरांचे उच्चारस्थान एकच आहे ते एकमेकांचे सवर्ण झाले. उदा. अ आणि आ दोन्ही स्वरांचा उच्चार कंठातून होतो. म्हणून ते एकमेकांचे सवर्ण झाले. जेव्हा दोन सवर्ण स्वर एकमेकांपुढे येतात तेव्हा त्यांचा दीर्घ संधी होतो. अ वर्ण + अ वर्ण = आ. इ वर्ण + इ वर्ण = ई. उ वर्ण + उ वर्ण = ऊ. ऋ वर्ण + ऋ वर्ण = ॠ



संधी २ - गुणसंधी

व्याकरणात पाणिनीने अ, ए आणि ओ या स्वरांना गुण असे नाव दिले आहे. जेव्हा अ, ए आणि ओ हे स्वर संधी म्हणून येतात तेव्हा त्या संधीला गुणसंधी असे म्हणतात.


नियम -     अ किंवा आ या स्वरांपुढे ह्रस्व किंवा दीर्घ इ, उ, ऋ आणि लृ हे स्वर आल्यास त्या मागील व पुढील असा दोन स्वरांना मिळून गुणादेश होतो. आदेश होतो म्हणजे ते दोन्ही वर्ण हटवून त्या जागी गुण वर्ण येतो. (आदेश: शत्रुवत् असे म्हटले आहे).


उदा. न + इति
= न् + (अ + इ) + ति

येथे न या वर्णातील शेवटच्या अ या स्वरापुढे इ हा वर्ण आला आहे. तेव्हा अ आणि इ या दोन स्वरांचा मिळून गुणसंधी होणार आहे. गुण म्हणजे अ, ए आणि ओ. मग या तीन स्वरातील कोणता वर्ण त्यांच्या ऐवजी येईल ? त्यासाठी आपल्याला या सर्व वर्णांचे उच्चारस्थान पहावे लागेल. अ वर्णाचे उच्चारस्थान आहे कंठ व इ वर्णाचे उच्चारस्थान आहे तालु. तेव्हा गुणा म्हणून जे स्वर येणार आहेत त्या स्वरांपैकी ह्या दोन्ही उच्चारस्थानांचा समावेश होणारा स्वर कोणता ? तर तो ए हा स्वर आहे. गुणा वर्णांपैकी अ चे उच्चारस्थान कंठ आहे. ए चे उच्चारस्थान कंठतालु आहे. तर ओ चे उच्चारस्थान कंठ-ओष्ठ आहे. तेव्हा कंठतालू हे उच्चारस्थान असणारा ए हा वर्ण तेथे गुण म्हणून येईल.


= न् +(अ + इ) + ति
= न् + (ए) + ति
= नेति असा संधी होईल.

परम + ईश्वर: = परमेश्वर:
यथा + इष्टम् = यथेष्टम् अशी याची काही आणखी उदाहरणे झाली.

चन्द्र + उदय:
= च + न्द्र् + (अ + उ) + दय:
आता येथे अ णि उ या वर्णांचा क्रमश: कंठ व ओष्ठ उच्चारस्थान असलेला ओ हा वर्ण संधी म्हणून येईल. 


= च + न्द्र् + (ओ) + दय:
चन्द्रोदय:

देव + ऋषि:
= दे + व् + (अ + ऋ) + षि:

आता येथे अ आणि ऋ यांचे उच्चारस्थान कंठ व मूर्धा हे आहे. गुण वर्णातील ए आणि ओ हे वर्ण येथे येऊ शकणार नाहीत. मग राहिला अ वर्ण. पण ऋ या स्वराच्या मूर्धा स्थानाची जोड देण्याकरता त्याला र् हा वर्ण जोडून अर् असे पाणिनीच्याच एका सूत्रानुसार करून घ्यावे लागते. आता अ आणि ऋ या दोन स्वरांच्या ऐवजी अर् असा गुणादेश होईल.


= दे + व् + (अ + ऋ) + षि:
 = दे + व् + (अर्) + षि:
= देवर्षि:

लृ वर्ण पुढे येऊन होणार्‍या संधीची उदाहरणे भाषेमधे नाहीत. म्हणून उदाहरणादाखल एक संधी सांगितला जातो

तव + लृकार: = तवल्कारः

तसेच दीर्घ ॠ ने सुरु होणाराही शब्द नाही.

थोडक्यात अ किंवा आ या वर्णांपुढे इ-ई हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून ए हा स्वर संधी म्हणून येतो.


अ किंवा आ या वर्णांपुढे उ-ऊ हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून ओ हा स्वर संधी म्हणून येतो.


अ किंवा आ या वर्णांपुढे ऋ-ॠ किंवा लृ हे स्वर आले तर त्या दोन्ही स्वरांचा मिळून अर् किंवा अल् हा आदेश संधी म्हणून येतो.


३) वॄद्धिसंधी

पाणिनी व्याकरणात आ, ऐ आणि औ या स्वरांना वृद्धि असे नाव आहे. जेव्हा आ, ऐ आणि औ हे स्वर संधी म्हणून येतात तेव्हा त्या संधीला वृद्धिसंधी असे म्हणतात.


नियम - पहिल्या पदाच्या अंती अ किंवा आ हे स्वर व पुढे ए किंवा ऐ स्वर आले तर त्या दोन स्वरांच्या ऐवजी त्यांना ऐ असा आदेश होतो, किंवा अ आणि आ या स्वरांच्या पुढे ओ हा स्वर आला तर त्या दोन स्वरांना मिळून औ हा वृद्धिआदेश होतो.


उदा.
तेन + एव
= तेन् + (अ + ए) + व
= तेन् + (ऐ) + व
= तेनैव

न + ऐच्छत्
= न् + (अ + ऐ) + च्छत्
= न् (ऐ) च्छत्
= नैच्छत्

गङ्गा + ओघ:
= गङ्ग् + (आ + ओ) + घ:
= गङ्ग् + (औ) + घ:
= गङ्गौघ:

दिव्या + औषधि:
= दिव्य् + (आ + औ) + षधि:
= दिव्य् + (औ) + षधि:
= दिव्यौषधि:

स्वाध्याय - 


प्रश्न १ खालील संधी करा.
१) सुर + ईश: =
२) तथा + इति =
३) रमा + ईश: =
४) हित + उपदेश: =
५) गङ्गा + उदकम् =
६) महा + ऋषि: =
७) अद्य + एव =
८) तथा + एव =
९) महा + औषधि: =
१०) महा + औषधम्
११) च + इति =
१२) जनसेवा + एव =

प्रश्न २) संधी सोडवा. 


१) शालामिति
२) अहमत्र
३) मकरायापि
४) तस्याहम्
५) हृदयमिच्छति
६) केनाहम्
७) हृदयमपि
८) तथाचरति
९) अद्यावयो:
१०) समाप्तिमगच्छत्
११) विटपमारोहत्तस्यापि
१२) कपिनाहम्
 
प्रश्न ३) संस्कृतमधे भाषांतर करा 


१) सैनिक चोराला काठीने मारतात.
२) स्त्रिया अलंकारांनी शरीर सजवतात.
३) लोक नावेने नदी ओलांडतात.
४) अभिराम धनुष्याने रावणाबरोबर युद्ध करतो
५) राजा राजवाड्यातून लोकांना पहाटो.
६) महेश झाडावर चढतो
७) सूर्यापासून आपण प्रकाश मिळवतो
८) दशरथाचा मुलगा वनात जातो.
९) चंद्राचा प्रकाश आह्लाददायक असतो.
१०) सिंह पर्वतप्रदेशात रहातात.
११) मनुष्याचे रोग अओषधाने नाहीसे होतात.
१२) ज्ञानामुळे सुख मिळते.
१३) लोकांच्या कल्याणासाठी राजा प्रयत्न करतो.
१४) शिष्य गुरूंची सेवा करतो.
१५) मनुष्य गुणांनी शोभून दिसतो.
१६) सज्जन ईश्वराच्या चिंतनात मग्न होतात.
१७) वाघ गवत खात नाही.
१८) पापापासून दु:खे उद्भवतात.
१९) मूर्खांचे ज्ञान वाढत नाही.
२०) उंच झाडावर पक्षी बसतात.

सरावासाठी अभ्यास 


प्रश्न १) माला शब्दाप्रमाणे विद्या शब्द चालवा, लिहून बघा.
प्रश्न २) आत्मनेपदी वर्तमानकाळ लिहा -
१) रम् (१ आ. प.)
२) मन् (४ आ. प.)
३) मृ-म्रिय् (६ आ. प.)
४) मन्त्र् (१०. आ प.) 


आज दोन संधी मुद्दाम एकत्र घेतले. तुलनात्मक कळावं म्हणून.

अ/आ + इ/ई = ए
अ/आ + ए/ऐ = ऐ

अ/आ + उ /ऊ = ओ
अ/आ + ओ/औ = औ

देव + ऋषि = देवर्षि

एवढं सूत्ररूपाने लक्षात ठेवायचे आहे.

====================================

" पाठ ५६ वा स्वरसंधी भाग २ " या Audio साठी खाली क्लिक् करा : 


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
  

No comments:

Post a Comment

पाठ १२१ वा - स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते

पाठ   १२१   वा  -  स्वयं अध्ययनासाठी सुभाषिते १ ) अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च ।   अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्...