पाठ ५८ वा स्वरसंधी भाग ३
पहिल्या दोन भागात आपण स्वरसंधीचे सवर्णांचा दीर्घ संधी, गुणसंधी व वृद्धिसंधी हे तीन प्रकपाहिले. आज चौथा प्रकार पहावयाचा आहे.
४) यण् संधी
व्याकरणात य्, व्, र्, ल्, या वर्णांना यण् असे नाव आहे.
नियम -
पहिल्या पदाच्या अंती ह्रस्व किंवा दीर्घ इ, उ, ऋ, लृ आले व त्यापुढे कोणताही सवर्ण नसलेला विजातीय स्वर आला तर त्या पूर्व स्वराच्या जागी क्रमाने य्, व्, र्, ल् असे आदेश होतात. म्हणजे पूर्वीच्या इ च्या ठिकाणी य्, उ च्या ठिकाणी व्, ऋ च्या ठिकाणी र् व लृ च्या ठिकाणी ल् येईल. आदेश होणार म्हणजे पूर्वीचा वर्ण हटवून त्या जागी नवीन वर्ण स्थानापन्न होणार. येथे फक्त पूर्वीच वर्ण हटवला जाणार आहे. गुण वा वृद्धिसंधी प्रमाणे मागचा व पुढचा स्वर मिळून आदेश होणार नाही.
काही उदाहरणे पाहूया.
१) गच्छति + अस्तम्
= गच्छत् + इ + अस्तम्
येथे इ या स्वरापुढे अ हा विजातीय स्वर आला आहे. इ हाच स्वर आला असता तर दीर्घ संधी झाला असता. थोडक्यात ह्रस्व किंवा दीर्घ इ या स्वरापुढे इ सोडून कोणताही स्वर आला तर यण् असा आदेश होईल. म्हणून इ या वर्णाच्या जागी य् असा आदेश होईल.
= गच्छत् + य् + अस्तम्
= गच्छत्य् + अस्तम्
= गच्छत्यस्तम्
२) दासी + एव
= दास् + ई + एव
येथे ई या स्वरापुढे ए हा स्वर आला आहे. म्हणून ई या स्वराला य् असा आदेश होईल.
= दास् + य् + एव
= दास्य् + एव
= दास्येव
३) भवतु + इति
= भवत् + उ + इति
येथे उ या स्वरापुढे इ हा स्वर आला आहे. म्हणून येथे उ या स्वराला व् असा आदेश होईल.
= भवत् + व् + इति
= भवत्व् + इति
= भवत्विति
४) चमू + ऐक्यम्
= चम् + ऊ + ऐक्यम्
येथे ऊ या दीर्घ स्वरापुढे ऐ हा विजातीय स्वर आला आहे. म्हणून ऊ या स्वराला व् असा आदेश होईल.
= चम् + व् + ऐक्यम्
= चम्व् + ऐक्यम्
= चम्वैक्यम्
५) मातृ + उत्सङ्ग: (मांडी)
मात् + ऋ + उत्सङ्ग:
येथे ऋ या स्वरापुढे उ हा स्वर आला आहे. म्हणून ऋ या स्वराला र् असा आदेश होईल.
= मात् + र् + उत्सङ्ग:
= मात्र् + उत्सङ्ग:
= मात्रुत्सङ्ग:
दीर्घ ॠकारान्त शब्द वापरात नाहीत.
६) लृ + आकृतिः
लृ स्वराने अंत पावणारी भाषेत उदाहरणे नाहीत. म्हणून असा संधी घेतला आहे.
येथे लृ या स्वरापुढे आ हा स्वर आला आहे. म्हणून लृया स्वराला ल् असा आदेश होईल.
= ल् + आकृति:
= लाकृति:
लक्षात ठेवण्याची गोष्ट
इ, उ, ऋ, लृ या स्वरांना य्, व्, र्, ल् असे क्रमाने आदेश होणार आहेत.
प्रश्न १ - खालील संधी सोडवा.
१) भवन्ति + अपेया: =
२) दानेषु + अभयम् =
३) मेधाविनी + आसीत् =
४) इति + उपाधिम् =
५) अपि + अस्ति
६) अति + आवश्यकम् =
७) खलु + आधार: =
८) देवेषु + अपि =
९) इति + अत्र =
१०) इति + एतस्य
११) इति + एव
१२) अपि + अनुभवति
खालील संधी मागील भागावर आहेत.
१) च + इति
२) एव + इति
३) सा + अतीव =
४) सा + अद्य =
५) रूपेण + अमरा =
६) परम + आदरेण =
७) परम + आदरेण =
खालील संधी होतांना मागील पदातील व्यंजनात पुढचा स्वर मिसळून ते व्यंजन पूर्ण होईल.
१) हृदयम् + अपि =
२) सत्यम् + एव =
३) जलम् + अपेयम् =
४) वित्तम् + इति =
५) धनम् + अपि
६) कवीन् + अपि
प्रश्न २ खालील संधी सोडवा.
१) इत्यत्र =
२) चैव =
३) एवाधार: =
४) इत्येतस्य
५) इत्येव =
६) गच्छतेव
७) निवसतीति
८) सदनमुपागच्छत् =
९) खल्वुचितम्
१०) सततमेव =
११) कमपि =
१२) सत्यमेव =
१३) प्रतिपालस्यापेक्षा =
१४) नियोजनमतीव =
१५) स्वल्पमपि =
१६) कार्याण्यवश्यम् =
१७) तस्यापव्यय: =
१८) विद्यामर्थम् =
१९) जीवितमशाश्वतम् =
२०) नितरामावश्यकता =
सरावासाठी अभ्यास
प्रश्न १ खालील धातू वर्तमानकाळात चालवा.
शंस (१ प. प.), कूर्द (१ आ. प.), कुप् (४ प. प.) युध् (४ आ. प.)
प्रश्न २) - खालील १ ला गण परस्मैपदी धातूंचा आज्ञार्थ लिहा.
वद्, खाद्, धाव्, स्था-तिष्ठ्
प्रश्न ३) कवि शब्द लिहा.
No comments:
Post a Comment